सातारा येथील प्रशासन, पोलीस आणि शाळा, महाविद्यालये यांना निवेदन
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम
सातारा, २९ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरांत, तालुक्यांत, गावांत प्रशासन, पोलीस, तसेच शाळा आणि महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.
सातारा येथील अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट यादिवशी मोठ्या अभिमानाने राष्ट्रध्वज मिरवले जातात; मात्र दुसर्या दिवशी हे राष्ट्रध्वज रस्त्यावर, कचरापेटीत, गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. ही विटंबना टाळण्यासाठी गत २० वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. समितीच्या वतीने याविषयी कायदेशीर लढा दिला गेला असून याला यश आले आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने मास्क, टी-शर्ट आणि अन्य उत्पादने यांचीही विक्री केली जात आहे. यामुळे राष्ट्रध्वजाचे विटंबना होत असून हा दंडनीय अपराध आहे. शासनाने आदेश देऊनही राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.