बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनांवर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
१. प.पू. कलावतीआई यांची सुवचने !
१ अ. खोटे वैराग्य : ‘मनाविरुद्ध गोष्ट घडली की, औदासिन्यामुळे काहीच नकोसे वाटणे आणि मनासारखी गोष्ट घडली की, मन पूर्ववत् विषयांत लिप्त होणे.
१ आ. खरे वैराग्य : अनुकूल प्रारब्धाने सकल वैभव प्राप्त झाले किंवा प्रतिकूल प्रारब्धाने वैभवाचा नाश जरी झाला, तरी मन तीळमात्रदेखील न चळणे.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव
(साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘सूत्रात्मक बोल’, सुवचन क्र. १० आणि ११)
२. वरील सुवचनांवर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
२ अ. वैराग्य म्हणजे काय ? : ‘राग म्हणजे आसक्ती, तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही, तर ते अभावरूप आहे. सांख्यदर्शनानुसार बुद्धीमध्ये सत्त्वगुणाचा उदय झाला असता जे चार भाव उत्पन्न होतात, त्यांपैकी वैराग्य हा एक भाव आहे.’ (साङ्ख्यकारिका, कारिका २३) चित्तामध्ये वैराग्याची भावना यत्नपूर्वक उत्पन्न केली जाऊ शकत नाही; तर भौतिक आणि पारलौकिक विषयांमध्ये दोष दिसून आल्यावर मनात अनायास वैराग्य उदयास येते. वैराग्य म्हणजे केवळ शरिराने एखाद्या विषयापासून दूर रहाणे नव्हे, तर मनामध्ये त्याविषयीची आसक्ती नसणे.
२ आ. खर्या वैराग्याची उदाहरणे
२ आ १. गौतम बुद्ध : गौतम बुद्ध हा शुद्धोधन राजाचा राजपुत्र होता. त्याचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’, असे होते. सर्व भौतिक सुखे त्याच्या पायांशी लोळण घेत होती; परंतु एकदा वाट चुकल्यामुळे तो शहरात फिरत असतांना त्याने घर भरून उरणारे दारिद्र्य पाहिले. प्रथमच जीर्ण शरिराचा रुग्ण पाहिला, तसेच जराजर्जर वृद्धत्व पाहिले. त्याला एक प्रेतयात्रा दिसली. चन्नने (त्याच्या रथाच्या सारथ्याने) त्याला सांगितले, ‘‘सार्या जीवमात्राच्या अटळ अशा या स्वाभाविक अवस्था आहेत.’’ सिद्धार्थच्या जगात या जाणिवांना जागाच नव्हती. त्याला या गोष्टींचा अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. ‘आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे’, हा त्याला साक्षात्कार झाला. त्यानंतर त्याने एक संन्यासी पाहिला आणि त्याची झोप उडाली. त्याचे मन सुखात रमेनासे झाले. ‘आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल, तर कठीण आहे’, असे त्याच्या मनाने घेतले. यातून मुक्त होण्यासाठी ‘संन्यास’, हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरवले. सिद्धार्थ वयाच्या २९ व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्नी यशोधरा हिचे ओझरते आणि अंतिम दर्शन घेऊन अन् त्याचा पुत्र बाळ राहुल याचे मुख हळूच चुंबून राजवाड्याबाहेर निघाला. थोडक्यात, सिद्धार्थला हे खरेखुरे वैराग्य प्राप्त झाले. हे ओढून-ताणून आणलेले वैराग्य नव्हते.
२ आ २. भगवान वर्धमान महावीर : भगवान वर्धमान महावीर हेसुद्धा बालपणापासूनच वैराग्य धारण करून होते. त्यांना लहानपणापासूनच कसलीही आसक्ती नव्हती. भोग घेण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती.
२ इ. योगसूत्रांमध्ये वर्णिलेले वैराग्याचे २ प्रकार : ‘योगसूत्रांमध्ये (पातञ्जलयोगदर्शन, समाधिपाद, सूत्र १५ आणि १६) दोन प्रकारच्या वैराग्याचे वर्णन केले आहे – अपरवैराग्य आणि परवैराग्य.
