आक्रमणकर्त्यांवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करीन ! – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप
पनवेल येथे हिंदुत्वनिष्ठांवर झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ महाआरती !
पनवेल (वार्ता.) – संपूर्ण देशामध्ये असलेले आनंदाचे वातावरण पनवेलमध्येही जाणवत होते. अशा वेळी येथील मोहल्ल्यात घडलेली घटना दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. त्याचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे. या सर्वांचे सीसीटीव्ही चित्रीकरण आम्ही पोलिसांना दिले. त्याआधारे पोलीस कारवाई करत आहेत. केवळ श्रीरामाच्या घोषणा दिल्या म्हणून हिंदूंवर आक्रमण होणे दुर्दैवी आहे. असे प्रकार घडणार नाहीत, याची निश्चिती हिंदु समाजाला होणार नाही, तोपर्यंत ही अस्वस्थता कायम रहाणार. आता अधिकाधिक हिंदु समाज आरत्यांसाठी जमू लागला आहे. आता पोलिसांचे दायित्व वाढले आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडू नयेत म्हणून आपण सर्व संघटित रहावे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पनवेल येथील शोभायात्रेवर आक्रमण करणार्या धर्माधांवर कारवाई व्हावी, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनानी संघटित होऊन महाआरती करून निषेध व्यक्त केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ५०० हिंदुत्वनिष्ठांनी आमदार ठाकूर यांना निवेदन दिले.
ठाकूर पुढे म्हणाले की, निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या कारवाईच्या मागण्या, तसेच अनधिकृत बांधकामावरील कारवाई या सर्व गोष्टींचा मी स्वतः पाठपुरावा घेऊन त्यांच्यावर कारवाई होईल, याची ग्वाही देतो, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. या वेळी ह.भ प. संतोष महाराज सते उपस्थित होते.
सहभागी संघटना : भैरव भवानी राजपूत संस्था, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, सकल हिंदु समाज, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच आसाराम बापू संप्रदाय अन् सनातन संस्था
पक्ष : मनसे, शिवसेना