अयोध्येला भारतातील सर्वांत स्वच्छ नगर करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत ! – महंत गिरीशपती त्रिपाठी, महापौर, अयोध्यानगर निगम
अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
अयोध्या – अयोध्येत येणार्या भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वत्र दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. अयोध्येत आठवड्यातील सर्व दिवस आम्ही स्वच्छता करत आहोत. अयोध्या हे भारतातील सगळ्यात स्वच्छनगर बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे वक्तव्य अयोध्येचे महापौर महंत गिरीशपती त्रिपाठी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.
अयोध्यानगरीच्या विकास संकल्पनेविषयी माहिती देतांना महंत त्रिपाठी म्हणाले, ‘‘भाविकांसाठी येथे ३ निवासस्थाने आहेत. या ठिकाणी सहस्रावधी भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचे नियोजनही करण्यात आले आहे. अयोध्यानगरीत तात्पुरते आणि कायमस्वरूपी असे मिळून एकूण २ सहस्त्र शौचालये उभारण्यात आली आहेत. येणार्या काळात आणखीही शौचालये बांधण्यात येणार आहेत. भाविकांचा वाढता ओघ पाहता प्राथमिक उपचार केंद्रे आणि आरोग्य केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
अयोध्या हे विश्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. हळूहळू हे शहर संपूर्ण जगाच्या आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र होत आहे.’’
आम्ही रामराज्याच्या दिशेने पुढे जात आहोत !
प्रभु श्रीरामांचे मंदिर येथे झाले आहे. त्यामुळे हळूहळू येथील लोक आणि संस्कृती राममय होत आहे. श्रीरामाच्या आदर्शांना मानून त्यांनी मूल्ये आणि संस्कृती यांचे अनुकरण करून आम्ही रामराज्याच्या दिशेने पुढे चाललो आहोत, असे त्रिपाठी यांनी म्हटले.