गंगावेस तालीम सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी सर्व सुविधा देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

गंगावेस तालीम येथील मल्लांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मान्यवर

कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम रहाण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद आणि मल्ल यांना सर्व सुविधा असणार्‍या तालीम बनवणे आवश्यक आहे. यासाठी गंगावेस तालीम सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी सर्व सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गंगावेस तालीम येथे भेट दिल्यावर ते बोलत होते.

या प्रसंगी वस्ताद विश्वास हारुगले, हिंदकेसरी संतोष वेताळ, तालमचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर यांसह अन्य उपस्थित होते. तालमीचे नूतनीकरण करतांना याठिकाणी आवश्यक असणार्‍या सुविधा, ऑलिंपिकच्या धर्तीवर ‘मॅट’ (कुस्तीचा एक प्रकार), माती, स्वच्छतागृह, मजबूत भिंती, कौले यांसह अन्य गोष्टींचा विचार करा. तालीमचा विकास करतांना पुरातन इमारत कायम ठेवून २०० मल्लांची रहाण्याची सोय करा यांसह अन्य सूचना उपमुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी दिल्या.