गोवा : भोगभूमी नव्हे, तर परशुरामांची योगभूमी !
गोवा म्हटले की, ‘खा, प्या आणि मजा करा’, अशी चुकीची धारणा लोकांच्या मनात येते. गोवा म्हणजे चंगळवादी लोकांचा प्रदेश, जुगार, मद्य आणि अर्धनग्न अवस्थेत वावरणार्या महिलांचा प्रदेश, ‘सनबर्न’, ‘कार्निव्हल’ यांसारखे महोत्सव भरणारा प्रदेश अशी प्रतिमा रंगवली जाते. आतापर्यंत चित्रपट, विज्ञापने यांमधून गोव्याची प्रतिमा मलीन केली जायची; पण आता प्रखर हिंदुत्वाचा वसा जपणार्या गोव्याविषयी सामाजिक माध्यमांवरूनही फारच अपसमज पसरवले जात आहेत. थोडक्यात गोव्याची प्रतिमा जगभरात भोगभूमी म्हणून प्रचलित झाली आहे; पण खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का ? याचाच वेध या लेखातून घेतला आहे.
१. परकियांचे आक्रमण !
अशा शांत प्रदेशावर १३ व्या शतकात अल्लाऊद्दीन खिलजी याने स्वारी केली आणि गोमंतकाच्या काळ्या इतिहासाला प्रारंभ झाला. यानंतर वर्ष १५१० मध्ये पोर्तुगिजांचे पांढरे पाय या पवित्र भूमीला लागले आणि हिंदु संस्कृतीवर मोठा आघात झाला. तेव्हापासून सुमारे ४५० वर्षे हिंदूंनी पोर्तुगिजांचे अत्यंत क्रूर अत्याचार सहन केले; पण आपली संस्कृती सोडली नाही. काहींनी तर हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्राणांचे बलीदानही दिले. याच्या पाऊलखुणा गोव्यात आजही जागोजागी सापडतात.
पोर्तुगिजांनी येथे ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी शस्त्राचा वापर केला. हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले. जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ याची साक्ष देत आहे. ‘इन्क्विझिशन’ला (धर्मच्छळाला) घाबरून ज्यांनी वरकरणी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, अशा हिंदूंनी जर गुपचूप वैदिक पद्धतीने एक जरी कृती केली, तरी त्यांना या खांबाला बांधून त्यांचे हात तोडले जायचे. हा खांब अशा हिंदूंच्या बलीदानाची साक्ष देत आहे. अलीकडच्या काळात हिंदूंनी या खांबाचे संवर्धन करण्यासाठी लढा चालू ठेवला आहे. ‘गोवा म्हणजे ख्रिस्तीबहुल राज्य’, असा समज आहे; पण प्रत्यक्षात गोव्यामध्ये हिंदु बहुसंख्य आहेत. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार गोव्यात ६६ टक्के हिंदु, तर २५ टक्के ख्रिस्ती आहेत.
२. प्राचीन भव्य मंदिरे !
गोव्याला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला आहे. हे येथील मंदिरे, लोककला, लोकसाहित्य यांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. देशातील सर्वांत लहान राज्य असूनही आणि दीर्घकाळ पोर्तुगिजांचा अत्याचार सहन करूनही गोव्यात मंदिरांची संख्या प्रचंड आहे. येथील प्राचीन मंदिरांची रचना मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह आणि शिखर अशी आहे. या रचनेचे मानवी शरिराच्या रचनेशी साम्य आहे. जवळपास प्रत्येक मंदिराच्या बाहेर मोठा तळे आहे. ‘मंदिरातील मूर्ती, म्हणजे साक्षात् परमात्मा आणि मनुष्याचा आत्मा यांचा संबंध आहे’, अशी गोव्यातील हिंदूंची भावना आहे.
