संस्कारांची शिदोरी !
आंध्रप्रदेशमध्ये अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम् मंडल भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेत शिकणारी इयत्ता सहावी-सातवीची म्हणजेच अवघ्या ११-१२ वर्षांची जवळपास १६ मुले ‘बिअर पार्टी’ करतांना आढळली. सुरक्षारक्षकाने याचा व्हिडिओ काढला. एका पडीक इमारतीत ही मुले मेजवानी करत होती. शासकीय निवासी शाळेचे प्रशासन आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रसंग आहे. मुलांकडे पालकांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, संस्कारक्षम वयात धर्माचरण, नीतीमत्ता अथवा नैतिक मूल्यांचे संवर्धन कसे करावे ? याचे न मिळालेले शिक्षण आणि नको त्या वयात आभासी जगाच्या माध्यमातून होणारे कुसंस्कार यांमुळेच मुले अशा प्रकारच्या कृती करण्यास धजावतात. यामध्ये मुलांपेक्षा पालक अधिक दोषी आहेत. प्रथम ‘पालकांची कर्तव्ये काय आहेत ?’, याचा विचार पालकांनी करावयास हवा. ‘मुलांवर संस्कार कोण करतो ?’, याचे उत्तर आचार्य विनोबा भावे यांनी दिले आहे. ते म्हणतात, ‘मुलांवर संस्कार करणारी आईच असते आणि मूलही नकळत तिचे संस्कार उचलत असते.’ धर्माचरण आणि धर्मपालन यांची शिदोरी पालकांनी मुलांना द्यायची आहे.
सांप्रत काळी सामाजिक परिस्थिती झपाट्याने पालटत असली, तरीही आपल्या बाळावर सुसंस्कार होण्याच्या दृष्टीने आई-वडिलांनीच दक्षता घेणे आवश्क आहे. धूम्रपान करणार्या स्वतःच्या वडिलांना पाहून छोट्या मुलालासुद्धा दोन बोटे तोंडाशी नेण्याचा मोह होतोच. मुलांच्या संस्कारक्षम वयात जे संस्कार होतात, तेच वळण मुलांना लागते. तेच संस्कार मुलाला योग्य मार्गावर रहाण्याच्या दृष्टीने उपयोगी पडतात. म्हणूनच पालकांवर मुलांना सुसंस्कृत करण्याचे, वळण लावण्याचे दायित्व सर्वांत आधी आहे. यासाठी त्यांनी पद्धतशीर प्रयत्न करण्याची आणि कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. शाळा प्रशासनही या र्हासाला तितकेच उत्तरदायी ठरते. पालकांनी मोठ्या विश्वासाने पाल्यांना निवासी शाळांमध्ये घातले आहे, तर मुलांचे सर्वतोपरी रक्षण करणे, हे शाळा प्रशासनाचे दायित्व आहे. सुरक्षारक्षकाचे लक्ष चुकवून विद्यार्थी रात्रीच्या वेळेस निवासाच्या बाहेर कसे जाऊ शकतात ? मुलांच्या संपर्कात बाहेरील कोण आणि कशा व्यक्ती येतात ? अशा अयोग्य वस्तू त्यांना कशा प्रकारे आणि कुठून उपलब्ध होतात ? शाळेतील कर्मचारी वर्ग त्यांना अल्पशा लाभासाठी साहाय्य करत नाही ना ? शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत मुले काय करतात ? त्यांना काही अयोग्य सवयी तर लागत नाहीत ना ? यावर शाळा प्रशासनाने कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. देशाच्या भावी नागरिकांचे जीवन घडवण्याचे शिवधनुष्य शिक्षक आणि पालक यांना त्यांना संस्कार, प्रेम अन् शिस्त यांची शिदोरी देऊन पेलावयाचे आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.