श्रीरामरक्षास्तोत्र पठण, तसेच श्रीरामाचा नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; मात्र स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे. श्रीरामरक्षास्तोत्र बुधकौशिकऋषींनी रचले आहे. आत्मज्ञानसंपन्न ऋषिमुनी अन् साधूसंत यांना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असते. या अवस्थेत त्यांचे ईश्वराशी पूर्ण अद्वैत असल्याने आणि ईश्वरच या सार्याचा कर्ता आहे, या अनुभूतीमुळे ‘रामरक्षा श्री शिवांनी स्वप्नावस्थेत सांगितली’, असे बुधकौशिकऋषींनी लिहिलेले आढळते.
‘ईश्वरप्राप्ती करून घेण्याचे कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी साधनामार्ग आहेत. दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील, असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’)
‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करणे आणि श्रीरामाचा नामजप करणे यांचा ते करणार्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ व्यक्ती आणि आध्यात्मिक त्रास नसलेली १ व्यक्ती सहभागी झाल्या. पहिल्या प्रयोगात श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करण्यापूर्वी आणि पठण केल्यानंतर, तसेच दुसर्या प्रयोगात श्रीरामाचा नामजप करण्यापूर्वी आणि नामजप केल्यानंतर दोघांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करण्यासाठी दोघांना प्रत्येकी १५ मिनिटे लागली. त्यांनी श्रीरामाचा नामजप १५ मिनिटे केला. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.
अ. श्रीरामरक्षास्तोत्राच्या पठणानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्याने श्रीरामाचा नामजप केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. श्रीरामरक्षास्तोत्राच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपामुळे तिच्यामध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तिने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली; पण ही वाढ श्रीरामरक्षास्तोत्राच्या तुलनेत श्रीरामाचा नामजपामुळे अधिक प्रमाणात झाली.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. श्रीरामरक्षास्तोत्राचे महत्त्व : ‘अध्यात्मवाङ्मयात मंत्रयोगाला पुष्कळ महत्त्व आहे. श्रीरामरक्षास्तोत्र हा मंत्रच आहे. रामरक्षेच्या प्रारंभीला ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ असे म्हटले जाते. मंत्र म्हणजे इष्टसाधक आणि अनिष्टनिवारक वर्णसमूह. मंत्र म्हणजे एक नाद (ध्वनी), एक अक्षर, एक शब्द किंवा शब्दांचा समूह. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादा मंत्र जपला जातो, त्या वेळी त्या जपातून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते. याकरता रामरक्षा विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे.
‘स्तूयते अनेन इति’, म्हणजे ज्यायोगे देवतेचे स्तवन केले जाते ते स्तोत्र’, अशी स्तोत्र या शब्दाची व्याख्या आहे. स्तोत्रात देवतेच्या स्तुतीसह स्तोत्रपठण करणार्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण करण्याची शक्तीही असते. स्तोत्रांमध्ये दिलेल्या फलश्रुतीमागे रचयित्याचा संकल्प असल्याने ते पठण करणार्याला फलश्रुतीमुळे फळ मिळते.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘श्रीरामरक्षास्तोत्र’)
२ आ. श्रीरामाचा जप : ‘कलियुगात नामजप हीच सर्वोत्तम साधना आहे आणि नामजपाला पर्याय नाही’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.
‘श्रीराम जय राम जय जय राम’ यातील शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
श्रीराम : हे श्रीरामाचे आवाहन आहे.
जय राम : हे स्तुतिवाचक आहे.
जय जय राम : हे ‘नमः’ प्रमाणे शरणागती दर्शक आहे.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्रीराम’)
श्रीरामरक्षास्तोत्राच्या पठणामुळे विशिष्ट शक्तीचे (चैतन्याचे) स्तोत्रपठण करणार्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते. श्रीरामाचा नामजप केल्याने नामजप करणार्याला श्रीरामतत्त्वाचा लाभ होतो. चाचणीतील दोघांना श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले. येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे दोघांवर स्तोत्रपठणापेक्षा नामजपाचा परिणाम अधिक प्रमाणात झाला. यातून सतत नामजप करण्याचे महत्त्व लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.१.२०१४)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
|