पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ६ किलो सोने ‘डी.आर्.आय.ने’ जप्त केले !
एका महिलेसह दोघांना अटक !
पुणे – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ६ किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचालनालयाने (डी.आर्.आय.ने) जप्त केले आहे. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती डी.आर्.आय.च्या अधिकार्यांनी दिली. ४ दिवसांपूर्वी ‘कस्टम’च्या (सीमा शुल्कच्या) पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त केले होते.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला येणार असल्याची माहिती ‘डी.आर्.आय.’च्या (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी विमानतळावर सापळा लावला. विमानतळावर महिला साथीदारासह उतरल्यानंतर डी.आर्.आय.च्या पथकाने संशयावरून दोघांची चौकशी चालू केली. आरोपींनी ६ किलो ९१२ ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची पावडर केली होती. ती पावडर त्यांनी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवली होती. पडताळणीत ही गोष्ट पथकाच्या लक्षात आली.
संपादकीय भूमिका :महिलांनी अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेणे दुर्दैवी ! |