श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवतांना प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
कोल्हापूर, २९ जानेवारी (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखड्याचे आज माझ्यासमोर सादरीकरण करण्यात आले. अतिशय चांगल्या प्रकारचा हा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे; मात्र हा आराखडा पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील. पूर्वी येणार्या भाविकांची संख्या अल्प होती, आता भाविक-वाहने सगळेच वाढले असून त्यांना चांगल्या सुविधाही देणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा आराखडा दाखवला जाईल आणि त्यानुसार पुढे कृती केली जाईल. यात स्थानिक नागरिकांना साहाय्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
१. कुणी सांगितले म्हणून मी गंगावेस तालमीत गेलो नाही, तर मी विकास करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे वाचाळवीरांच्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही. कोल्हापूर येथील ३ तालमींना विशेष महत्त्व असून त्यांना साहाय्य केले जाईल. सातारा इथे महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्मारकाचा आरखडा देण्यास सांगितले आहे. कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतील.
२. कोल्हापूर येथील दसरा महोत्सव किमान १० दिवस चालावा यांसाठी यापुढील काळात नियोजन केले जाणार आहे. त्या निमित्ताने १० दिवस चांगले वातावरण निर्माण होईल. काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावे लागणार आहे. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. या गळतीमुळे ६ टी.एम्.सी. पाणी वाया जाते.
३. कोल्हापूरसाठी लवकरच भव्य आंतरराष्ट्रीय पातळीचे ‘कन्व्हेंशन सेंटर’ करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडाही अंतिम करण्यात आला आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. एकाच वेळी १ सहस्र ८०० लोकांची तेथे बसण्याची सोय होणार आहे.
४. कोल्हापूर शहरात नवीन भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी शेंडा पार्क येथे भूमीचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाविषयी छगन भुजबळ हे सातत्याने विरोधात बोलत आहेत, यावर पक्षाची भूमिका काय ? या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार म्हणाले, ‘‘प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका काल मांडलेली आहे. लोकशाहीत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. घरातील दोन भावांमध्येही वाद होतात; मात्र त्यावर बसून मार्ग काढता येतो. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जाणार आहे. मुंबईत गेल्यावर मी आणि मुख्यमंत्री एकत्र बसून छगन भुजबळ यांच्याशी बोलू.’’ |