हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाची पंच्याहत्तरी आणि आव्हाने !
२६ जानेवारी २०२४ या दिवशी ‘प्रजासत्ताकदिन’ झाला. त्या निमित्ताने…
१. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार आणि स्वातंंत्र्य यांचा नेमका अर्थ आपल्याला उमगला ?
स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील तरुणांसमोर स्वातंत्र्यप्राप्ती हे ध्येय होते. देशाने स्वातंंत्र्य प्राप्त केल्यानंतर ‘स्वत्व आणि आपल्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान जनतेने जतन करावा’, असा कोणताही प्रयत्न सरकारी पातळीवर करण्यात आला नाही. राजकीयदृष्ट्या देश स्वतंत्र झाला; पण मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून तो मुक्त झाला नाही. आपण आपली शिक्षणपद्धत आपल्या समाजहिताला, राष्ट्रहिताला अनुकूल ठरणारी, तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा जाज्वल्य अभिमान निर्माण करणारी अशी अस्तित्वात आणू शकलो नाही. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार आणि स्वातंंत्र्य यांचा नेमका अर्थ आपल्याला उमगला नाही. किंबहुना देशातील साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी स्वतःचा बौद्धिक आतंकवाद निर्माण केला. या सर्व गोष्टींना हेतूत: नेहरूंनी खतपाणी घातले. परकीय आक्रमकांनी विकृत केलेला इतिहास पालटण्याचा सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात आला नाही. हिंदू सोडून अन्य धर्मियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची अनुमती देण्यात आली. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती नष्ट करण्यामागचा हा कुटील डाव मग टाकण्यात आला.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अमर्यादित उपयोग करून देशातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. अत्यंत कष्टाने देशाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याऐवजी त्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा गळा घोटण्यासाठी सत्ताधिशांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केला. सुसंस्कृत आणि सुविद्य विचारसरणी देशात रूजवण्याऐवजी विकृत विचारसरणीला खतपाणी घातले. त्यामुळे देशात फुटीरता आणि विद्वेष यांचे तण अमाप वाढले.
२. भारतापुढील आव्हाने !
२ अ. आज खर्या अर्थाने देश कात टाकून अभिमानाने जगात वावरत असतांना साम्यवाद्यांची अविचारी चळवळ आजही अपशकुन करत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देश स्वावलंबी व्हावा, लष्करीदृष्ट्या प्रबळ व्हावा आणि सर्व क्षेत्रांत आघाडीवर राहिला पाहिजे; म्हणून प्रयत्न करण्यात आले नाहीत. सर्वांत मोठी लोकशाही असलेला बलहीन, स्वाभिमान शून्य देश म्हणून जग हिंदुस्थानकडे पहात होते. आज जगात आपल्या देशाची प्रतिमा पूर्णपणे पालटली आहे. ही समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. विद्यमान भारत सरकारने एका दशकाच्या अवधित हिंदुस्थानचा कायापालट केला आहे. आत्मनिर्भर, सबल आणि निर्भीड अशी हिंदुस्थानची प्रतिमा आज जगासमोर आहे.
२ आ. तरुणवर्गाचा बुद्धीभेद करण्याच्या प्रयत्नाला वेसण घालण्याचे आव्हान : आजपर्यंत हिंदु समाजावर झालेला अन्याय दूर करून न्याय प्रस्थापित करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. न्याय प्रस्थापित करतांना देशातील फुटीरतावादी वृत्तीच्या उपद्रवाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. देशात अशांतता आणि अराजकता निर्माण व्हावी; म्हणून ही दुष्ट प्रवृत्ती कमालीची सक्रीय होऊ शकते. ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. आज उपलब्ध असलेल्या समाजमाध्यमांचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेचा आणि तरुणवर्गाचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहे. त्याला वेसण घालण्याचे सर्वांत मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. उगवत्या पिढीला स्वातंत्र्याचा नेमका अर्थ समजावून सांगण्याचे दायित्व आपल्यावर आहे.
