अमळनेर साहित्य संमेलनात तरी मराठीच्या हिताचे ठराव होतील का ?
महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांचा महामंडळाला प्रश्न !
नागपूर – ‘८-८ मंत्र्यांच्या उपस्थितीत अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठीसमोर, तसेच मराठी माध्यमाच्या समोर कधी नव्हे एवढी आव्हाने आज उभी आहेत; मात्र याविषयीचे ठराव या साहित्य संमेलनात होतील का ?’, असा प्रश्न महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रातून केला आहे.
श्रीपाद जोशी यांनी पत्रात म्हटले आहे की,…
१. केवळ टाळ्या वाजवण्यासाठी ७५ सहस्र रुपये देऊन विदेशातील रसिकांना संमेलनात बोलावण्यात येत आहे. अशा प्रकारे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय शासकीय विश्व मराठी संमेलन करत आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध अमळनेर येथील संमेलन करणार का ? ही उधळपट्टी थांबवायला निघालेल्या आणि कुणा एकालाच कंत्राट देण्याला विरोध करणार्या मराठी भाषा विभाग सचिवांचे मनमानी पद्धतीने तडकाफडकी स्थानांतर का केले गेले ? त्याचा निषेध संमेलन करणार का? मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विकास इत्यादींची भाषा करण्यासाठी हवे असलेले मराठी विद्यापीठ स्थापण्याचा ठराव करणार का ?
२. गेल्या १० वर्षांपासून मराठी भाषा धोरण घोषित करण्याचे सरकार सतत टाळत आहे. त्याचा निषेध करत भाषा धोरण घोषित करण्याचा आग्रह धरणारा ठराव संमेलन करणार का ? मराठी माध्यमाच्या बंद पडणार्या शाळा चालू करण्यासाठी आणि नव्याने बंद न होण्यासाठी मागणी करणारे ठराव करणार का ?
३. ‘मराठीला अभिजात दर्जा देण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही’, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी राज्यसभेत ३ ऑगस्ट २०२३ या दिवशी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निषेध करत मराठीला अभिजात दर्जा न देणे हा मराठीचा अवमान आहे. ते मराठी सहन करणार नाही, हे सांगणारा आणि तो दर्जा मिळालाच पाहिजे, हा ठराव हे संमेलन पुन्हा करणार का ?