देश-विदेशातील २२ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांची माहिती संकलित !
राष्ट्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न
मुंबई – देशभरात, तसेच विदेशात सक्रीय असलेल्या २२ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) संकलित केली आहे. आतंकवाद्यांविरुद्ध देशात प्रविष्ट झालेल्या सहस्रो गुन्ह्यांची माहिती याद्वारे मिळणार आहे. अमेरिकेने बनवलेल्या ‘ग्लोबल टेररिझम डेटाबेस’च्या धर्तीवर राष्ट्रीय आतंकवाद माहिती संकलन आणि विश्लेषण केंद्राची (एम्टीडीसी-फॅक) स्थापना करण्यात आली आहे.
१. वर्ष २००८ मध्ये मुंबईवरील आतंकवादी आक्रमणानंतर स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला आतंकवादी कारवायांविषयी गुप्तचर विभागाकडून माहिती दिली जाते. त्यामुळे विविध राज्यांतील आतंकवादविरोधी पथकांना स्वतंत्रपणे स्रोत उभा करावा लागतो. आतंकवाद्यांंच्या विरोधात कारवाई करण्याचे दायित्व असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने १५ वर्षांनंतर असा ‘डेटाबेस’ सिद्ध केला आहे.
२. इंडियन मुजाहीद्दीन, लष्कर-ए-तोयबा या प्रमुख संघटनांसह देशात बंदी असलेल्या सर्व आतंकवादी संघटनांची माहितीही त्यांच्या प्रमुखांसह यात दिली आहे.
३. वर्ष २०२३ मध्ये यंत्रणेने ६२५ आतंकवाद्यांना अटक केली.
४. आतंकवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या सर्वच आतंकवाद्यांची माहिती आणि त्यांच्या संघटनेचे नाव, बोटांचे ठसे, ध्वनीचित्रफीत, छायाचित्रे, तसेच सामाजिक माध्यमांवरील माहिती आदी सर्वच तपशील संकलित करण्यात आला आहे.
५. यंत्रणेकडे आतंकवादी कारवायांशी संबंधित असलेल्या ९२ लाख संशियतांच्या बोटांचे ठसे आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणार्या ५ लाखांहून अधिक आरोपींची माहितीही त्यांच्या अलीकडील छायाचित्रांसह संकलित करण्यात आली आहे.
६. आतंकवादी संघटनांना अर्थपुरवठा करणार्या संशयितांविषयीही संपूर्ण तपशील आता उपलब्ध करून दिला आहे. सीसीटीव्हीवरील छायाचित्रावरून आरोपीला ओळखण्याचे तंत्रही विकसित करण्यात आले आहे.
७. एका अतिवरिष्ठ अधिकार्याने माहिती देतांना सांगितले, ‘आतंकवाद समूळ नष्ट करण्यास ही अत्याधुनिक यंत्रणा लाभदायी ठरणार आहे. राज्यांतील आतंकवादविरोधी पथकांनाही त्यामुळे माहिती उपलब्ध होणार आहे. प्रत्येक राज्यातील आतंकवादविरोधी पथकाने त्या-त्या राज्यातील आतंकवादी कारवायांची माहिती संकलित केली आहे; परंतु त्यांना देशभरातील कारवायांची माहिती या नव्या डेटाबेसमुळे उपलब्ध होऊन चांगला समन्वय साधता येईल.’