संपादकीय : पुरस्काराचे खरे मानकरी !
प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी केंद्रशासनाने १३२ जणांना ‘पद्म’ पुरस्कार घोषित केले. यात ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ अशा पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांसाठी १३२ जण पात्र ठरणे, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्काराचे मानकरी ठरणार्या सर्वच मान्यवरांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच ! वर्ष १९५४ पासून या पुरस्कारांना प्रारंभ झाला आहे. ती परंपरा आजतागायत चालू आहे. उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. सामाजिक क्षेत्रांत विशेष कार्य करणे, हे सर्वश्रुत असतेच; पण याच्या जोडीला दुर्लक्षित किंवा महत्त्वपूर्ण अशा क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेऊ पहाणे, हे आशादायी आणि कौतुकास पात्रही आहे. यानुंग जमोह लोगो यांना त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील योगदानाविषयी पुरस्कार घोषित झाला. या माध्यमातून आयुर्वेदाचा व्यापक प्रसार होण्यास आता साहाय्य होईल. सध्या ॲलोपॅथीच्या वाढत्या विश्वात आयुर्वेदाला न्यून लेखले जाते. अशा स्थितीत आयुर्वेदाच्या औषधांची महती सर्वांपर्यंत पोचवणारा पुरस्काराचा मानकरी ठरणे, हे आयुर्वेदाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. उमा महेश्वरी डी. यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्याही मानकरी ठरल्या. संस्कृत भाषेला सध्या कुणीच विचारत नाही. तिची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. अडगळीत गेलेली भाषा अशीच जणू तिची सद्यःस्थिती आहे. अशात जर संस्कृतवर प्रभुत्व असणारी व्यक्ती या पुरस्काराची मानकरी ठरत असेल, तर या माध्यमातून संस्कृत भाषेला पुनर्जीवन प्रदान होऊ शकते. संस्कृतप्रेमींसाठी हे आशादायी आहे. के. चेल्लम्मल यांच्या पुरस्कारामुळे जैविक शेतीला प्रोत्साहन मिळून दिशा प्राप्त होईल. आज सेंद्रिय किंवा रासायनिक शेतीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आता उघड होत आहेत. त्यामुळे जैविक किंवा नैसर्गिक शेतीकडे वळणे, ही काळाची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी मल्लखांबाला लोकप्रिय केले. म्हणून तेही मानकरी ठरले आहेत. सध्या क्रिकेटचेच खूळ सर्वांच्या डोक्यात असतांना आणि प्रसिद्धीझोतात क्रिकेट हाच एकमेव खेळ असतांना मल्लखांब लोकप्रिय करणे तितके सोपे नाही. यासाठी देशपांडे यांनी अथक परिश्रम घेतले असणार, यात शंका नाही. त्यांना लाभलेल्या पुरस्कारामुळे भारतीय खेळांना पुनर्वैभव प्राप्त होईल. केवळ प्रसिद्धी आणि पैसा यांसाठी खेळल्या जाणार्या क्रिकेटसारख्या खेळापेक्षा स्वतःचे शरीर बलवान अन् सामर्थ्यशाली करणार्या मल्लखांबासारख्या खेळाला यातून प्रेरणा मिळेल अन् मल्लखांब जगप्रसिद्धसुद्धा होईल ! पुरस्कार प्रदान करण्याच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे विविधांगी हेतू साध्य होणार आहेत. थोडक्यात काय, तर या पुरस्काराच्या परिघाच्या कक्षा आता रूंदावत चालल्या आहेत, हे चांगलेच आहे. जे कालौघात मिटले जात होते, ते या पुरस्कारांमुळे पुन्हा एक प्रकारे संरक्षित, संवर्धित आणि पुनर्जीवित होणार आहेत. त्यामुळे ‘शासनाने निवडलेले पुरस्काराचे मानकरी योग्य आणि पूरकच आहेत’, असे म्हणता येईल.
असे असले, तरी काही वेळा हे पुरस्कार ठरवतांना दुजाभाव केला जातो. त्यामुळे असामान्यांचे कर्तृत्व झाकोळले जाते. अनेक जण लढवय्ये असतात; पण त्यांना पुढे आणले जात नाही. त्यांना यथोचित न्याय दिला जात नाही. त्यामुळे अशांचे महत्त्व जगासमोर कधी येतच नाही. असे व्हायला नको. सर्वांनाच त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार न्याय, प्रसिद्धी, प्रोत्साहन मिळायलाच हवे. याआधी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात आला; पण याच्याच जोडीला क्रीडा क्षेत्रातील अन्य खेळांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. याकडे दुर्लक्षून चालणार नाही. सरकारने याकडेही लक्ष द्यायला हवे.
पुरस्कारास अपात्र कोण ?
मुलायमसिंह यादव हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असतांना श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी कारसेवा करणार्या कारसेवकांवर त्यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यात अनेक रामभक्त मृत्यूमुखी पडले. असे असतांना सरकारने मागील वर्षी त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरवित केले. अशी व्यक्ती या पुरस्कारास पात्र ठरूच कशी शकते ? मुलायमसिंह यांना ‘पद्मविभूषण’ मिळणे, हा पुरस्कारप्राप्त खर्या मानकर्यांचा आणि समस्त रामभक्तांचा अवमानच आहे. काही वर्षांपूर्वी विद्रोही साहित्यिक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाकडून त्यांना दिला जाणारा ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला; कारण काय तर म्हणे पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी व्यासपिठावर श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यात आली होती ! विद्येची देवता असणार्या सरस्वतीदेवीला नाकारणार्या अशा हेकेखोरांना पुरस्कार द्यायचाच कशाला ? तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी ‘फॅक्ट चेकर’ महंमद जुबैर याला ‘सांप्रदायिक सद्भाव’ पुरस्काराने २६ जानेवारीला सन्मानित केले. सामाजिक माध्यमांवरून केल्या जाणार्या प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण पोस्ट जुबैर यांनी थांबवल्या. यासाठी ते पुरस्काराचे मानकरी ठरले; पण असे असले, तरी भाजप सरकारने त्यांना पुरस्कार देण्यास विरोध दर्शवत राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या ‘फॅक्ट चेकर’च्या माध्यमातून अर्धसत्य विकले जात आहे. असे असतांना अशांना पुरस्कार देणे, म्हणजे अर्धसत्य विकणार्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. सरकार कराचा पैसा वाया घालवत आहे. सरकारला त्याची पर्वा नाही. अशा व्यक्ती पुरस्कारासाठी अपात्रच आहेत. त्यामुळे मुलायमसिंह यादव आणि महंमद जुबैर अशांकडून त्यांचे पुरस्कार परत घ्यायला हवेत, अन्यथा पुरस्काराच्या खर्या मानकर्यांचा तो अवमान ठरेल.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना मिळालेला पहिला ‘फिल्मफेअर’ पुरस्कार नाकारला होता; कारण त्या मानचिन्हावर विवस्त्र महिला दाखवली होती. ‘हा माझ्यातील स्त्रीत्वाचा अवमान आहे’, असे सांगून त्यांनी पुरस्कार नाकारला होता. कर्नाटक राज्यात शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या एका संतांना ‘पद्म’ पुरस्कार घोषित झाला होता; मात्र ‘मी हे सर्व कार्य पुरस्कार आणि प्रसिद्धी यांसाठी करत नाही’, असे सांगून त्या संतांनी तो विनम्रतेने नाकारला होता. भारताचा राष्ट्रोत्कर्ष साधण्यासाठी मनापासून योगदान देणार्यांचा गौरव व्हायला हवाच, तसेच त्या जोडीला ते नामांकन अभ्यासपूर्ण केले गेले आहे ना ? हेही सरकारने किंवा संबंधितांनी पहायला हवे. c, संस्कृती, परंपरा यांच्याप्रती आदर असलेले, तसेच विनम्र, सत्शील, सद्वर्तनी, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि प्रसिद्धीपराड्मुख असणारी व्यक्तीमत्त्वेच खर्या अर्थाने पुरस्काराचे मानकरी ठरतात, हे लक्षात घ्या !
विद्येची देवता असणार्या श्री सरस्वतीदेवीला नाकारणार्यांना पुरस्कार दिला जाणे, हा पुरस्काराचा अवमानच होय ! |