अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेश राज्य आणि भारत यांना ४ लाख कोटी रुपयांचा लाभ !
अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्तवला जात आहे. ‘भारतीय स्टेट बँके’ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, श्रीराममंदिर आणि इतर पर्यटन स्थळे यांविषयी पुढाकार घेतल्याने वर्ष २०२४-२०२५ मध्ये सरकारकडे जवळजवळ ५ सहस्र कोटी रुपये महसूल रूपाने जमा होईल. यामध्ये अयोध्या हे स्थळ महत्त्वाचे आहे आणि पुढे पर्यटनात होणारी वाढ लक्षात घेता या वर्षी उत्तरप्रदेश सरकार ४ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत होईल.
१. अयोध्येच्या पर्यायाने उत्तरप्रदेशच्या वार्षिक महसूलामध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ
‘जेफरीज’ या विदेशी शेअर बाजार संशोधन संस्थेने म्हटले आहे की, भेट देणार्यांच्या संख्येमध्ये अयोध्या ही व्हॅटिकन सिटी आणि मक्का या स्थळांना मागे टाकेल. या अहवालानुसार अयोध्येत वर्षाला जवळजवळ ५ कोटी लोक भेट देतील आणि अयोध्या हे केवळ उत्तरप्रदेशमधील नव्हे, तर संपूर्ण भारतातील मोठे पर्यटनस्थळ होईल. यामुळे अयोध्येच्या वार्षिक महसूलामध्ये वाढ होईल. आंध्रप्रदेशमधील तिरुपति बालाजी देवस्थानला प्रतिवर्षी २ कोटी ५० सहस्र लोक भेट देतात आणि त्यामुळे वर्षाला १ सहस्र २०० कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. वैष्णोदेवी (जम्मू-काश्मीर) येथे वर्षाला ८० लाख लोक भेट देत असून तेथे ५०० कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. आगरा (उत्तरप्रदेश) येथील ताजमहालला वर्षाला ७० लाख लोक भेट देत असून तेथे १०० कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. आगरा किल्ल्याला वर्षाला ३० लाख लोक भेट देतात आणि २७ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल जमा होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या धार्मिक स्थळांपैकी मक्का येथे वर्षाला २ कोटी लोक भेट देतात आणि सौदी अरेबियाच्या चलनानुसार १२ अब्ज डॉलर (९९ सहस्र ६०० कोटी रुपये) महसूल जमा होतो आणि व्हॅटिकन सिटीमध्ये १ वर्षाला ९० लाख लोक भेट देतात अन् तेथे ३१५ अब्ज डॉलर (२६ लाख १४ सहस्रांहून अधिक कोटी रुपये) कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होतो.
२. भारताचा आर्थिक विकास
एका सरकारी अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार अयोध्येला प्र्रतिदिन १ लाख भाविक भेट देणे अपेक्षित असून येत्या काही दिवसांत हे प्रमाण प्रतिदिन ३ लाख लोक एवढे होईल. जर प्रत्येक भाविकाने २ सहस्र ५०० रुपये व्यय केले, तर अयोध्येतील स्थानिक अर्थव्यवहार २५ सहस्र कोटी होईल. तो सरकारी अधिकारी म्हणाला, ‘‘जे भाविक अयोध्येला भेट द्यायला येतील. ते काशीविश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील बांके बिहारी मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे वाराणसी आणि मथुरा या ठिकाणीही आर्थिक व्यवहार वाढेल. अशा प्रकारे प्रतिवर्षी उत्तरप्रदेशमध्ये प्रत्येक वर्षीचा आर्थिक व्यवहार अतिरिक्त १ लाख कोटी रुपये होईल. यामुळे भारताचा आर्थिक विकास होईल.’’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे
कॅनडातील दोन शहरांमध्ये २२ जानेवारी हा दिवस ‘अयोध्या श्रीराममंदिर दिवस’ म्हणून घोषित !कॅनडामधील हिंदूंनी श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अनेक ठिकाणी दाखवण्याचे नियोजन करण्यात आले होते. येथील ओकव्हीले आणि ब्रम्पटन या शहरात २२ जानेवारी २०२४ हा दिवस ‘अयोध्या श्रीराममंदिर दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. ब्रम्पटन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन आणि ओकव्हीले शहराचे महापौर रॉब बर्टन म्हणाले, ‘‘युरोप ते कॅनडामधील हिंदूंनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जगभरातील हिंदूंच्या दृष्टीने सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांचे अनेक शतकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.’’ – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे |