नांदिवडे (रत्नागिरी) येथे पतीची हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकर यांना अटक
धर्माचरणाच्या अभावामुळे समाजाचे होत असलेले अध:पतन !
रत्नागिरी – तालुक्यातील नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय ६४ वर्षे) यांची त्यांची पत्नी शीतल पडवळ हिने धारधार हत्याराने हत्या केल्याची घटना २६ जानेवारीच्या सकाळी घडली. या प्रकरणी संशयित पत्नी शीतल पडवळ आणि तिचा प्रियकर संशयित मनराज चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर भा.दं.वि. क ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२६ जानेवारी या दिवशी पती सुरेश घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगत शीतय यांनी गावात माहिती दिली. या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला. श्वानपथका’सह पोलीस घटनास्थळी आले. या वेळी श्वानाने २ ते ३ वेळा शीतल पडवळ आणि मनराज चव्हाण यांच्या अंगावरच धाव घेतल्याने या दोघांनीच हा बनाव रचल्याचे उघड झाले.
पत्नी शीतल आणि तिचा प्रियकर मनराज यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्यांच्या पतीला होता यावरून घरात सातत्याने भांडण चालू होती. याच रागात शीतलने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस अन्वेषणात समोर आली आहे. जयगड पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.