अमेरिकेत ‘बालभारती’कडून पाठ्यपुस्तके पुरवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !
पुणे – उत्तर अमेरिकेतील ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’च्या वतीने भाषा शिकणार्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीच्या वतीने पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाला स्थानिक गरजेनुसार आवश्यक असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये २० टक्क्यांपर्यंत पालट करून देण्याचे अधिकार बालभारतीला देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका सिद्ध करणे, तसेच आवश्यकतेनुसार शिक्षक प्रशिक्षणाचे दायित्व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेवर सोपवण्यात आले आहे.
उत्तर अमेरिकेतील मंडळ तेथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे, परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे अशी कामे ९ वर्षांपासून करत आहे. मराठीची अभिवृद्धी करण्यासाठी मंडळाशी सामंजस्य करार केला आहे. कराराची कार्यवाही करण्यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत विविध कार्यालयांचे दायित्व निश्चित केले आहे. त्यानुसार उत्तर अमेरिकेतील शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे दायित्व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांची राहील. मंडळाच्या वतीने चालवल्या जाणार्या शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करणे, त्यांना अभ्यासक्रम, पुस्तक उपलब्ध करून देणे, परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे यांचा नियमित आढावा घेणे, सनियंत्रण करणे आणि त्यानुसार आवश्यक नियोजन करणे, यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.