श्रीराम गुणसंकीर्तन !
२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येमध्ये श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या निमित्ताने गुणांचे आगर असलेल्या श्रीरामाच्या गुणांचे काही श्लोकांच्या माध्यमातून केलेले संकीर्तन येथ देत आहे. गुणांच्या माध्यमातून श्रीरामाची स्तुती करण्याचे ठरवले, तरी ते अल्पच होईल. येथे श्रीरामाच्या गुणांचे वर्णन करण्याचा प्रयत्न काही श्लोकांच्या माध्यमातून केला आहे. विस्तारभयास्तव उर्वरित श्लोक अर्थासहित दिले आहे.
१. मनावर नियंत्रण ठेवणारा
इक्ष्वाकुवंशप्रभवो रामो नाम जनैः श्रुतः ।
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान् वशी ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक ८
अर्थ : इक्ष्वाकु कुळात जन्मलेले असे एक पुरुष आहेत. ते लोकांत ‘राम’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ते जितेंद्रिय, महापराक्रमी, कांतीमान, धैर्यवान आणि मनाला कह्यात ठेवणारे आहेत.
श्रीरामाचा राज्याभिषेक करण्याचे अयोध्येच्या राजदरबारात सर्व मंत्रीगण, सेनापती यांच्यासमक्ष घोषित करण्यात येते. त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो. त्याच रात्री मंथरा दासी कैकयीचे कान भरते आणि श्रीरामाला वनवास अन् भरताला राज्याभिषेक करण्यासाठी महाराज दशरथांना सांगण्यास सांगते. त्यामुळे श्रीरामाला वनवासात निघावे लागते. आदल्या दिवशी राज्याभिषेक होण्याचे घोषित होते, तर दुसर्या दिवशी थेट वनवासाचा निर्णय यामुळे कुणावरही आभाळ कोसळू शकते; मात्र श्रीरामाने वनवासाचा निर्णयही तेवढ्या सहजतेने स्वीकारला, जेवढ्या सहजतेने तो राज्याभिषेकासाठी सिद्ध झाला. यावरून श्रीरामाचे मनावर नियंत्रण होते, हे लक्षात येते.
दुसर्या प्रसंगात सीताहरण झाल्यावर श्रीराम सीतेचा शोध घेत असतांना वनातील झाडे, पशू, पक्षी या सर्वांनाच ‘तुम्ही सीतेला पाहिले आहे का ? सीता कुठे आहे माहिती आहे का ?’, हे विचारत होता. तेव्हा पार्वतीमातेने भगवान शंकराला विचारले ‘श्रीरामाच्या या वर्तनातून तो श्रीविष्णूचा अवतार आहे, असे वाटत नाही. तो सामान्य मनुष्याप्रमाणे वागत आहे.’ यावर भगवान शिव तिला म्हणाले, ‘तू स्वत:हून जाऊन निश्चिती करू
शकतेस ? तेव्हा पार्वतीमाता सीतेचे रूप घेऊन श्रीरामाच्या मार्गात उभी रहाते.’ जेव्हा श्रीराम तिला पहातो आणि म्हणतो ‘माते मी तुला ओळखले. तू आदिशक्ती पार्वती आहेस.’ तेव्हा पार्वतीमातेला समजते की, श्रीरामाचे बाह्यवर्तन सामान्य मनुष्याप्रमाणे वाटत असले, तरी आतून तो पूर्ण ज्ञानीच आहे. या प्रसंगांतून श्रीरामाचे मनावर किती नियंत्रण होते ? हे लक्षात येते.
२. बलशाली
सीतास्वयंवरात श्रीरामाने शिवधनुष्य तोडले. ते शिवधनुष्य तोडण्याचा प्रयत्न रावणासह अन्य क्षत्रिय राजांनीही केला होता; मात्र कुणालाही ते तोडता आले नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असतांना शुर्पणखेच्या संदर्भात झालेल्या प्रसंगामुळे तिने मायावी राक्षसांचे सैन्य आक्रमणासाठी आणले होते. या वेळी श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला, ‘तू येथेच सीतेजवळ थांब. मी एकटा पुरेसा आहे.’ असे सांगून श्रीरामाने एकट्याने अनेक मोठे मायावी राक्षस आणि त्यांचे सैन्य यांच्याशी युद्ध करून त्यांना ठार केले. समुद्राला प्रार्थना करूनही समुद्र दर्शन देऊन लंकेला जाण्यासाठी मार्ग करून देईना, तेव्हा श्रीराम अथांग समुद्राला शिक्षा देण्यासाठी धनुष्यबाण घेऊन सज्ज झाले. त्यांच्या त्या कृतीमुळे समुद्रदेवता साक्षात् प्रकट होऊन तिने साहाय्य केले. या काही प्रसंगांमधून ‘श्रीराम बलशाली होता’, हे लक्षात येते.
३. व्रतस्थ जीवन जगणारा
एका चक्रवर्ती राजाच्या घरी जन्म झालेल्या आणि वाढलेल्या राजकुमाराचे जीवन किती सुखासीन असेल ? ते सोडून ऐन तारुण्याची १४ वर्षे पितृआज्ञेसाठी वनात व्यतित करणे किती कठीण असेल ? तेथे कंद-मुळे, फळे खाऊन रहायचे. वनात हिंस्र पशू, वनवासी यांचा सामना करायचा. केवळ वल्कले धारण करून राज्याचा त्याग केला असल्याने समवेत काहीच साहित्य नाही. त्यात पाऊस, थंडी यांसारख्या वातावरणाचा सामना करायचा, समवेत सीता आणि लक्ष्मण यांनाही सांभाळायचे, त्यात राजा दशरथाचा मृत्यू होणे, सीताहरण होणे, राम-रावण युद्धात लक्ष्मण इंद्रजिताचा बाण लागून मूर्च्छित होणे, अशा अनेक प्रसंगांत श्रीरामाचे अतुलनीय धैर्य दिसून येते. श्रीरामावर तारुण्यात एका मागोमाग एक अनेक आघात झाले. त्या आघाताचा स्वत:च्या कार्यावर, कर्तव्यावर कोणताही परिणाम होऊ न देता अविचल राहून त्याने सर्व कर्तव्ये पूर्ण केली.
श्रीराम वनवासात व्रतस्थ जीवन जगलेच आणि सीतेचा त्याग केल्यावर, तसेच त्या काळी राजाने अनेक पत्नी करण्याची पद्धत असतांनाही श्रीरामाने दुसरा विवाह केला नाही.
४. बुद्धीमान आणि नीतीचा जाणकार
बुद्धिमान् नीतिमान् वाग्मी श्रीमान् शत्रुनिबर्हणः ।
विपुलांसो महाबाहुः कम्बुग्रीवो महाहनुः ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक ९
अर्थ : श्रीराम बुद्धीमान, नीतीमान, उत्तम वक्ता, सुंदर आणि शत्रूंवर विजय मिळवणारे आहेत. त्यांचे खांदे रुंद असून बाहू लांब आहेत. मान शंखासारखी आणि हनुवटी मोठी आहे.
श्रीरामाची बुद्धीमत्ता, बुद्धीचातुर्य यांचा अनुभव सीताहरणानंतरच्या अनेक प्रसंगांमध्ये येतो. ते नीतीचे जाणकार असल्यामुळे भरताने वनवासाला गेलेल्या श्रीरामाला पुन्हा राज्यात बोलावण्यास आलेल्या भरताला पित्याचे आज्ञापालन म्हणून वनवासाला जाणे का आवश्यक आहे ? तसेच अयोध्येवर भरताने राज्य करणे का आवश्यक आहे ? हे लक्षात आणून दिले. रावणासमवेत युद्ध चालू होण्यापूर्वी रावणाला सुधारण्याची शेवटची संधी म्हणून अंगदाला दूत म्हणून पाठवले. रावणाचा अंतिम संस्कार करण्यास बिभीषणाने नकार दिल्यावर श्रीरामाने ‘मरणानंतर वैर संपते’, हे सांगून स्वत: अग्नी दिला. त्यापूर्वी घायाळ अवस्थेत असणार्या रावणाकडून लक्ष्मणाला बोध घेण्यास पाठवले.
श्रीरामाला वक्तृत्व करण्याची संधी राजसभेत, रावण युद्धापूर्वी वानरसेनेचे मनोधैर्य उंचावतांना आणि अयोध्येला परतल्यानंतर प्रजाजनांना सामोरे जातांना होती. श्रीरामाने त्राटिका राक्षसीचा नाश करून राक्षसांच्या नाशाला प्रारंभ केला. वनवासात असतांना अनेक राक्षसांचा नाश करून ऋषिमुनींचे आश्रम भयमुक्त केले. रावणाचा नाश करून देवता, ऋषि आणि मानव यांना भयमुक्त केले.
५. धर्माचा जाणकार
धर्मज्ञः सत्यसन्धश्च प्रजानां च हिते रतः ।
यशस्वी ज्ञानसम्पन्न: शुचिर्वश्य: समाधिमान् ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १२
अर्थ : श्रीराम धर्माचे जाणकार, नेहमी सत्य बोलणारे आणि प्रजेचे हित करणारे आहेत. ते कीर्तीमान, ज्ञानी, पवित्र, जितेंद्रिय आणि मन एकाग्र असणारे आहेत.
श्रीराम धर्माचे जाणकार आहेत. वास्तविक श्रीरामावर संकटे कोसळली असतांना त्याने पिता दशरथ, बंधू भरत, लक्ष्मण यांना धर्माच्या दृष्टीने कसा निर्णय घ्यावा, याविषयी सांगितले आहे. परिटाने सीतामातेच्या चारित्र्यावर आक्षेप घेतल्यावर राजाचा धर्म, म्हणजे प्रजेच्या सूत्रांना प्राधान्य देत सीतामातेचाही त्याग केला.
रावण महालाच्या ठिकाणी दिसल्यावर वानरसेनेचा सेनापती सुग्रीव याने त्वेषाने त्यावर कुणाला न विचारता आक्रमण केले. या वेळी रावणाने मायावी शक्तीने सुग्रीवाला घायाळ केले. तेव्हा श्रीरामाने सुग्रीवाची ‘तो सेनापती असल्यामुळे असा उतावीळपणा करणे उचित नाही’, अशी कानउघाडणी केली.
अन्यायी आणि पराक्रमी क्षत्रियांचा एकहाती संहार करणार्या परशुरामाने क्षत्रिय संहाराची प्रतिज्ञाच घेतली होती. श्रीरामाने धनुष्य तोडल्यामुळे परशुरामाला पुष्कळ राग आला. तेव्हा प्रभु श्रीरामाने सीतास्वयंवराचा पण सांगून त्यांना ते श्रीविष्णूचे अवतार आहेत, हे लक्षात आणून दिले होते. तेव्हा परशुराम शांत झाले.
६. पितृवत् प्रेम करणारा
प्रजापतिसमः श्रीमान् धाता रिपुनिषूदनः ।
रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १३
अर्थ : श्रीराम प्रजापतीप्रमाणे प्रजापालक, लक्ष्मीसंपन्न, शत्रूविनाशक, सर्व प्राणीमात्र आणि धर्म यांचे रक्षण करणारे आहेत.
श्रीरामाचे प्रजेवर पितृवत् प्रेम होते. प्रजाही श्रीरामाकडे त्यांचा पालनकर्ता म्हणून पहात असे. श्रीरामाच्या राज्यात कुणावरही अन्याय, भेदभाव नव्हता. प्रजेच्या सुखासाठी श्रीरामाने स्वत:च्या प्रिय पत्नीचाही त्याग केला. अवतार कार्य समाप्ती करण्याची वेळ आल्यावर श्रीरामाने शरयू नदीत स्वत:च्या शरिराचा त्याग केला. श्रीरामाविना जीवनात अर्थ नाही, हे प्रजेला वाटत असल्याने अयोध्यावासियांनीही शरयूत जलसमाधी घेतली.
श्रीरामाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य, म्हणजे अनेक प्रसंगांमध्ये त्याने मानवी स्वभावाला अनुसरून केलेले वर्तन, विचारणा आणि इतरांचे मत घेण्याची कृती. श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये जेव्हा भीषण युद्ध होते, तेव्हा श्रीरामाच्या बाणांनी रावणाचे शीर धडापासून अनेक वेळा वेगळे केल्यानंतरही नवीन शीर यायचे. त्यामुळे श्रीरामाला प्रश्न पडला, असे का होत आहे ? आज बाण निष्फळ का ठरत आहेत ? तेव्हा त्यांच्या सारथ्याने ‘प्रभु असे काय करता ? देवतांनी सांगितलेली रावणाच्या वधाची वेळ जवळ आली आहे’, असे सांगतो. तेव्हा बिभीषणही रावणाचे प्राण कुठे आहेत, हे सांगून साहाय्य करतो.
रामापासून ते श्रीरामापर्यंत सर्व प्रवास हा अतुलनीय त्यागाचा आहे. श्रीराम प्रजेसाठी एक प्रजापालक राजा असला, तरी रावणवधानंतर श्रीरामाचे अवतारत्व खर्या अर्थाने सृष्टीने स्वीकारले होते.
प्रभु श्रीरामाच्या गुणांचे संकीर्तन पुष्कळ मोठे आहे. ते न संपणारे, थांबवता न येणारे अन् वर्णनातीतही आहे. केवळ काही प्रसंगांमधून ते बुद्धीने समजून घेऊ शकतो. वाल्मीकिऋषींपासून ते सध्याच्या कलियुगात अनेकांनी श्रीरामाला शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व सृष्टी व्यापून उरणारे, सर्वांच्या अंत:करणात सामावलेले, ब्रह्मांडाच्या कणाकणात एकरूप असलेले हे श्रीरामतत्त्व अनुभवून त्याला शरण जाणे एवढेच आपण करू शकतो.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२४.१.२०२४)
श्रीरामाचे गुणवर्णन करणारे अन्य श्लोक !रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता । – वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १४ अर्थ : श्रीराम स्वधर्मपालन, स्वजनांचे रक्षण करणारे, वेद अन् वेदांगे यांचे रहस्य जाणणारे, तसेच धनुर्विद्येत निपुण आहेत. सर्वदाभिगतः सद्भिः समुद्र इव सिन्धुभिः । – वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १६ अर्थ : ज्याप्रमाणे नद्या समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे सज्जन श्रीरामांकडे येतात. ते सद्वर्तनी, सर्वत्र समभाव बाळगणारे असून त्यांचे दर्शन सर्वांना नेहमी प्रिय वाटते. सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञः स्मृतिमान् प्रतिभानवान् । – वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १५ अर्थ : श्रीराम सर्व शास्त्रांचा अर्थ आणि त्यांचे रहस्य जाणणारे, स्मरणशक्ती अन् प्रतिभा यांनी संपन्न, सर्व लोकांना प्रिय, सज्जन, उदार अंत:करण असणारे अन् बोलण्यात चतुर आहेत. स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः । – वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १७ अर्थ : माता कौसल्येचा आनंद वाढवणारे ते (श्रीराम) सर्व गुणसंपन्न आहेत. ते समुद्रासारखे गंभीर आणि हिमालयासारखे धैर्यवान आहेत. विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः । – वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १८ धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः । – वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १९ अर्थ : (श्रीराम) भगवान विष्णूंसारखे पराक्रमी, चंद्रासारखे आल्हाददायक, क्रोध आला असता प्रलयकाळच्या अग्नीसारखे आणि पृथ्वीसारखे क्षमाशील आहेत. ते त्याग करण्यात कुबेराप्रमाणे आणि सत्यपालनात जणू दुसरे धर्मच आहेत. – श्री. यज्ञेश सावंत (२४.१.२०२४) |
संपादकीय भूमिकाश्रीरामावर टीका करून धन्यता मानण्यापेक्षा त्याच्या गुणांचे संकीर्तन करून परमधामाची प्राप्ती करणे हेच खरे जीवनध्येय ! |