६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वैष्णवी बधाले भावसत्संगात भावप्रयोग घेतांना आलेल्या अनुभूती
सौ. वैष्णवी बधाले (पूर्वाश्रमीच्या कु. वैष्णवी वेसणेकर, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २४ वर्षे) या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणार्या काही साधकांसाठी भावसत्संग घेतात. भावजागृती हा साधनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘साधकांची भावजागृती व्हावी’, यासाठी त्या भावसत्संगात काही भावप्रयोग करून घेतात. २८.१.२०२४ (पौष कृष्ण तृतीया) या दिवशी सौ. वैष्णवी बधाले यांचा वाढिदवस झाला. त्यानिमित्त ते भावप्रयोग करतांना सौ. विमल माळी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. भावप्रयोगामुळे संबंधित देवतेचे तत्त्व जागृत होणे
‘वैष्णवीताई ज्या देवतेच्या संदर्भात भावप्रयोग घेत असतील, त्या देवतेच्या संदर्भातील मला अनुभूती आल्या.
१ अ. शिवाच्या संबंधित भावप्रयोगात शिवलिंगाचे दर्शन होऊन गारवा जाणवणे : वैष्णवीताई शिवरात्रीनिमित्त ‘शिवा’चा भावप्रयोग घेतांना, ‘मला अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन होऊन गारवा जाणवला.’ त्यानंतर भावप्रयोग पूर्ण होईपर्यंत माझे ध्यान लागले. माझे मन निर्विचार होऊन मला शांत वाटले.
१ आ. श्रीकृष्णाशी संबंधित भावप्रयोगात कृष्णाचा खट्याळपणा अनुभवणे : वैष्णवीताईने गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचा भावप्रयोग घेतला. तेव्हा मला ‘श्रीकृष्ण बालगोपाळांच्या मध्यभागी बसून लोणी खात असून सर्वांना लोणी भरवत आहे. कृष्णाने मडक्यातून खाली सांडलेल्या लोण्यावर हात आपटला. त्यामुळे सर्वांच्या तोंडावर लोणी उडाले. ते पाहून श्रीकृष्ण खळखळून हसत आहे आणि सत्संगातील साधकही एकमेकांकडे पाहून हसत आहेत’, असे दृश्य दिसले. हे दृश्य पहातांना मला अतिशय आनंद होत होता.
१ इ. श्री गणेशाला प्रार्थना केल्यावर मनातील विचार नष्ट होऊन ध्यान लागणे : वैष्णवीताईने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या संदर्भात भावप्रयोग घेतला. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचार येत होते; म्हणून मी सहज श्री गणेशाला प्रार्थना केली, ‘हे श्री गणेशा, तुझ्या सोंडेने फुंकर घालून माझ्या मनातील विचार उडवून टाक.’ त्या क्षणी माझी निर्विचार स्थिती होऊन मला ध्यानावस्था अनुभवता आली आणि ‘सत्संगात पुढे काय चालू होते ?’, याचे मला भान राहिले नाही.
२. कृतज्ञता
‘हे भगवंता, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, वैष्णवीताईंमध्ये तुमच्या प्रती असलेल्या उत्कट भावभक्तीमुळे मला अशा अनेक अनुभूतींचा आनंद घेता आला. मला ‘भाव कसा असावा ?’, हे वैष्णवीताईंकडून शिकता आले’, यासाठी तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
– सौ. विमल माळी, फोंडा, गोवा. (१२.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |