श्रीराममंदिर झाले, आता ‘रामराज्य’ आणण्यासाठी प्रयत्न करूया ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था
भांडुप येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) – ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीराममंदिर उभारले गेले. आता त्यातच समाधान न मानता रामराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना या भारतभूमीत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मुंबईतील भांडुप येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. येथील अशोकनगरमधील श्री दत्त मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.
सभेचा आरंभ प्रार्थना आणि श्री गणेशाच्या श्लोकाने करण्यात आला. हिंदु जनजागृती सभेच्या व्यापक कार्याची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. जळगाव येथे झालेल्या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ची काही क्षणचित्रेही या वेळी ‘प्रोजेक्टर’च्या माध्यमातून दाखवण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. संदीप गवंडी यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. विनोद शिंदे आणि दत्त मंदिराचे विश्वस्त श्री. पांडुरंग गावकरगुरुजी यांच्यासह सभेला मोठ्या संख्येने धर्मनिष्ठ हिंदूंनी उपस्थिती दर्शवली. सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन या वेळी सभागृहाबाहेर लावण्यात आले होते.
विशेष सहकार्य
दत्त मंदिराचे विश्वस्त श्री. पांडुरंग गावकरगुरुजी यांनी हिंदु-राष्ट्र जागृती सभेसाठी दत्त मंदिराचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.