अयोध्येत झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी सनातनचे संत आणि साधक यांना वाईट शक्तींनी त्रास देणे
१. अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी सायंकाळी त्रास होऊ लागल्यावर त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून तो करण्यास आरंभ करणे
‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार होती. त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता मला अचानक अस्वस्थता जाणवू लागली, तसेच मला माझ्या पोटामध्ये कडकपणा जाणवू लागला. त्यामुळे मी स्वत:साठी आध्यात्मिक उपाय शोधला. तेव्हा मला माझे आज्ञाचक्र आणि मणिपूरचक्र यांवर त्रास जाणवला. उपायामध्ये मला ‘निर्गुण’ हा नामजप आला. त्यामुळे मी माझा उजवा तळहात आज्ञाचक्रासमोर आणि डावा तळहात मणिपूरचक्रासमोर १ – २ सें.मी. अंतरावर धरला अन् ‘निर्गुण’ हा नामजप करत स्वतःवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास आरंभ केला.
२. सलग पावणे दोन घंटे नामजप करूनही त्रास अल्प न होणे आणि यावरून ‘वाईट शक्ती किती बळ एकवटून आक्रमण करत आहेत’, हे लक्षात येणे
मी सायंकाळी ५.४५ ते ७.३० असा सलग पावणे दोन घंटे नामजप केला; पण तरीही माझा त्रास अल्प झाला नाही. मला माझ्या पोटामध्ये जाणवत असलेला कडकपणा एवढा वेळ उपाय करूनही आधी होता तसाच जाणवत होता. त्यामुळे माझा नामजपही ‘निर्गुण’ या नामजपावरून अल्प स्तराचा, म्हणजे ‘महाशून्य’ किंवा ‘शून्य’ झाला नाही. यावरून ‘वाईट शक्ती किती बळ एकवटून आक्रमण करत आहेत’, हे माझ्या लक्षात आले !
३. स्वतः, सर्व साधक आणि सनातनचे तिन्ही गुरु या सर्वांवर आध्यात्मिक उपाय होण्यासाठी प्रार्थना करून शरणागत भावाने उपाय केल्यावर रात्री ८.३० वाजता स्वतःला हलके वाटू लागणे, तसेच वातावरणातही हलकेपणा जाणवू लागणे
‘वाईट शक्तींचे साधकांवरील हे समष्टी आक्रमण आहे’, हे माझ्या लक्षात आले. मग मी केवळ माझ्या स्वतःवरच नव्हे, तर सर्व साधक, तसेच सनातनचे तिन्ही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्यावरही आध्यात्मिक उपाय होण्यासाठी प्रार्थना केली. ती क्षमता माझ्यामध्ये येण्यासाठीही मी प्रार्थना केली आणि पूर्ण शरणागत भावाने उपाय करणे चालू केले. तेव्हा रात्री ८.३० वाजता मला हलके वाटू लागले. त्या वेळी मला होत असलेला त्रास पूर्णपणे दूर झाला होता, तसेच वातावरणातही हलकेपणा जाणवू लागला होता.
४. आश्रमातील काही साधकांना सायंकाळी ५.४५ ते ८.१५ या वेळेत अस्वस्थता जाणवत असणे
रात्री ९.१५ वाजता मला कळले की, आश्रमातील साधकांनाही सायंकाळी ५.४५ ते ८.१५ या वेळेतच त्रास होत होता आणि त्यांपैकी कुणाचे मन अस्वस्थ झाले होते, कुणाचे पोट दुखत होते, तर कुणाला मळमळत होते.
५. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे ती एक प्रकारे रामराज्य येणार असल्याची नांदीच असणे, सनातनचे साधकही रामराज्य आणण्यासाठी गेली २४ वर्षे समष्टी साधना करत असणे आणि म्हणून वाईट शक्तींनी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला साधकांवर मोठे आक्रमण केले असणे
दुसर्या दिवशी (२२.१.२०२४ या दिवशी) अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिरात बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापित होणार होती. ही एक मोठी समष्टी घटना होती. त्यासाठी देशभरातील बहुसंख्य हिंदू एकवटले होते आणि उत्साहाने या घटनेसाठी सिद्धता करत होते. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे एक प्रकारे ती रामराज्य येणार असल्याची नांदीच (आरंभस्वरूप ग्वाही) होती. सनातनचे साधकही रामराज्य आणण्यासाठी गेली २४ वर्षे समाजजागृती करणे, धर्मजागृती करणे, समाजाला साधना सांगणे अशा प्रकारे अखंड समष्टी साधना करत आहेत. वाईट शक्तींना रामराज्य नको आहे; म्हणून त्यांनी रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्या साधकांवर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला (आदल्या दिवशीच्या संध्याकाळी) त्यांच्यावर मोठे आक्रमण केले होते. यावरून साधकांनी रामराज्य येण्यासाठी साधना आणखी वाढवली पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे, हे लक्षात येते !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.१.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |