Jharkhand Corrupt CM : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानातून ३६ लाख रुपयांची रोकड जप्त !

मुख्यमंत्री २ दिवस बेपत्ता

मुख्यमंत्री हेमंत सोरेन

रांची (झारखंड) – झारखंडच्या ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ सरकारचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या देहली येथील निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाचे पथक २९ जानेवारीला चौकशीसाठी गेले होते; मात्र निवासस्थानी मुख्यमंत्री सोरेन नव्हते. येथून या यंत्रणेने काही महत्त्वाची कागदपत्रे, ३६ लाख रोख रक्कम आणि एक चारचाकी वाहन जप्त केले. जवळपास २ दिवस मुख्यमंत्री सोरेन गायब होते. अंततः ३० जानेवारीला ते रांची येथे असल्याचे दिसून आले.

सौजन्य : इंडिया टूडे 

भाजपकडून सोरेन यांना शोधून देणार्‍यास बक्षीस देण्याची घोषणा !

मुख्यमंत्री सोरेने बेपत्ता झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता झाल्याचे फलकही लावले होते. सोरेन कुणाला सापडल्यास संबंधितांना ११ सहस्र रुपये देण्याचे घोषित केले होते.

मुख्यमंत्री सोरेन त्यांची पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चा

भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात जर मुख्यमंत्री सोरेन यांना अटक करण्यात आली, तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याची चर्चा झारखंडमध्ये चालू आहे.

संपादकीय भूमिका

एखाद्या प्रकरणात चौकशी गेली जात असतांना झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री गायब का झाले ? जर त्यांनी काही चुकीचे केले नसेल, तर त्यांना कशाचे भय वाटत आहे ? हे प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होणारच !