२ इ १. अपरवैराग्य : अपरवैराग्य म्हणजे योगसाधनेच्या प्रारंभिक स्थितीमध्ये असणारे वैराग्य होय. दृष्ट म्हणजे लौकिक जगतातील अन्नपान, स्त्रीसुख इत्यादी भौतिक विषयांप्रती आणि आनुश्राविक म्हणजे अलौकिक जगतातील स्वर्ग, अप्सरा इत्यादी दिव्य विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होणे, म्हणजे ‘अपरवैराग्य’ होय.वाचस्पती मिश्र आणि विज्ञानभिक्षु या व्याख्याकारांनी अपरवैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत – यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार
अ. यतमान : सामान्यतः राग, लोभ इत्यादी चित्तातील विकारांमुळे इंद्रिये नेहमी विविध विषयांकडे आकृष्ट होत असतात. ‘ती आकृष्ट होऊ नये’, या दृष्टीने केला जाणार्या प्रयत्नांचा आरंभ, म्हणजे ‘यतमान अवस्था’ होय. या अवस्थेमध्ये संपूर्ण वैराग्य साध्य होत नाही; परंतु वैराग्यभावना उत्पन्न होण्याच्या दृष्टीने योग्याची वाटचाल चालू होते.
आ. व्यतिरेक : विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्न केल्यावर काही वस्तू अथवा विषय यांच्या संदर्भातील राग, लोभ इत्यादी दोष नष्ट होतात; परंतु अन्य काही वस्तूंप्रती योग्याच्या मनात राग, लोभ अजूनही शिल्लक असतो. ‘कोणत्या विषयासंबंधी दोष नष्ट झाले आहेत आणि कोणत्या विषयासंबंधी अजून शिल्लक आहेत ?’, याचे तटस्थ भावनेने परीक्षण करणे’, ही वैराग्याची ‘व्यतिरेक अवस्था’ होय.
इ. एकेंद्रिय : बाह्य इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त झाल्यावर ती इंद्रिये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांप्रती आसक्त होत नाहीत; परंतु पूर्वकाळातील अनुभवांमुळे चित्तामध्ये सुप्त रूपाने राहिलेले रागादी दोष अजूनही संस्काररूपाने विद्यमान असतात अन् पुन्हा जागृत होण्यासाठी उत्सुक असतात. ‘मनाद्वारे त्या सुप्त संस्कारांचे व्यवस्थापन करणे आणि पुन्हा त्यांना जागृत होऊ न देणे’, ही वैराग्याची अवस्था म्हणजे ‘एकेंद्रिय’ होय. मनरूपी एकाच इंद्रियाद्वारे रागादी दोषांवर नियंत्रण केल्यामुळे या अवस्थेला ‘एकेंद्रिय’, अशी संज्ञा आहे.
ई. वशीकार : जेव्हा बाह्य इंद्रिये विषयांपासून विरक्त होतात, चित्तातील सुप्त संस्कारही जागृत होऊ इच्छित नाहीत आणि योग्याचे चित्त पूर्णपणे वैराग्यभावनेने युक्त असून त्याच्या नियंत्रणातही असते, तेव्हा त्या अवस्थेला ‘वशीकारनामक वैराग्य’, असे म्हटले जाते.योगी क्रमाने या चार अवस्थांना पार करतो. या चार अवस्थांमध्ये वशीकारसंज्ञक वैराग्य हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पतंजलिऋषींनी सूत्रामध्ये केवळ वशीकार वैराग्याचाच नामोल्लेख केलेला आहे; कारण अन्य तीन प्राथमिक अवस्थाही त्यात गृहीत आहेत.
