मोहनदास गांधी यांनी शास्त्राविषयी विचारलेल्या प्रश्नाचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांनी दिलेले उत्तर
‘मोहनदास गांधी यांनी वेद, श्रुति, स्मृति, पुराणे आणि शास्त्र यांविषयी विचारलेल्या प्रश्नावर पंढरपूर येथील पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
अ. शास्त्र म्हणजे काय ?
उत्तर : ‘सुख मिळण्याचा आणि दुःख टाळण्याचा उपाय ज्यावरून समजतो ते शास्त्र म्हणजे वेद. वेदांशी अविरोधी स्मृति, पुराणे इत्यादी.
‘न चातीन्द्रियानर्थान् श्रुतिमन्तरेण कश्चिदुपलभत इति शक्यं सम्भावयितुं निमित्ताभावात् ।’ (ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य, अध्याय २, पाद १, सूत्र १) म्हणजे ‘अतींद्रियार्थ श्रुतींखेरीज कुणालाही कळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे अयोगीप्रत्यक्ष हे मूळ संभवत नाही.’
अशा अर्थाच्या
प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते ।
एनं विदन्ति वेदेन तस्माद्वेदस्य वेदता ।।
– सायणाचार्य (ऋग्वेदादिभाष्यभूमिका)
अर्थ : प्रत्यक्ष किंवा अनुमानाने ज्या सुखाच्या, तसेच दुःखापासून निवृत्तीच्या उपायाचे परिज्ञान होऊ शकत नाही, त्याला लोक वेदांपासून जाणतात. म्हणून त्यांना ‘वेद’ म्हणतात.
या वचनावरूनही वरील म्हणण्यातच पुष्टी मिळते. श्रुति आणि वेद एकच होत.
१. धर्म हा श्रुतिस्मृतींपासूनच प्रगट होतो !
अशा प्रकारे हितानुशासक म्हणून श्रुतीच (वेदच) शास्त्र होय. ही जरी वस्तूस्थिती आहे, तरी स्मृति, पुराणे, शिष्टाचार यांचाही शास्त्रांत समावेश करावा लागतो. श्रुतीनेही ‘यद्वै किं च मनुरवदत्तद्भेषजम् ।’ (तैत्तिरीयसंहिता, काण्ड २, प्रपाठक २, खण्ड १०), म्हणजे ‘जे काही मनूने सांगितले, ते औषध आहे.’ अशी मनूची प्रशंसा करून स्मृतीच्या प्रामाण्यास मान्यता दिली आहे.
श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृतिः ।
ते सर्वार्थेष्वष्वमीमांस्ये ताभ्यां धर्माे हि निर्बभौ ।।
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १०
अर्थ : श्रुति म्हणजे वेद आणि स्मृति म्हणजे धर्मशास्त्र. या दोन्हींमध्ये जे सांगितले आहे, त्याची अतिचिकित्सा करू नये. धर्म या श्रुतिस्मृतींपासूनच प्रगट होतो.
या मनुवचनावरून श्रुतीप्रमाणेच मानवी हिताहितबोधनाच्या कामी स्मृतीही निःशंक स्वीकाराव्या लागतात; म्हणूनच ‘स्मृतींना धर्मशास्त्र’, असे म्हटले आहे, हे उघड आहे.
२. वेदांमधील विधानांची यथार्थता !
स्मृतीप्रमाणेच पुराणेही धर्मासंबंधी विचारात अवश्य स्वीकारावी लागतात. जर पुराणांचा स्वीकार केला नाही, तर अमक्या मासात अशा प्रकारे अमुक व्रत आचरावे, अमक्या तिथीस प्रभु श्रीरामचंद्राचे आणि भगवान श्रीकृष्णाचे जन्मोत्सव मंगल करावे. माघस्नान, वैशाखस्नान इत्यादीकांचे नियम अमुक आहेत. दसरा, दिवाळी, पाडवा हे सण अमके दिवशी अमुक रितीने पाळावेत. श्रावणी सोमवार, एकादशी, प्रदोष, चतुर्थी इत्यादी व्रते कशी आणि का करावीत ? हे कळणार नाही आणि सर्व व्रते वैकल्ये, सणवार, लहान-मोठे उत्सव यांना चाट द्यावी लागेल. फार काय श्रुतीत सूत्रमय सांगितलेल्या गोष्टींचे ज्ञान होण्याचे सामर्थ्य सध्याच्या लोकांत नाही आणि पुराणांना तर प्रमाण मानावयाचे नाही. मग श्रीरामकृष्णादि देव कुठले ? त्यांच्या मूर्ती कुठल्या ? त्यांची देवळे कशाची ? सबब स्मृतीप्रमाणे पुराणे ही धर्माधर्मविचारांत शास्त्रे म्हणून घ्यावी लागतातच. कोणत्याही कर्मांचे आरंभी केल्या जाणार्या ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् ।’ म्हणजे ‘वेद, स्मृतीग्रंथ आणि पुराणे यांत सांगितलेले फळ प्राप्त होण्यासाठी’ या संकल्पावरून वरील विधानांची यथार्थता घडेल.
३. स्मृतिपुराणांना शास्त्र म्हटले जाते !
तात्पर्य ‘शास्त्रयोनित्वात् ।’ (ब्रह्मसूत्र, अध्याय १, पाद १, सूत्र ३), म्हणजे ‘ईश्वर शास्त्र म्हणजे वेदांचे कारण आहे’, या सूत्रात आणि त्यावरील ‘महतः ऋग्वेदादेः शास्त्रस्य ।’ म्हणजे ‘ऋग्वेद इत्यादी मोठ्या शास्त्रांचे’ या भाष्यात वेदाला शास्त्र म्हटल्याचे स्पष्ट आहे. तसेच ‘धर्मशास्त्रं तु वै स्मृतिः ।’ (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १०), म्हणजेच ‘स्मृति म्हणजे धर्मशास्त्र’, या वचनावरून स्मृतींना जसे धर्मशास्त्र या नावाने संबोधण्यात येते, तसे पुराणे, निबंधग्रंथ, शिष्टाचार इत्यादींनाही शास्त्रच समजले पाहिजे. ‘यः शास्त्रविधिमुत्सृज्य ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोक २३), म्हणजे ‘जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून’ यावरील मधुसूदनस्वामींच्या व्याख्येत ‘शास्त्रं वेदः तदुपजीवि स्मृतिपुराणादि च ।’, म्हणजे ‘शास्त्र, वेद यांवर आधारित असलेले स्मृतीग्रंथ, पुराणे आदी’, असे म्हटले आहे.
वेद, तद्पजीवी (तन्मूलक) किंवा निदान तद्विरुद्ध स्मृतिपुराणे, निबंध, शिष्टाचार यांना वरील प्रमाणावरून शास्त्र म्हटले जाते, हे स्पष्ट झाले आहे.
४. ४ वेद, ४ उपवेद आणि ६ वेदांगे म्हणजे १४ विद्या !
श्रुतीचा योग्य अर्थ लावण्यासाठी पुराणाप्रमाणेच महाभारताचे (इतिहासाचे) साहाय्य घ्यावे, असे ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।’ (महाभारत, पर्व १, अध्याय १, श्लोक २०४), म्हणजे ‘इतिहास आणि पुराणे यांद्वारे वेदांचा अर्थ समजून घ्यावा.’ या प्रमाणावरून जसे सिद्ध होते, तसेच जेथे श्रुतिस्मृतींचा योग्य अर्थ करणे सामान्य दृष्टीने कठीण जाते, तेथे निबंधादि ग्रंथावरून अर्थादि पंचरात्रादि आगम इत्यादींमधून अनादी परंपरेने शिष्ट लोक कोणता अर्थ गृहित धरतात, हे पाहून तोच अर्थ ठरवावा लागतो. अशा रितीने श्रुति-स्मृति-पुराणे-शिष्टाचार-निबंध हे धर्माधर्मनिर्णयांत शास्त्र म्हणून स्वीकारावे लागतात. याच दृष्टीने
‘पुराणं न्याय मीमांसा धर्मशास्त्राङ्गमिश्रिताः ।
वेदाः स्थानानि विद्यानां धर्मस्य चतुर्दश ।।
अर्थ : पुराणे, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र समाविष्ट असलेले ४ वेद, ४ उपवेद आणि ६ वेदांगे मिळून १४ विद्या असे म्हटले आहे’, असे स्मृतिकारांनी म्हटले आहे.
आ. शास्त्रग्रंथांची प्रामाणिकता कशी सिद्ध केली जाईल ?
उत्तर : मुख्यतः शास्त्र म्हणजे वेद आणि ते अपौरुषेय नित्य असे असल्यामुळे ते स्वतः प्रमाण आहेत. त्यांची प्रामाणिकता सिद्ध करण्यास दुसर्या प्रमाणाची अपेक्षा नाही.
‘वेदस्य हि निरपेक्षं स्वार्थे प्रामाण्यं रवेरिव रूपविषये ।’ (ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य, अध्याय २, पाद १, सूत्र १), म्हणजे ‘सूर्याचा प्रकाश हा आपल्या आकृतीसंबंधी ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण (साधन) आहे.’ स्मृत्यादिक हे वेदमूलक असल्यामुळे तेही प्रमाण आहेत.
सर्व आस्तिक अनादि कालापासून वेदांचे प्रामाण्य मान्य करत आले आहेत. तसेच सर्व दर्शनकार आणि स्मृति, पुराणे, सूत्रे हेही वेदच प्रमाण असल्याची ग्वाही देत आहेत. ‘आज वेदांच्या इतका कोणताही धर्मग्रंथ प्राचीन असल्याचा पुरावा पुढे येत नाही आणि तसे कुणी म्हणतही नाही. वेद हे अनादि कालापासून अविच्छिन्न गुरुपरंपरेने प्राप्त झालेले असे आहेत, त्यांचा कुणी कर्ता उपलब्ध नाही. वेदांतील शब्द, त्यांचे अर्थ आणि त्या शब्दार्थांचा परस्पर संबंध हा नित्य असल्याने वेद नित्य आहेत’, असे जैमिनी महर्षि आणि भगवान वेदव्यास हे ‘औत्पत्तिकस्तु शब्दस्यार्थेन सम्बन्धः ।’ (पूर्वमीमांसादर्शन, अध्याय १, पाद १, सूत्र ५), म्हणजे ‘शब्दाचा अर्थासोबत अकृत्रिम (सहज) संबंध असतो’ आणि ‘अत एव च नित्यत्वम् ।’ (ब्रह्मसूत्र, अध्याय १, पाद ३, सूत्र २९), म्हणजे ‘याद्वारेच वेदांचे नित्य असणे सिद्ध होते’, या सूत्रांनी स्पष्ट करत आहेत.
वेद अपौरुषेय, अनादि, नित्य सर्व ज्ञानकर असे असल्याने ते स्वतःचा अर्थ प्रतिपादन करण्यात स्वतः प्रमाण आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेस इतर प्रमाणाची आवश्यकता नाही. असे प्रत्यक्ष प्रमाण हे स्वतः प्रमाण आहे. तसे वेदही स्वतः प्रमाणच आहेत; म्हणून वेदांना कुठे कुठे प्रत्यक्ष संबोधण्याची पद्धत आहे.
– लेखक : पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर, पंढरपूर