सांगली येथे लिंगायत समाजाचा अड्डपालखी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला !
अड्ड पालखी सोहळ्यात हत्ती, घोडे, उंट यांसह मिरवणूक !
सांगली, २६ जानेवारी (वार्ता.) – सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज, शिवबसव सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने १६ ते २४ जानेवारी या कालावधीत आध्यात्मिक आशीर्वचन आणि संगीत शिवकथेचे आयोजन येथील तरुण भारत स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. २४ जानेवारी या दिवशी अड्डपालखी सोहळा उत्साहात झाला. या निमित्ताने शहरात विविध मार्गांवरून हत्ती, घोडे, उंट यांसह मिरवणूक काढण्यात आली. सांगली शहरामध्ये जवळजवळ १३ वर्षांनंतर अड्डपालखी सोहळा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला.
महोत्सवात श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु चत्रसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी आदी सहभागी झाले होते. मारुति चौक, गणपति मंदिर, गणपति पेठ, पटेल चौक, राजवाडा चौक, मारुति चौक, तरुण भारत स्टेडियम या मार्गावरून पालखी सोहळा काढण्यात आला. यामध्ये भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे नेते जितेश कदम यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, तसेच कर्नाटकातील विजापूर, अथणी या भागांतील वीरशैव लिंगायत समाजातील स्त्री आणि पुरुष भक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.