हरिप्रिया एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस एल्.एच्.बी. कोचवर धावणार !
(लाल रंगाच्या कोचला लिंक हॉफमन बुश (LHB) कोच म्हणतात.)
मिरज, २६ जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस २५ जानेवारीपासून, तर कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस २६ जानेवारीपासून एल्.एच्.बी. कोचवर धावणार आहेत. याविषयी दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती एक्सप्रेस या दोन्ही लिंक एक्सप्रेस आहेत. या एक्सप्रेस यापूर्वी ‘आय.सी.एफ्.’ कोचवर धावत होत्या. या कोचमध्ये प्रत्येकी ७२ जागा, तर एल्.एच्.बी. कोचमध्ये ८० जागा (बर्थ) असतात. महालक्ष्मी एक्सप्रेसला एल्.एच्.बी. कोच जोडावेत, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. जागांची संख्या वाढल्याने प्रवाशांची सोय आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. या दोन्ही एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे प्रवासी तिकीट शुल्क पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे.