भूतकाळातील चुकांविषयी व्यथित होऊ नका, तर चांगला भविष्यकाळ घडवण्यासाठी तत्पर व्हा !
‘काही साधक त्यांच्याकडून भूतकाळात घडलेल्या चुकांविषयी व्यथित होतात आणि पुनःपुन्हा त्या चुका आठवून दुःखी होतात. ‘माझ्याकडून अशा चुका झाल्याच कशा ?’, ‘मी चुकांतून का शिकलो नाही ?’ यांसारखे प्रश्न स्वतःला विचारून स्वतःलाच त्रस्त करतात.
बर्याच जणांच्या संदर्भात असे आढळते की, त्यांना जीवनातील काही साधी साधी सूत्रे लक्षात यायलाही जीवनाची बरीच वर्षे जातात. काही जणांचे वय वाढते; पण त्यांच्यात समजूतदारपणा किंवा विवेक तेवढा वाढतोच असे नाही. काहींच्या प्रारब्धातच तशा चुका घडण्याचे योग असतात. यामुळे त्यांच्याकडून जीवनातील विविध टप्प्यांवर चुका घडत असतात.
‘सर्वच गोष्टी सर्वच वेळी आपल्या लक्षात येतीलच असे नाही’, हे सर्वप्रथम आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडे सेवेनिमित्त जायचो, तेव्हा बर्याचदा ते चालू असलेल्या सेवेच्या संदर्भात काही नवीन सुचल्यास मला म्हणायचे, ‘‘हे साधे लक्षात यायलाही आपल्याला वेळ लागला ना !’’
भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या झाल्या; पण आता त्या सुधारता येणे शक्य असल्यास तत्परतेने सुधाराव्यात, उदा. आपण एखाद्याला अयोग्य प्रकारे किंवा अपशब्द बोललेलो असलो, तर अनेक दिवसांनी किंवा वर्षांनी का होईना; पण आपण त्याची क्षमा मागू शकतो. यामुळे पापक्षालन होण्यात साहाय्य होऊन एकमेकांमधील संबंधही चांगले होतात. पूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी तत्परतेने प्रयत्नही करावेत, उदा. ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ चांगली राबवावी. असे प्रयत्न आरंभ केल्यास मन सकारात्मक होऊन आपण आनंदी रहातो, तसेच भविष्यकाळ चांगला घडवण्यासाठी सक्षमही होतो.’
– (पू.) संदीप आळशी (१५.१.२०२४)