दुर्गम भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतांना होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना आलेले अनुभव आणि त्या कालावधीत त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार !
‘मी वर्ष १९७८ ते २००८ अशी ३० वर्षे पोलादपूर (जिल्हा रायगड) येथे वैद्यकीय व्यवसाय केला. पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असून त्याच्या पंचक्रोशीत ८० खेडी येतात. तेव्हा रात्री अपरात्री रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यावर त्याला एका मोठ्या टोपलीमध्ये (डालग्यामध्ये) बसवून ८ ते १० व्यक्ती चिकित्सालयात घेऊन येत असत. त्यासाठी त्यांना न्यूनतम ८ ते १० कि.मी. पायी चालत यावे लागत असे. अशा दुर्गम ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतांना मला आलेले अनुभव खाली दिले आहेत.
सध्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतांनाही एखाद्याला १ – २ कि.मी. जायचे असेल, तरी तो गाडी घेतल्याविना जात नाही. शहरामध्ये रहाणार्या व्यक्तींनी ईश्वराप्रती कायम कृतज्ञताभावामध्ये रहायला हवे; कारण त्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध आहे आणि त्यासाठी काही फारशी यातायातही करायला लागत नाही.
१. दुर्गम ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करत असतांना आलेले अनुभव
१ अ. रुग्ण तपासणीसाठी रात्री अपरात्री दुर्गम भागांतून १० ते १५ कि.मी. पायी चालत जावे लागणे : साधारणपणे वर्ष २००० पर्यंत मी बहुतेक सर्व गावांमध्ये पायी चालत जात असे. काही ठराविक गावांमध्येच ‘एस.टी.’ जात होती आणि तीसुद्धा दिवसातून एकदाच असायची. मला रुग्णाच्या घरापर्यंत नेण्यासाठी गावातील २ – ३ व्यक्ती येत असत. मला रात्री अपरात्री १० ते १५ कि.मी. पायी चालत जावे लागत असे. हा प्रवास डोंगर-दर्यांमधून असायचा. मला आठवड्यातून १ – २ वेळा रुग्ण तपासायला रुग्णाच्या घरी जावे लागायचे.
१ आ. पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांच्या तपासणीसाठी जातांना येणार्या अडचणी
१. मला भर पावसामध्ये एका हातात मशाल आणि एका हातात छत्री धरून जावे लागायचे.
२. काही वेळा नदीला पाणी आल्यावर होडीवाला मला पैलतीरी घेऊन जात असे. नदीला पूर आला असतांना पैलतीरी जाणे, म्हणजे एक प्रकारची कसरतच होती; कारण नाव उलटली, तर वाचण्याची शक्यता मुळीच नव्हती.
३. काही वेळा रात्री चालत जातांना पायाखाली सर्प येत असत; परंतु गुरुकृपेने त्या वेळी माझे रक्षण व्हायचे.
१ इ. रुग्णाकडून पैसे मिळण्याची शाश्वती नसतांनाही त्याचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असल्याने त्याच्याकडे जाणे : रुग्णाच्या तपासणीसाठी गेल्यानंतर काही वेळा रुग्णांकडे मला द्यायला पैसेही नसायचे. तेव्हा ‘ते कधी देतील’, याची शाश्वतीही नसे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णाचा प्राण वाचवणे महत्त्वाचे असल्याने मी रुग्ण-तपासणीसाठी जायचो. कधी रात्रभर जागून पुन्हा सकाळी ७ वाजल्यापासून मी माझ्या नेहमीच्या रुग्णांची तपासणी करत असे. त्या वेळी मला ईश्वरकृपेने कोणताही त्रास झाला नाही.
१ ई. गावातील लोकांनी दुर्गम भागातून जाता-येतांना पूर्ण काळजी घेणे : त्या वेळी लोक वैद्यांना देव मानत असत. त्यामुळे ते जाता-येतांना माझी पूर्ण काळजी घेत असत. व्यवसायाच्या निमित्ताने मला त्या लोकांचे जीवन जवळून न्याहाळता आले आणि ‘किती कठीण परिस्थितीमध्ये ते जगत आहेत !’, याचे अवलोकन करता आले.
२. वैद्यकीय व्यवसाय करत असतांना अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी केलेले प्रयत्न
वर्ष १९९८ मध्ये मी साधनेला आरंभ केला. त्यानंतर १९९९ या वर्षापासून मी पत्नीसह सत्संग घेणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारणे इत्यादी प्रसारसेवा करू लागलो. मी माझ्या चिकित्सालयातही पुढीलप्रमाणे अध्यात्मप्रसार करत होतो. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळायचा.
२ अ. चिकित्सालयाच्या भिंतीवर प.पू. भक्तराज महाराज यांची सुवचने आणि साधनेविषयी माहिती रंगवणे : माझ्या चिकित्सालयाच्या प्रतीक्षालयाची खोली साधारणपणे ६० फूट लांब आणि ६ फूट रूंद होती. मी त्या खोलीच्या दोन्ही भिंतींवर प.पू. भक्तराज महाराज यांची १६ सुवचने रंगवून घेतली होती, तसेच भींतीवर साधनेविषयी ४ तक्तेही रंगवून घेतले होते.
२ आ. एका कपाटामध्ये सनातनचे ग्रंथ ठेवले होते. सुवचने आणि ग्रंथ यांमुळे त्या ठिकाणी एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते आणि कितीही उष्णता असली, तरी तेथे थंडावा जाणवत असे.
२ इ. चिकित्सालयातील चैतन्यामुळे तेथे बसणार्या व्यक्तीच्या मनातील निराशा जाणे : तेथील चैतन्यामुळे कुणाच्या घरी काही भांडण होऊन मन निराश झाले असेल, तर ती व्यक्ती तेथे येऊन बसत असे. तेव्हा तिला शांत वाटायचे. याविषयी रुग्ण मला नंतर सांगत असत.
२ ई. रुग्णाला ‘प्रिस्क्रिप्शन’वर (औषधे लिहिलेल्या कागदावर) नामजप लिहून देणे : चिकित्सालयातील ग्रंथ पाहून काही व्यक्ती ग्रंथ विकत घेत असत, तर काही जण त्यांच्या साधनेविषयीच्या शंका विचारत असत. मी त्यांना ‘प्रिस्क्रिप्शन’वर (औषधे लिहिलेल्या कागदावर) नामजप लिहून देत असे आणि त्याप्रमाणे नामजप केल्यानंतर त्यांना अनुभूती येत असत.
३. मी आणि माझी पत्नी (सौ. माधुरी मेहता, वय ६५ वर्षे) प्रत्येक शुक्रवारी महाबळेश्वर येथे अध्यात्मप्रसारासाठी जात होतो. त्या ठिकाणी आम्ही ग्रंथकक्ष उभारणे आणि सत्संग घेणे, अशा सेवा करत होतो.
मला हे सर्व अनुभवायला दिले, यासाठी मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (२६.८.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |