उतारवयातही सेवेची तळमळ असलेल्या आणि अपघातानंतरही स्थिर रहाणार्या भेडशी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले (वय ७३ वर्षे) !
१. साधिकेला मार्ग ओलांडतांना अपघात होणे
‘१३.८.२०२३ या दिवशी सकाळी ६ वाजता मी दूध आणायला दुकानात गेले होते. मी परत येतांना मार्ग ओलांडण्यापूर्वी आधी उजवीकडे पाहून नंतर डावीकडे पाहिले. तेव्हा मला लांबून येणार्या दुचाकी वाहनाचा दिवा दिसला. ‘दुचाकी वाहन माझ्याजवळ येईपर्यंत मी मार्ग ओलांडून पुढे जाऊ शकेन’, असे वाटल्याने मी पुढे गेले; मात्र दुचाकी वाहनाचा वेग अधिक असल्याने दुचाकी वाहन मला आपटले आणि मी फरफटत जाऊन मार्गावर पडले.
२. अपघातानंतर प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि शेजारी यांनी साहाय्य करणे
आमच्या घरासमोरील इमारतीच्या तिसर्या माळ्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’चा रविवारचा अंक घेणारे वाचक रहातात. ते त्यांच्या सदनिकेच्या सज्ज्यातून हे सर्व पहात होते. ‘माझा अपघात झाला आहे’, हे पहाताच ते धावत खाली आले. त्यांनी मला धरून मार्गाच्या बाजूला बसवले आणि घरी जाऊन माझ्या मुलाला बोलावून आणले. त्यानंतर त्यांनी आणि अन्य शेजारी यांनी मला सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले. माझा ‘श्रीकृष्ण’ हा नामजप सतत चालू होता. माझा डावा हात आणि कंबर यांचा अस्थिभंग झाला होता. मला डाव्या डोळ्याच्या भुवईपासून ते पायाच्या बोटांपर्यंत जखमा झाल्या होत्या. ‘प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) माझे प्रारब्ध न्यून केले आहे का ?’, हे मला समजत नव्हते.
३. रात्री झोपेत भयानक स्वप्ने पडणे
माझ्या सगळ्या सेवा थांबल्यामुळे मला रडू येत होते. मला वेदना होत असल्यामुळे रात्री झोप येत नव्हती. माझा नामजप सतत होत असे. मला चुकून कधी झोप लागली, तर भयानक स्वप्ने पडत असत. मी श्री. शंकर निकम यांना भ्रमणभाष करून माझी स्थिती सांगितली आणि सद्गुरु सत्यवान कदम यांना माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारायला सांगितले. श्री. निकमकाकांनी लगेच सद्गुरु सत्यवानदादांना संपर्क केला आणि मला भ्रमणभाषवर नामजप कळवला. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला श्री. निकमकाकांना विचारून घेण्याची बुद्धी झाली. मी तो नामजप दुसर्या दिवशी पूर्ण केला. त्या रात्री मला झोपही लागली.
४. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेला नामजप करतांना आलेल्या विविध संतांच्या संदर्भातील अनुभूती
सद्गुरु सत्यवानदादांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त। श्री हनुमते नमः। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय।’ हा नामजप करायला सांगितले. मी ‘श्री गुरुदेव दत्त।’ नामजप म्हणतांना सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवत होते, ‘श्री हनुमते नमः।’ म्हणतांना प.पू. दास महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवत होते आणि ‘ॐ नमः शिवाय।’ म्हणतांना ‘सद्गुरु पिंगळेकाका समोर आहेत’, असे समजून नामजप करत होते. त्यानंतर आठ दिवसांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये एका लेखात ‘सद्गुरु मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये शिवतत्त्व आहे’, असे माझ्या वाचनात आले. त्यानंतर नामजपातील ‘ॐ नमः शिवाय।’ म्हणतांना मी सूक्ष्मातून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणांवर मस्तक ठेवत होते. नंतर ४ दिवसांनी एका लेखात ‘सद्गुरु सत्यवानदादांमध्ये शिवाचा अंश आहे’, असे असे माझ्या वाचनात आले. तेव्हा मी ‘श्री गुरुदेव दत्त।’ म्हणतांना ‘प.पू. गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवत आहे’, असा भाव निर्माण झाला. ‘श्री हनुमते नमः।’ म्हणतांना प.पू. दास महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवत आहे आणि ‘ॐ नमः शिवाय।’ म्हणतांना सद्गुरु सत्यवानदादांच्या चरणांवर डोके ठेवत आहे’, असा भाव ठेवून नामजप करायला आरंभ केला.
५. नामजप केल्यामुळे झालेले लाभ
नामजप केल्यानंतर मला वाईट स्वप्ने पडणे बंद झाले. मला होणार्या शारीरिक वेदना पूर्णपणे दूर झाल्या. मला आता शांत झोप लागते. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला पहाटे ४ वाजता जाग येते. मी पलंगावर पहुडूनच प्रार्थना आणि नामजप करते अन् कृतज्ञता व्यक्त करते.
६. माझा अपघात झाल्यानंतर एक मासाने माझ्या भावाचे निधन झाले. या कठीण प्रसंगात गुरुदेवांच्या कृपेमुळे मला स्थिर आणि शांत रहाता आले.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला उत्तम आरोग्य प्रदान करावे आणि मी पूर्वी करत असलेल्या सेवा माझ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत करून घ्याव्यात’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता आणि नमस्कार !’
– श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७३ वर्षे ), भेडशी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. (२२.१०.२०२३)
|