अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या बालरूपातील श्रीराममूर्तीची ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
१. अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीत १२.८ टक्के श्रीरामतत्त्व असणे
‘कर्नाटक येथील मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या बालरूपातील श्रीरामाच्या (श्री रामललाच्या)(टीप) मूर्तीत प्राणप्रतिष्ठेपूर्वीच १२.८ टक्के श्रीरामतत्त्व होते. सध्याच्या कलियुगात श्री रामललाच्या मूर्तीत अधिकाधिक २० टक्के एवढ्या प्रमाणातच श्रीरामतत्त्व आकृष्ट होऊ शकते. या अनुषंगाने ‘या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली नसतांनाही त्यात १२.८ टक्के एवढे श्रीरामतत्त्व जाणवले’, हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
टीप – श्री रामलला म्हणजे श्रीरामाचे बालरूप
१ अ. श्री रामललाच्या मूर्तीत श्रीरामतत्त्व कार्यरत होण्यामागील कारणे
टीप १ – मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ६ मास व्रतस्थ राहून भावपूर्णपणे आणि शुद्ध अंतःकरणाने मूर्तीची निर्मिती केली. त्यांच्यातील भावामुळे मूर्तीमध्ये सर्वाधिक श्रीरामतत्त्व आकृष्ट झाले.
टीप २ – अनेक देवता आणि ऋषिमुनी यांनीही सूक्ष्मातून मूर्तीकार अरुण योगीराज यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर विचार देऊन मार्गदर्शन केल्यामुळे ते ही मूर्ती घडवू शकले.
१ आ. श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेचे प्रमाण
२. हिंदु राष्ट्रासाठी (रामराज्यासाठी) सर्व भक्तांना शक्ती आणि चैतन्य देणारी श्री रामललाची मूर्ती !
श्रीरामाचा महिमा सांगतांना संत तुलसीदास म्हणतात,
‘मंगल भवन अमंगल हारी।’
अर्थ : तो (साधक आणि भक्त यांचे ) मंगल करणारा आणि अमंगल (त्रास आणि पीडा यांचे) हरण करणारा आहे.’
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या ‘भाव + आनंद = मंगलता’, असे आहे. श्री रामललाच्या मूर्तीत भाव आणि आनंद सर्वाधिक अन् सम प्रमाणात आहे. यांतून ‘श्री रामलला हे मंगलतेचे आणि येणार्या हिंदु राष्ट्रासाठी (रामराज्यासाठी) सर्व भक्तांना शक्ती अन् चैतन्य प्रदान करणारे रूप आहे’, असे लक्षात आले.
३. श्री रामललाच्या दर्शनाने होणारे आध्यात्मिक लाभ !
३ अ. दर्शनार्थींचे अंतर्चक्षू जागृत करून त्यांना साधनेची प्रेरणा देणारे ‘नयनाभिराम’ श्री रामलला ! : आध्यात्मिकदृष्ट्या श्री रामललाचे हे रूप ‘नयनाभिराम, म्हणजे डोळ्यांना आनंद देणारे आहे. श्री रामललाचे दर्शन घेतल्यामुळे दर्शनार्थींची वृत्ती अंतर्मुख होऊन त्यांना देवाची अनुभूती येईल. त्यांच्या अंतर्दृष्टीवरील मायेचे आवरण काही प्रमाणात न्यून होऊन त्यांचे अंतर्चक्षू जागृत होतील, म्हणजेच त्यांना साधना करण्याची प्रेरणा मिळेल.
३ आ. श्री रामललाचे दर्शन घेतांना अनाहतचक्राद्वारे सकारात्मक ऊर्जेचा देहात प्रवेश झाल्यामुळे दर्शनार्थी भावजागृती अनुभवतील, तर साधक आनंद अनुभवतील ! : श्री रामललाचे दर्शन घेणार्या श्रद्धाळूंच्या अनाहतचक्राद्वारे सकारात्मक ऊर्जेचा त्यांच्या देहात प्रवेश होईल. अनाहतचक्र मनाशी निगडित असल्यामुळे श्री रामललाचे दर्शन घेणार्या श्रद्धाळूंच्या मनात चालू असलेले विचार न्यून होऊन हळूहळू त्यांचा भाव जागृत होईल. ज्या साधकांनी भावजागृतीचा टप्पा ओलांडला आहे, ते साधक श्री रामललाचे हे रूप बघतांना आनंद आणि काही प्रमाणात समाधान अनुभवतील.
३ इ. श्री रामललाच्या तेजतत्त्व प्रधान मूर्तीच्या दर्शनामुळे त्रितेज, म्हणजे क्षात्रतेज, धर्मतेज आणि ज्ञानतेज मिळणे : श्री रामललाची ही मूर्ती तेजतत्त्वप्रधान असून त्यात त्रितेज, म्हणजे क्षात्रतेज, धर्मतेज आणि ज्ञानतेज कार्यरत आहे. मूर्तीतील क्षात्रतेजामुळे दर्शनार्थींवरील अनिष्ट शक्तींचे आवरण (काळ्या शक्तींचे आवरण किंवा त्यांना होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास) दूर होईल. धर्मतेजामुळे दर्शनार्थींना धर्माचे आणि सत्प्रवृत्तीयुक्त आचरण करण्याची प्रेरणा मिळेल, तर ज्ञानतेजामुळे दर्शनार्थींना साधना म्हणून राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.
३ ई. श्री रामललाच्या मूर्तीतील आकर्षण शक्तीमुळे दर्शनार्थींचे मन त्वरित निर्विचार आणि एकाग्र होईल ! : श्री रामललाच्या मूर्तीत, विशेष करून चेहर्याच्या भागात आकर्षण शक्ती कार्यरत आहे. यामुळे मूर्तीच्या चेहर्याकडे सहजतेने दर्शनार्थींचे मन ओढले जाईल. मूर्तीतील आकर्षण शक्तीमुळे दर्शनार्थींचे मन पटकन निर्विचार आणि एकाग्र होऊन त्याला सूक्ष्मातील अनुभूती ग्रहण करणे तुलनेत सोपे होईल.
४. श्री रामललाच्या मूर्तीची सूक्ष्मातून जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये
अ. श्री रामललाच्या मूर्तीत ६५ टक्के सगुण तत्त्व, तर ३५ टक्के निर्गुण तत्त्व कार्यरत आहे. त्यामुळे श्री रामललाचे दर्शन करणार्या भाविकाला सगुण-निर्गुण तत्त्वाचा लाभ होईल.
आ. श्री रामललाच्या मूर्तीभोवती भावप्रधान निळ्या रंगाची, त्यानंतर चैतन्यप्रधान पिवळ्या रंगाची आणि त्यानंतर निर्गुणप्रधान पांढर्या रंगाची प्रभावळ कार्यरत आहे.
इ. श्री रामललाच्या मूर्तीकडून तारक तत्त्व प्रक्षेपित होतांना मूर्तीचे गालावरील उंचवटे सूक्ष्मातून गुलाबी रंगाचे दिसतात.
ई. श्री रामललाच्या मूर्तीतून ८५ टक्के तारक तत्त्व, तर १५ टक्के मारक तत्त्व प्रक्षेपित होते. यामुळे चैतन्य मिळवण्यासाठी ही मूर्ती पूरक आहे.
उ. श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य भू, भुवर् आणि स्वर्ग या लोकांपर्यंत मर्यादित न रहाता महर्लाेकापर्यंत प्रक्षेपित होत आहे.
५. कृतज्ञता
‘करुणाघन भगवान श्रीराम आणि श्रीरामस्वरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला हे सूक्ष्म परीक्षण करता आले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२४, दुपारी १ ते १.३७)
सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारणसूक्ष्म ज्ञानाविषयीच्या स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. |
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |