पुणे महापालिकेला ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये नामांकन मिळाले, तरी कचर्याची समस्या तशीच !
पुणे, २६ जानेवारी (वार्ता.) – पुणे महापालिकेला ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये नुकतेच ‘फाईव्ह स्टार’ रॅकिंग (पंचतारांकित क्रमांक) मिळाले आहे. तरीही शहरातील कचरा स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता हे प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत. शहरामध्ये ९१३ जागांवर अस्वच्छता (क्रॉनिक स्पॉट) आढळून आली आहे. जनजागृती आणि दंडात्मक कारवाई या दोन्हींच्या माध्यमातून त्या जागांवरील कचर्याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून केवळ १६१ ठिकाणांवरील कचरा टाकणे बंद झाला आहे.
पुणे शहराची वाढती हद्द, लोकसंख्या, कचरा संकलनासाठीची अपुरी व्यवस्था आणि कुठेही कचरा फेकण्याची नागरिकांची मानसिकता यांमुळे शहरातील रस्त्यांवर, मोकळ्या जागा, नाले, नदी, कालवा आदीं भागांमध्ये कचरा फेकण्याचे प्रमाण अधिक आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, शहरामध्ये कुठेही दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकला जातो, अशा ठिकाणांची सूची महापालिकेकडे नव्हती. घनकचरा विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांकडून अशा जागांचे सर्वेक्षण (पडताळणी) करून त्याची सूची सिद्ध केली. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये अशा ९१३ जागा असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. अशा जागांची संख्या ही वारजे, औंध, हडपसर आणि नगर रस्ता या महामार्गांच्या लगत असलेल्या भागांमध्ये अधिक प्रमाणांमध्ये दिसते. त्याठिकाणी कचरा टाकणार्या नागरिकांकडून दंड वसूल केला जातो, तसेच ठराविक समयमर्यादेत तेथे कर्मचारी बसवला जातो. सफाई कर्मचारी नागरिकांची जनजागृती करत आहेत.
संपादकीय भूमिकामानांकन देतांना योग्य प्रकारे पडताळणी केली जाते का ? असे असेल, तर मानांकन मिळाल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’, अशी स्थिती असेल, तर हे गंभीर आहे ! |