श्रीराममंदिराच्या निमित्ताने…!
‘५०० वर्षे समस्त हिंदुस्थान ज्या घटनेची आतुरतेने वाट पहात होता, त्या अतीभव्य, दिव्य अशा श्रीराममंदिराची उभारणी आणि रामललाची (श्रीरामाच्या बालक रूपाची) प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे एका नवीन कालचक्राला आरंभ झाला आहे. खरे तर भारत स्वतंत्र झाल्यावर, हिंदुस्थानवर स्वारी करणार्या वेगवेगळ्या आक्रमकांनी उद़्ध्वस्त केलेल्या हिंदूंच्या शेकडो श्रद्धास्थानांना मुक्त करण्याचा निर्णय त्याच वेळी घ्यायला पाहिजे होता; परंतु काँग्रेसने आणि तत्कालीन नेहरू, गांधी आदी नेत्यांनी हिंदूंंच्या या धार्मिक भावनांची कधीच कदर केली नाही.
दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत ज्या राम-कृष्ण यांनी सहस्रो वर्षे हिंदूंच्या मनामनावर राज्य केले आहे, ज्यांच्या नावानेही हिंदूंची मने उचंबळून येतात, त्यावर पाणी टाकण्याचे कामच काँग्रेसने केले. खरे तर स्वातंत्र्याच्या वेळी धार्मिक भावना इतक्या टोकदार नव्हत्या आणि तत्कालीन नेत्यांचे देशातील सर्व धर्मार्ंच्या समाजावर मोठ्या प्रमाणावर वजन होते, त्यामुळे कुठलाही संघर्ष न होता मोठ्या श्रद्धेने या मंदिरांची निर्मिती स्वातंत्र्याच्या पहाटकाळातच करता आली असती !
१. काशी, अयोध्या, मथुरा यांच्यासाठीची आंदोलने काँग्रेसने दडपली !
स्वातंत्र्यानंतर जी जी आंदोलने काशी, अयोध्या, मथुरा यांच्या मुक्तीसाठी झाली, ती सर्व सत्तेच्या जोरावर काँग्रेस सरकारने दडपली. आंदोलकांवर सातत्याने अन्याय आणि अत्याचार केले. पुढे इंदिरा गांधींच्या काळात शांततेने आंदोलन करणार्या साधू-संतांवर लाठीमार करण्यासह गोळीबार झाला, तर निःशस्त्र आंदोलन करणार्या रामभक्त कारसेवकांवर समाजवादी पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी गोळीबार करून काळीमा लावली. त्यानंतरही हिंदु सातत्याने काँग्रेस आणि त्याच्या पक्षनेत्यांना निवडून देत आले. ही खरे तर हिंदूंची अतीसहिष्णुवृत्ती; पण हिंदूंच्या धार्मिक भावना सरकार फार काळ दाबून ठेवू शकले नाही.
२. रामललाची मूर्ती पाहून कोट्यवधींच्या नेत्रांतून अश्रू आले !
हिंदूंच्या हा दबलेल्या भावनांना वाट मोकळी करण्याची संधी २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्राप्त झाली. आता शेकडो वर्षे या दबलेल्या भावनांना श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने वाट मोकळी केली गेली; कारण श्रीराममंदिर हा केवळ श्रद्धेेचा विषय नाही. हा संघर्ष केवळ वर्ष १९९२ च्या बाबरी ढाच्याच्या पतनापासूनचा नाही, तर शेकडो वर्षांचा हा लढा, लाखो रामभक्तांचे बलीदान, त्यामधून साकार होत असलेले हे शिल्प रक्तरंजित खुणांवर पाऊल ठेवत आलेले आहे
ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्प, अक्षता घेऊन रामललाच्या पवित्र चरणांवर अर्पण करतांना दिव्य आणि तेजस्वी अशी मूर्ती रामभक्तांनी बघितली, त्या वेळी बघणार्या कोट्यवधी लोकांच्या नेत्रांतून अश्रू ओघळू लागले ! कितीतरी लोकांनी दूरदर्शनवरील रामललाच्या मूर्तीलाच चरणस्पर्श, कुंकुमार्चन करून नमस्कार केला आणि त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली ! देवतांनी आकाशातून अयोध्येवर पुष्पवर्षाव करावा, अशीच शेकडो वर्षांत घडलेली ही अनुपम घटना होती !
३. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’चा संदेश
आता आपले रामलला अयोध्येमधील भव्य दिव्य अशा श्रीराममंदिरामध्ये बसून पुन्हा एकदा भारताला धर्म, आध्यात्मिक संस्कार आणि रामराज्याची प्रेरणा द्यायला साकार स्वरूपात सिद्ध झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणीसाठी घेतलेले कष्ट, मेहनत, मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी ११ दिवस केलेले कठोर अनुष्ठान, तपाचरण, स्वतःची केलेली सिद्धता आणि स्वतः जातीने रामललाची प्राणप्रतिष्ठा करून जगाला ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५, म्हणजेच संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू.) असा एक वेगळा संदेश दिला आहे.
यापुढे सहस्रो वर्षे हे श्रीराममंदिर भारतियांना जगाला प्रेरणा देत राहील. श्रीराममंदिर निर्माण हे आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंची केवळ श्रद्धाच नव्हे, तर स्वाभिमानही जागा व्हावा आणि अजूनही पुढील काही आव्हाने पूर्णत्वास नेण्यास हा निद्रिस्त समाज उत्थान करून सज्ज व्हावा, यासाठीच पुन्हा पेटवलेले हे यज्ञकुंड आहे. श्रीराममंदिराची उभारणी हा केवळ श्रद्धेचा विजय नाही, तर एक अभूतपूर्व संघर्षाचा विजय आहे. भारताची धार्मिक अधिष्ठान परंपरा, संस्कृती आणि लाखो बलीदानांची ती एक यशोगाथा आहे. ५०० वर्षे रामभक्तांच्या बलीदानाने लाल झालेली शरयू नदी आज आनंदाने वहात असतांना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू असतील. यासह जे जे लोक प्रभु श्रीरामचंद्रांचे अयोध्येमध्ये दर्शन घेतील, त्या वेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचेही स्मरण होईल. यादृष्टीने नरेंद्र मोदी यांनी स्वतःला श्रीराममंदिराशी यापुढील सहस्रो वर्षे जोडून घेतले आहे हे निश्चित !
४. ‘दशावतार’ जन्मलेल्या या देशाला धर्मनिरपेक्ष म्हणणे पापच !
हिंदूंचे मठ, मंदिरे उद़्ध्वस्त करून बाबर तर निघून गेला; पण त्या बाबरच्या धर्मांध ‘औलादी’ मात्र या देशामध्ये अद्याप टिकून आहेत. त्या एक वेळ अल्पसंख्यांक समाजात आहेत, हे समजू शकतो; परंतु आमच्या हिंदु धर्मामध्येही मोठ्या प्रमाणावर या बाबराच्या औलादी आजपर्यंत जिवंत आहेत. हा या देशाला मिळालेला मोठा शाप आहे. आजही श्रीराममंदिराला विरोध करणारे आमचे हिंदु राजकीय नेते आणि त्यांना समर्थन करणारा सर्वसामान्य हिंदु समाज बघितल्यानंतर मोठा प्रश्न पडतो की, श्रीरामाने या देशामध्ये परत यायला ५०० वर्षे का लावली ? ज्या हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी अन् संवर्धनासाठी भगवंताने १० अवतार ज्या देशामध्ये घेतले, तो देश स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून घेत असेल, तर यापेक्षा दुसरे मोठे पाप नाही !
५. प्रजाजनांनी धर्मकार्यार्थ सिद्ध व्हायला हवे !
धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करणारे मूर्ख हिंदु बघितले की, आणखीनच मोठा प्रश्न पडतो की, ज्या आसुरी शक्तींचा नायनाट करण्यासाठी राम-कृष्णाने अवतार घेतला, त्या आसुरी दुष्प्रवृत्ती आजही मोठ्या प्रमाणावर या देश-विदेशात कार्य करत आहेत. अशा या कठीण काळामध्ये देव आणि धर्म मानणार्या समस्त प्रजाजनांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणावर धर्मकार्यार्थ सिद्ध व्हायला हवे. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.), या तत्त्वाप्रमाणे संघटित व्हायला हवे, तरच यापुढे वेदव्यासांनी सांगितल्याप्रमाणे ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ (महाभारत, उद्योगपर्व, अध्याय ३९, श्लोक ७, म्हणजेच श्रीकृष्ण हाच साक्षात् धर्म होता.) साकार होईल.
६. हे प्रभु श्रीरामचंद्रा, धर्मविघातक शक्तींना क्षमा करू नकोस !
कठोर वाटत असले, तरी आता या रामललाला अशी प्रार्थना करावीशी वाटते की, ज्या ज्या धर्मविघातक शक्तींनी हिंदूंचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्रीराममंदिराच्या उभारणीमध्ये अनेक अडथळे आणले, हिंदूंच्या धर्मभावनांना उद़्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि आजही जे लोक या श्रीराममंदिराचा विरोध करत आहेत, ज्या ज्या धर्मविघातक शक्तींनी या पवित्र पावन अशा श्रीराममंदिर उद़्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, अशा कुणालाही हे प्रभु रामचंद्रा, सोडू नकोस, क्षमा करू नकोस. श्रीकृष्णाने पांडवांना उपदेश केल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या पापाची पूर्ण शिक्षा त्यांना मिळायलाच हवी !’
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व. (२६.१.२०२४)