२५५ दिवसांपासून आंदोलनाची नोंद न घेतल्याने उपोषणस्थळीच आंदोलनकर्त्याची आत्महत्या !
मोर्शी (अमरावती) येथे प्रजासत्ताकदिनी घडली दुर्दैवी घटना !
अमरावती – ‘माझ्या मरणाला सरकार उत्तरदायी आहे; परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये, हीच माझी शेवटची इच्छा’, अशी चिठ्ठी लिहून उपोषण मंडपातच गळफास घेऊन आंदोलनकर्त्याने आत्महत्या केली. ही घटना जिल्ह्यातील मोर्शी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी घडली. गोपाल दहिवडे (वय ४८ वर्षे) असे आत्महत्या करणार्याचे नाव आहे.
‘अप्परवर्धा धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यात यावा, या आणि इतर मागण्यांसाठी मागील २५५ दिवसांपासून मोर्शी येथे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चालू आहे. या ८ मासांत ७ मोठ्या स्वरूपाची आंदोलने करण्यात आली; मात्र तरीही सरकारने त्यांची नोंद घेतली नाही. अमरावती जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलप्रकल्प अप्पर वर्धा ४२ गावांना उठवून पूर्ण झाला आहे; मात्र गेल्या ३८ वर्षांनंतरही ४ सहस्र ५०० हून अधिक धरणग्रस्तांना न्याय मिळाला नाही. ९ जानेवारी या दिवशी धरणग्रस्तांनी जिल्हा प्रशासनासमवेत चर्चा केली, या वेळी जिल्हा प्रशासनाने त्यांना १५ दिवसांचा वेळ मागितला; मात्र मागण्या मान्य न झाल्यास अप्पर वर्धा धरणातच आम्ही जलसमाधी घेऊ, अशी चेतावणी धरणग्रस्तांनी दिली होती. अशातच ही घटना घडली.
सरकारने राज्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न अद्याप सोडवलेले नाहीत. त्यामुळे अनेक आंदोलने करूनही धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने आता आंदोलनकर्ते आत्महत्या करत आहेत. याला सर्वस्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन उत्तरदायी आहेत. यातून त्यांनी योग्य मार्ग काढायला हवा ! |