सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि गुरुकृपेने आलेल्या अनुभूती !
१. प्रचारकार्य करतांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !
१ अ. ‘साधकांची उन्नती व्हावी’, यासाठी निरपेक्षपणे प्रयत्न होणे : ‘प्रचारकार्य करतांना मला त्या त्या गावात असलेले साधक भेटतात. अलीकडे त्यांच्याशी बोलतांना ‘ते साधनेत कुठे थांबले आहेत ?’, ‘त्यांच्या साधनेत कुठले अडथळे आहेत’, हे माझ्या पटकन लक्षात येते आणि ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे प्रकर्षाने वाटून त्यांना निरपेक्षपणे साधनेत साहाय्य करण्याचे प्रयत्न होतात. त्यांना वेळेत साहाय्य मिळाल्याने त्यांची तळमळ वाढून त्यांच्या साधनेतही वाढ होते. गुरुकृपेने माझ्याकडून सहजतेने हे प्रयत्न होत आहेत. ‘साधनेतील ‘समष्टी भाव’ काय असतो ?’, हे यांतून मला शिकता येत आहे.
१ आ. वाणी प्रेमळ होणे : अलीकडे ‘समाज आणि साधक यांच्याशी संवाद साधतांना माझ्या वाणीतील प्रेमळपणा वाढला आहे’, असे मला जाणवते. माझ्याकडून गुरुकृपेने सहजतेने ‘इतरांची प्रेमाने विचारपूस करणे, त्यांना प्रेमाने साधनेच्या संदर्भातील प्रयत्न सांगणे, त्यांच्या चुकांची जाणीव प्रेमाने करून देणे’, असे प्रयत्नही होत आहेत. ‘प्रीती’ हा श्री गुरूंचा गुण असून ‘या गुणाची अंशात्मक जपणूक होत आहे’, असे मला वाटते. त्यासाठी श्री गुरुचरणी कृतज्ञता !
२. अनुभूती
२ अ. ‘साधना चांगली व्हावी’, यासाठी रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धावा केल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन आश्वस्त करणे : प्रचारकार्यासाठी मला अनेक ठिकाणी जावे लागते. प्रवासात रात्री झोपतांना ‘साधना चांगली व्हावी’, यासाठी प.पू. डॉक्टरांचा धावा केल्यानंतर अलीकडे रात्री स्वप्नात प.पू. डॉक्टरांच्या ऐवजी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ येतात आणि ‘साधना चांगली होईल’, असे सांगून मला आश्वस्त करतात. या अनुभूतीमुळे ‘गुरुतत्त्व एकच असते’, या वचनावरील माझी श्रद्धा दृढ झाली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती भक्ती वाढली.
२ आ. मंदिरांत गेल्यानंतर ‘तेथील देवता जागृत असून त्या आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : मंदिर महासंघाच्या होणार्या परिषदांसाठी मी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील मंदिरांच्या विश्वस्तांना निमंत्रण देण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या मंदिरांत गेलो होतो. त्या त्या ठिकाणी देवळात दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर आणि तेथील देवतांना आर्ततेने प्रार्थना केल्यानंतर ‘प्रत्येक मंदिरातील देवता जागृत असून ती माझ्याशी प्रत्यक्ष संवाद करत आहे आणि प्रसन्नवदनाने मला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.‘प्रत्येक देवळातील देवता जागृत असते आणि स्वतःची साधना वाढल्यानंतर त्या देवतेची अनुभूती घेता येते’, असे मला या अनुभूतींतून शिकता आले.
२ इ. कार्यक्रमांमध्ये गुरुकृपेने जिज्ञासूंच्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्स्फूर्त आणि योग्य उत्तरे देता येणे : विविध कार्यक्रमांमध्ये जिज्ञासू किंवा श्रोते विविध प्रश्न विचारतात. यांपैकी जे प्रश्न मानसिक किंवा बौद्धिक पातळीवरचे असतात, त्यांना बुद्धीच्या पातळीवर माहितीजन्य उत्तरे देणे सुलभ असते. जिज्ञासूंच्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना योग्य अध्यात्मशास्त्र सांगणे आवश्यक असते. जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन योग्य प्रकारे झाल्यानंतर त्यांची साधक बनण्याची प्रक्रिया लवकर होते. अलीकडे माझ्याकडून जिज्ञासूंना उत्स्फूर्त आणि योग्य उत्तरे दिली जातात. उत्तरे देतांना त्या संदर्भात कधीही वाचलेले नसतांना आणि कार्यक्रमानंतर त्या संदर्भात दिलेल्या उत्तरांची निश्चिती करतांना ‘मी दिलेले उत्तर योग्य होते’, असे माझ्या लक्षात येते.
कार्यक्रमात माझ्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत होत असल्याने ‘गुरुकृपेने विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्या माध्यमातून योग्य उत्तरे दिली जातात’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेत आहे.’
– श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |