विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी देण्याच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका !

पुणे – ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी देण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका होत आहे. विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल किंवा हिरवा ठिपका दिल्याने भेदभाव निर्माण होऊ शकतो. हा निर्णय अतार्किक असल्याने यावर शिक्षण क्षेत्रातून टीका होत आहे. (पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याविषयी प्रशासन प्रयत्न करणार का ? – संपादक) अंडी खाणार्‍या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल, तर अंडी न खाणार्‍या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरवा ठिपका देण्याचे परिपत्रकात नमूद केले आहे; मात्र बहुतांश जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडे ओळखपत्रे नाहीत. त्यामुळे ‘ठिपका देण्यासाठी ओळखपत्र देण्याचा खर्च शिक्षण विभाग करणार का ?’ असा प्रश्न ‘ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्रा’चे संयोजक विक्रम अडसूळ यांनी उपस्थित केला. ‘इस्कॉन’ला धोरणान्वये अंडी देता येणार नसल्यास स्थानिक पातळीवर व्यवस्था निर्माण करावी, असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले.