मनोज जरांगे मनुवादी वृत्तीचे ! – माजी आमदार
लक्ष्मण माने यांचा आरोप
पुणे – मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही, त्यामुळे जरांगे हे मनुवादी वृत्तीचे असल्याचे लक्षात येते, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही; मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मागासवर्गीय जातींवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. सर्वाधिक आमदार, खासदार मराठा समाजाचे आहेत. सहकारी संस्थाही मराठ्यांच्या हातात असून सर्व क्षेत्रात त्यांचे वर्चस्व असतांना आरक्षणाची आवश्यकता का भासते ? याचा विचार मराठा समाजाने करावा, असे माने यांनी सांगितले.