येथील अनेक मंदिरांची मूळ स्थाने अन्यत्र होती; मात्र पोर्तुगीजकाळात जेव्हा धर्मांतर, मंदिरांची तोडफोड असे प्रकार होत होते, तेव्हा मंदिरांतील देवतांच्या मूर्ती सुरक्षितपणे अन्य िठकाणी स्थलांतरित करण्यात आल्या. आजही या मंदिरांच्या परिसरात याविषयीचा इतिहास लिहिलेला दिसून येतो. यातून भाविकांनाही पूर्वीच्या काळी कशा प्रकारे हिंदु धर्मावर आघात करण्यात आले आणि देवभोळ्या हिंदूंनी देव-धर्म रक्षणासाठी कशा प्रकारे कार्य केले, हे लक्षात येते. सांकवाळ, ओल्ड चर्च या ठिकाणी पूर्वी जी मंदिरे होती, ती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी हिंदूंचा लढा आजही चालू आहे.
३. गोव्याचे आध्यात्मिक महत्त्व !
श्रीहरि विष्णुचा सातवा अवतार म्हणजे परशुराम ! याच परशुरामाने एका बाणात समुद्राला मागे सारून प्रकट केलेल्या भूमीचा एक अंश, म्हणजे गोवा अर्थात् ‘गोमंतक’. गोव्याला ‘परशुरामभूमी’ म्हणून संबोधित केले जाते. परशुरामभूमी म्हणजे दक्षिणेत केरळपासून गोवा ते उत्तरेत गुजरातपर्यंतची भूमी ! भगवान परशुराम यांनी बाण मारून गोमंतकाची निर्मिती केली. याविषयीचा संदर्भ गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांमध्ये आजही दिसून येतो. गोव्यात ‘बाणावली’, असे एका गावाचे नाव यावरूनच आले आहे. उत्तर गोव्यात हरमल येथे एका पर्वतावर भगवान परशुराम यांचे यज्ञ करण्याचे स्थान असल्याचे मानले जाते. यावरून गोव्याचा आध्यात्मिक इतिहास लक्षात येतो. अशा या प्रदेशात रौद्ररूप धारण केलेली श्रीदुर्गादेवीही शांत झाली आणि ‘शांतादुर्गा’ या नावाने प्रसिद्ध झाली. या भूमीचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्येही आढळतो. महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ‘गोपराष्ट्र’ असा आहे. ‘गायींची सेवा करणार्या लोकांच प्रदेश’ असा त्याचा अर्थ होतो.
४. भव्यरित्या साजरी होणारी शिवजयंती !
येथे शिवजयंतीही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भगवे ध्वज लावून सर्वत्र मिरवणुका काढल्या जातात. शालेय विद्यार्थीही छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांच्या वेशभूषेत सहभागी होतात. या निमित्ताने संपूर्ण गोव्यात भगवेमय वातावरण होते.
५. गुढीपाडव्यानिमित्त प्रभातफेर्या !
चैत्र मासात गोव्यात नववर्ष स्वागतानिमित्त प्रभातफेर्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशात कार्यक्रमात सहभागी होतात. यामध्ये कालवाचन केले जाते, तसेच हिंदु परंपरेचे जतन करण्याची शपथ घेतली जाते.
६. शिमगोत्सवात चित्ररथाद्वारे हिंदुत्वाचा जागर !
येथे फाल्गुन मासात होलिकोत्सव साजरा केला जातो. होळी पेटवली आणि रंग लावले की, हा उत्सव झाला, असे भारताच्या बहुतांश भागात केले जाते; पण कोकणात विशेषतः गोव्यात हा उत्सव साधारण एक मास तरी चालूच असतो. यानिमित्त देवस्थानांमध्ये विविध धार्मिक विधी होतातच, तसेच शिमगोत्सवाच्या सायंकाळी शहरांमधून मिरवणुकाही काढल्या जातात. यामध्ये पारंपरिक पोषाख परिधान केलेले स्त्री-पुरुष आणि त्यांचे पारंपरिक नृत्य, ढोलताशांचा गजर यांमुळे वातावरण प्रफुल्लित होत असते. यात पौराणिक कथांमधील प्रसंगाचे देखावे उभारून हिंदु संस्कृतीचे भव्य दिव्य स्वरूप प्रदर्शित केले जाते.
७. श्रावण मासात मंदिरात भक्तीचा जागर !