२ इ २. परवैराग्य : योग्याच्या चित्तामध्ये जे वैराग्य उत्पन्न होते, ते परवैराग्य होय. समाधीच्या अवस्थेमध्ये सत्त्वगुणप्रधान असणार्या चित्तवृत्तींद्वारे योगी स्थूल विषय, सूक्ष्म विषय, इंद्रिये आणि चैतन्यस्वरूप पुरुष यांचे या क्रमाने ज्ञान प्राप्त करून घेतो; परंतु सांख्ययोग दर्शनांमध्ये सर्वोत्कृष्ट मानलेले पुरुषज्ञान किंवा आत्मज्ञान हे चित्ताद्वारेच प्राप्त होते. जोपर्यंत चित्ताचे वृत्तीरूप अस्तित्व आहे, तोपर्यंत परम योग किंवा कैवल्य सिद्ध होऊ शकत नाही; त्यामुळे योगी ‘स्व’चे ज्ञान करून देणार्या चित्तापासूनही पूर्णपणे विरक्त होतो. यास ‘परवैराग्य’, असे म्हणतात. हे वैराग्य जाणिवेच्या रूपात असल्याने ज्ञानस्वरूपच आहे. ज्ञानाची पराकाष्ठा म्हणजे परवैराग्य होय; कारण यानंतर चित्तवृत्ती पूर्णपणे निरुद्ध होतात आणि कोणतेच ज्ञान संभवत नाही; म्हणून या अवस्थेला ‘असम्प्रज्ञात’, असे म्हणतात. या वैराग्याच्या उदयाने सर्व क्लेश नष्ट होतात, योगी जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त होतो आणि लवकरच त्याला कैवल्य अवस्था प्राप्त होते.’
(साभार : मराठी विश्वकोश (http://marathivishwakosh.org))
२ ई. भगवंताने जे दिले, त्यात समाधान असून ‘इतर काही हवे आहे’, असे न वाटणे, म्हणजे वैराग्य होय ! : ‘संसारावर तुळशीपत्र ठेवून प्रत्येक गोष्टीचा त्याग करणे’, अशा बाह्य उपचाराला वैराग्य म्हणत नाही. वैराग्याच्या नेमक्या आणि थेट व्याख्या आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी तर म्हटले आहे, ‘वैराग्य हे वृत्तीत असते. ‘भगवंताने जे दिले, त्यात समाधान असून ‘इतर काही हवे आहे’, असे न वाटणे’, म्हणजे वैराग्य होय.’ महाराजांचे हे सांगणे आपण नीट लक्षात घेतले, तर ‘धर्मग्रंथांना हेच सांगावयाचे आहे’, हे आपल्याला उमजत जाते.’ – संजय चक्रदेव
२ उ. विषयांबद्दलची गोडी हळूहळू नष्ट होऊन माणूस उच्च अशा सात्त्विक वृत्तीला धारण करतो, त्या वेळी त्याला खरे वैराग्य प्राप्त होते ! : सुधीर फडके यांनी गायलेल्या एका गाण्यात म्हटले आहे,
कुठे शोधिसी रामेश्वर ।
अन् कुठे शोधिसी काशी ।।
हृदयातील भगवंत राहिला ।
हृदयातून उपाशी ।। १ ।।
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा ।
लाविलेस तू भस्म कपाळा ।।
कधी न घेऊन नांगर हाती ।
पिकविलेस मातीतून मोती ।।
हाय अभाग्या भगवे नेसून ।
घर संन्यासून जाशी ।। २ ।। – मंगेश पाडगावकर
‘संसाराचा त्याग करून, भगवी वस्त्रे नेसून आणि रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालून कुठेतरी रानावनात फिरणे’, म्हणजे वैराग्य नव्हे. वैराग्य ही एक वृत्ती आहे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात. दुसर्या एक गाण्यात म्हटले आहे,
गळा माळ शोभे आत्मरूप शांती ।
भक्तीभाव दोन्ही धरू टाळ हाती ।
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।।
म्हणून जोपर्यंत हृदयातील आत्मज्योत प्रकाशित होत नाही, तोपर्यंत माणूस विषयांमध्ये लिप्त होऊन रहातो. माणसाला चराचरामध्ये देव दिसला पाहिजे, म्हणजे त्याला खरे ज्ञान होते. ‘विषयांमध्ये असलेली गोडी हळूहळू नष्ट होऊन माणूस उच्च अशा सात्त्विक वृत्तीला धारण करतो. त्या वेळी त्याला खरे वैराग्य प्राप्त झाले’, असे म्हणावे लागेल.
२ ऊ. ‘संसार चांगल्या प्रकारे करत असतांना त्यात मन लिप्त झालेले नसणे’, हाच ‘निष्काम कर्मयोग’ ! : ‘आत्मस्वरूपाचे ज्ञान हेच खरे ज्ञान’, असे संत म्हणतात. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मनामध्ये शांती आणि समाधान निर्माण होते. मनाची चलबिचल मुळीच होत नाही. तो भक्तीरसात अखंड बुडून जातो. विषय कितीही खुणावत असले आणि विषयांची गोडी कितीही वाटत असली, तरी तो भक्त आपल्या भजनापासून दूर जात नाही. त्याचे मन संसारातून विरक्त होते. तो संसार मात्र चांगल्या प्रकारे करतो; पण त्यात त्याचे मन लिप्त झालेले नसते. यालाच भगवद्गीतेत ‘निष्काम कर्मयोग’, असे म्हटले आहे.
२ ए. माणसाने कधीही चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देता कामा नये ! : जवळपास वावरणारा देव किंवा वैश्विक शक्ती माणसाला जाणवत नाही; कारण विषयांचा पगडा माणसाच्या मनावर इतका घट्ट असतो की, ते विषय माणसाची दिव्य दृष्टी काढून घेतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. तेव्हा अर्जुन भगवंताचे विशाल स्वरूप पाहू शकला. माणूस हा प्रारब्धाने बांधलेला असतो. त्याच्या जीवनात जे काही चांगले घडते, ते त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने घडत असते आणि जे जे वाईट घडते, ते त्याच्या पूर्वजन्मीच्या वाईट कृत्यांचे फळ असते; म्हणून समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वा मुखी मंगल बोलवावे ।।’, म्हणजे ‘संपूर्ण आयुष्यभर सत्कर्म करावे आणि मुखात नेहमी मंगल बोलणे असावे.’‘माणसाने कधीही चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देता कामा नये’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
२ ऐ. माणसाने कर्तेपणा स्वतःकडे घेऊ नये ! : माणसाने ‘मी कर्ता आहे. मी सर्व करत आहे’, हा भाव मनात ठेवू नये; कारण माणूस कितीही बुद्धीमान असला, तरी जे घडणार असते, त्याला तो रोखू शकत नाही; म्हणून मराठीत एक वचन आहे, ‘होणारे न चुकेल, होईल जरी ब्रह्मा तया आडवा ।’, म्हणजे ‘प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी पालट करायचे ठरवले, तरी जे घडणार आहे, ते घडतेच !’
२ ओ. ‘सर्वकाही ईश्वरच करतो’, असा भाव असल्यास ईश्वर साहाय्याला धावून येतो !
१. ‘माणसाने कर्तेपण स्वतःकडे घेतले की, सर्वशक्तीमान ईश्वर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो’, असे संत सांगतात. ‘हे ईश्वरा, जे माझ्या जीवनात घडत आहे, त्या सर्व तुझ्याच अतर्क्य अशा लीला आहेत’, असा विचार माणसाने केला, तर मात्र ईश्वर त्याच्या साहाय्याला धावून येतो. संकटात सापडलेल्या द्रौपदीने श्रीकृष्णाचा कारुण्याने भरलेल्या आवाजात धावा केला. त्या वेळी श्रीकृष्ण तिच्या साहाय्याला धावून आला.
२. विषका प्याला राणाजीने भेजा ।
पीवत मेरा हासी रे ।
पग घुंगरू बांध मीरा नाची रे ।।
थोर भक्त मीराबाई ही श्रीकृष्णाच्या भक्तीत इतकी तल्लीन झाली होती की, प्रत्यक्ष तिच्या पतीने दिलेला विषाचा प्याला पिऊनसुद्धा तिला काहीही झाले नाही; कारण श्रीकृष्णाने त्या विषापासून तिचे रक्षण केले. मीराबाई संसार आणि सर्व विषय यांपासून कधीच अलिप्त झाली होती. ती श्रीकृष्णाच्या भजनात रात्रंदिवस रंगून जात होती.एका गीतात म्हटले आहे,
जन्म-मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडिवार ।।
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।। – अशोक परांजपे
जेव्हा ‘दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत’ आणि ‘आत्मा अविनाशी आहे’, असे ज्ञान माणसाला होते, तेव्हा माणूस विरक्त होतो आणि त्याला वैराग्य प्राप्त होते’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.’
– (पू.) किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२१.०९.२०२३)