देशाचे स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या उत्कर्षासाठी, रक्षणासाठी, संघटित समाज निर्माण करण्यासाठी, देशात सलोखा निर्माण करण्यासाठी, देशातील सर्व नागरिक समान आहेत, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही, अशा प्रकारच्या आचार-विचारांना चैतन्य प्रदान करणे होय. स्वातंत्र्याचा अर्थ देशातल्या नागरिकांमध्ये राष्ट्रीय कार्य करण्यासाठी चैतन्य निर्माण करणे असा आहे. त्याचप्रमाणे ‘स्वातंत्र्य ही नैतिक संपदा आहे’ याची जाणीव पिढ्यान्पिढ्या प्रत्येक नागरिकात सजग असली पाहिजे. यासाठी आपल्याला पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतील. त्याची सिद्धता करण्याची हीच योग्य वेळ आहे.
२ इ. मानवतेच्या नावाखाली राष्ट्रहिताला तिलांजली देण्याचा प्रयत्न कठोरतेने मोडून काढण्याचे आव्हान : आज शौर्याला क्रौर्य ठरवून क्रौर्याचे गुणगान गायले जाते. त्याचा समाचार घेऊन शौर्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘मानवता महत्त्वाची आहे, बाकी सर्व गोष्टी गौण आहेत’, असा एककल्ली विचार समाजात आजही फोफावत चालला आहे. तो वेळीच नष्ट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ‘मानवता केवळ हिंदूंनीच दाखवावी आणि इतरांनी अमानवीय कृत्ये उजळ माथ्याने करावीत’, असा मानवतेचा विपरीत अर्थ लावला जात आहे. त्याचा बीमोड करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. मानवतेच्या नावाखाली राष्ट्राच्या हिताला तिलांजली देण्याचा प्रयत्न कठोरतेने मोडून काढावा लागेल, तसेच हिंदु समाजाला त्याच्या संस्कृती आणि धर्मासह समूळ नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर जे षड्यंत्र रचले जात आहे, त्याचा उच्छेद करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
३. हिंदूंची खरी ओळख जगाला करून देणे, हे हिंदूंचेच दायित्व !
जगातील कोणत्याही धर्माशी, पंथाशी हिंदूंचे वैर नाही. हिंदू कुणाचाही द्वेष करत नाहीत.‘ सर्व जग सुविद्य आणि सुसंस्कृत व्हावे, हीच हिंदु समाजाची विचारसरणी आहे’, या सर्वोच्च संस्काराला अनुसरून हिंदू वर्तन करतील. त्याच वेळी जगातील इतरांनी अमानवीय कृत्ये करून हिंदूंच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू त्या दुष्टांशी दोन हात करण्यात सिद्ध आहेत. हे संपूर्ण विश्व आमचे कुटुंब आहे, हा वेदांनी केलेला संस्कार चित्तात जतन करून विश्वसंचार करणारे हिंदू, ही हिंदूंची खरी ओळख जगाला करून देण्याचे दायित्व आपले आहे.
सज्जनांचे रक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे, अन्यायाला गाडून न्याय प्रस्थापित करणे, दीनदुबळ्या लोकांना आधार देऊन त्यांना सबल करणे, जगातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणे, विश्वात समतेची भावना निर्माण करून परस्परांमध्ये स्नेह वृद्धींगत करणे, संघर्ष नव्हे, तर सहकार्य हा मानवी समाजाच्या विकासाचा मूलाधार आहे, याची जाणीव विश्वाच्या मनात दृढमूल करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, विश्वगुरु या पदावर आपल्या देशाला विराजमान होता येईल.
हे विश्वगुरुपद आपल्या हिंदुस्थानला प्राप्त व्हावे, यासाठी नियतीने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे. तिचा सुयोग्य उपयोग करून प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध होऊया. (२६.१.२०२४)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक
संपादकीय भूमिकासज्जनांचे रक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे यांद्वारेच भारत विश्वगुरु पदावर पोचू शकतो ! |