गोव्यात श्रावण मासात अत्यंत धार्मिक वातावरण पहायला मिळते. श्रावण मास, हा चातुर्मासातील एक महत्त्वाचा मास. या संपूर्ण मासात वाराप्रमाणे त्या त्या देवतेच्या मंदिरांत विशेष धार्मिक पूजा होतात. पहाटेपासूनच धार्मिक विधींना आरंभ होतो. त्यानंतर दिवसभर पारंपरिक पूजा, अनुष्ठाने होतात. सायंकाळी भजनाचे कार्यक्रम होतात.
८. सवंगड्यांसह खेळणार्या श्रीकृष्णाचे स्मरण करून देणारे खेळ !
हिंदु दिनदर्शिकेनुसार आषाढ मासातील द्वादशीला माशेल येथील देवकीकृष्ण देवस्थानासमोरील चौकाचे रूपांतर भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनात होते. देवीला श्रीफळ किंवा नारळ अर्पण करून पारंपरिक दिवा लावला जातो. दुसर्या दिवशी रात्रभर भक्तीगीते म्हटली जातात. या वेळी कपाळावर सिंदूर-टिळा आणि अंगाला तेल लावले जाते. दिव्याभोवती प्रदक्षिणा घालून हे भाविक ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या चौकात धावतात. कृष्ण लहानपणी खेळलेले सारे खेळ येथे प्रत्यक्षात खेळले जातात.
९. गोव्यातील सणांचा राजा म्हणजे श्री गणेशचतुर्थी !
भाद्रपद मासात येणारा श्री गणेशचतुर्थी हा सण तर गोमंतकातील सणांचा राजा आहे. श्री गणेशचतुर्थीसाठी महिनाभर आधीपासूनच सिद्धता केली जाते. महाराष्ट्रात जशी दिवाळी साजरी केली जाते, तशी गोव्यात श्री गणेशचतुर्थी साजरी केली जाते. यानिमित्ताने घरांची स्वच्छता केली जाते. रंगरंगोटी, वैशिष्ट्यपूर्ण आरास केली जाते. गोडधोड फराळाचे पदार्थ बनवले जातात. लोक नातेवाइकांच्या, मित्रांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या सणानिमित्त परराज्यांत किंवा परदेशांत गेलेले गोमंतकीय हिंदु आपल्या मूळ गावी येत असतात. गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष सेवाही दिली जाते. इतके महत्त्व श्री गणेशचतुर्थीला दिले जाते.
१०. कुंभारजुवे गावात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी साजरा होतो ‘सांगोड’ उत्सव !
येथील श्री गणेशमूर्ती विसर्जनाचा विधीही अतिशय आगळा वेगळा असतो. कुंभारजुवे या गावात गणेश विसर्जनाची एक विशेष परंपरा पहायला मिळते ज्याला ‘सांगोड उत्सव’ असे म्हणतात. या वेळी ७ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यातील विशेषता, म्हणजे फुलांनी सजवलेला ‘सांगोड’. सांगोड म्हणजे दोन होड्या एकत्र करून त्यावर लाकडी फळ्या वापरून तराफा सिद्ध केला जातो. मग चहूबाजूंनी त्या तरफ्याला बांबू बांधून मंडपाचा आकार देतात आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवतात. त्यालाच ‘सांगोड’ असे म्हटले जाते. या फुलांनी सजवलेल्या प्रमुख मानाच्या ‘सांगोड’वर श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरातील श्री गणेशमूर्ती असते. श्री गणेशमूर्तीसह वेताळ, ऋद्धि-सिद्धि, नरकासुर यांची वेशभूषा केलेले लोक, तसेच देवस्थानचे पदाधिकारी असतात. नदीच्या पात्रात जवळपास ७ वेळा चक्कर मारून झाल्यावर त्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
११. नवरात्रातील देवीचा ‘मखरोत्सव’ !
अश्विन मासात येणारा नवरात्रोत्सव गोव्यात विशेष पद्धतीने साजरा केला जातो. येथील श्री शांतादुर्गा, श्री नवदुर्गा, श्री लईराई आदी देवस्थानांमध्ये देवीचा मखर (झोपाळा) सजवून त्याला झोके दिले जातात. फुलांनी सजवलेला मखर आणि त्यातील देवीची चैतन्यमय मूर्ती मनाला प्रसन्नता देत असते. नवरात्रीत ९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
१२. त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष वेधणारी नौकायन स्पर्धा !
कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा दिवस ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. या पौर्णिमेचे औचित्य साधत सर्वत्र दिवे लावले जातात. गोव्यातही यानिमित्त मोठा उत्सव आयोजित केला जातो. यानिमित्ताने सांखळी तालुक्यातील वळवंटी नदीत मध्यरात्री आयोजित केली जाणारी नौकायन स्पर्धा तर पहाण्यासारखी असते. नदीपात्रातील होड्यांमध्ये पौराणिक कथांमधील प्रसंग देखाव्याच्या रूपात उभारले जातात. हे बघतांना खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटते.
१३. मंदिरांत वस्त्रसंहिता पाळणारे देशातील पहिले राज्य !
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
देशातील मोठमोठ्या देवस्थानांमध्ये अलीकडच्या काळात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे; पण गोव्यातील मंदिरांमध्ये आधीपासून वस्त्रसंहिता पाळली जाते. मंदिरात जाणारे गोवेकर स्वतःच पारंपरिक वेशात मंदिरांत दर्शनाला जात असतात. परराज्यांतून किंवा विदेशांतून येणार्या दर्शनार्थींनाही तामसिक वस्त्रांमध्ये आत प्रवेश दिला जात नाही. त्यांच्यासाठी संहिता फलक लावण्यात आले आहेत. येथील मंदिरांमध्ये एखाद्या अन्य धर्मियाला प्रवेश करायचा असल्यास ही संहिता पाळावी लागते.
१४. देवाचा कौल घेऊनच कार्यारंभ करणारे गोवेकर !
गोव्याचे लोक सात्त्विक प्रवृत्तीचे आणि संस्कृतीप्रिय आहेत. आजही येथील लोक देवाला विचारल्याखेरीज कोणतेही शुभकार्य चालू करत नाहीत. लग्नात वधू-वराची पसंती करण्यापासून विधी ठरवण्यापर्यंत, घर बांधण्यापासून गाडी घेण्यापर्यंत देवाकडे कौल घेण्याची परंपरा आहे. इतकी भक्तीपरायणता गोव्याच्या लोकांमध्ये आहे. येथे विरोधी पक्षही देवाचा अवमान करण्याचे धाडस करत नाही, हे विशेष !
१५. आध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित करणारे जत्रोत्सव !
गोव्यातील जत्रोत्सवाची परंपराच काही वेगळी आहे. जांबावलीचा गुलालोत्सव, शिरगावच्या श्री लईराईची जत्रा या तर प्रसिद्ध आहेत. श्री लईराई आईची जत्रा गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविक येथे येत असतात. अन्यत्र भरतात, तशा येथेही देवांच्या जत्रा भरतात. जत्रोत्सवात आपल्याला कधीही चित्रपटातील गाणी लावलेली दिसून येणार नाहीत, तर या जत्रा भक्तीभावाने भरवल्या जातात.
१६. गोवा सात्त्विक भूमी !
गोवा ही मुळात सात्त्विक भूमी आहे. गोवा म्हणजे कॅसिनो, जुगार, समुद्रकिनारा, दारू, अमली पदार्थ असे नसून गोवा, म्हणजे संस्कृती-परंपरा जपणारी, आध्यात्मिकतेला प्राधान्य असलेली, गोसंवर्धन करणारी, प्राचीन भव्य मंदिरे, जत्रा, धार्मिक उत्सव, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यांमुळे चैतन्यदायी झालेली परशुरामभूमी आहे. या आध्यात्मिकतेमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे आपण गोव्याला येण्याचे ठरवत असाल, तर केवळ समुद्रकिनार्यावर जाऊ नका, तर गोव्याची संस्कृती अनुभवण्यासाठी येथील मंदिरे, आश्रम यांना अवश्य भेट द्या. भोगभूमीची नाही, तर योगभूमीची अनुभूती घ्या.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२४)
संपादकीय भूमिकाभारतातील विविध राज्यांना असलेला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन करण्यासह तो जगापुढे आणण्यासाठी भारतात ‘हिंदु राष्ट्र’ हवे ! |