गो सेवेला सहकार्य करू ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान लोटे गो शाळा आयोजित गो संमेलनाचा समारोप
चिपळूण – गो सेवा हे पवित्र कार्य असून ह.भ.प. भगवान कोकरे करत असलेल्या या सेवेला आमचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली. २६ ते २८ जानेवारी या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान लोटे गो शाळा आयोजित गो संमेलनाच्या समारोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी या संस्थानकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री नारायण राणे म्हणाले की,
१. गोरक्षण, गोपालन ही महत्त्वाची सेवा आहे. या सेवेमुळे तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वीता येईल. गोवंशियांच्या शेणापासून खत, गॅस, वीजनिर्मिती, तर गोमूत्रापासून
औषधेही उत्पादित केली जातात.
२. गो सेवा करतांना विरोध होणे, ही गोष्ट चुकीची असून कोकरे गोवंश कसायाकडे जाऊ देत नाहीत, हे केवढे मोठे काम आहे. गो सेवा करतांना दूध देणारी जनावरे बाळगली, तर शासनाकडे साहाय्य मागण्याची वेळ येणार नाही. यासाठी गुजरातमधील गोशाळेचा प्रकल्प पहावा.
३. गो शाळेच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
४. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागांर्गत सहस्रो व्यवसाय येतात. या विभागातील योजनांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-महिला घेतांना दिसत आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण आणि महिला यानीही व्यवसायाच्या दृष्टीने पुढे आले पाहिजे, आपण नक्कीच सहकार्य करू.
५. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडोई उत्पन्नाचा दाखला देतांना रत्नागिरी जिल्ह्यातही हे चित्र पालटले पाहिजे. औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरच या ठिकाणी उद्योगधंदे येतील, असे सांगताना सूक्ष्म, लघु, उद्योग विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटरचे काम चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही यासाठी प्रयत्न करू.