भागोजीशेठ कीर पुण्यतिथीनिमित्त २४ फेब्रुवारीला रत्नागिरीत सहभोजन आणि सहभजन

दानशूर श्रीमान भागोजीशेठ

रत्नागिरी – २४ फेबु्रवारी या दिवशी दानशूर श्रीमान भागोजीशेठ यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने शहरात दुचाकी फेरी, पतितपावन मंदिरात सहभोजन आणि सहभजन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी धार्मिक, संगीत, कवी, लेखक, बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रांतील प्रतिभावंत व्यक्तीमत्त्वांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. तसेच भागोजीशेठ कीर यांच्यासमवेत काम करणार्‍या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती येथील पत्रकार परिषदेत रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी दिली.

या वेळीबाळकृष्ण चव्हाण, बी. टी. मोरे, कांचन मालगुंडकर, कीर यांचे नातू अंकुर कीर, प्रेमा कीर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या निमित्ताने २४ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता श्री भैरी मंदिर येथून दुचाकी फेरीला प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता पतितपावन मंदिर येथे या फेरीचे स्वागत करण्यात येईल. समाजातील गौरवमूर्तींची माहिती १८ फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ कार्यालय, भागिर्थी भुवन खालचीआळी, रत्नागिरी येथे आणून द्यावी. त्यातून त्यांची निवड केली जाणार आहे.

पतितपावन मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाच्या वेळी २४ फेब्रुवारी १९३१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या संकल्पनेतून सर्व समाजातील लोकांसाठी सहभोजन आणि सहभजन झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सवर्ण – दलित भेदभाव मिटवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरुन श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने उभारलेल्या पतितपावन मंदिराने देशामध्ये मोठी क्रांती केली होती.