नागपूर येथे लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात ७१ टक्के आरोपी निर्दाेष !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – येथे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद झाले आणि आरोपींनाही अटक करण्यात आली; मात्र न्यायालयात गुन्हा सिद्ध करतांना पोलिसांना सपशेल अपयश आल्याने तब्बल ७१ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. केवळ २९ टक्केच आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे, दगा देऊन बलात्कार करणे किंवा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात महिला समोर येऊन पोलिसात तक्रार करतात. काही वेळा पोलीस तक्रारदार महिलेलाच समाजात अपकीर्ती होईल आणि न्याय मिळण्याची शक्यता अल्प असल्याचे सांगून तक्रार दाखल करण्यास परावृत्त करतात किंवा तिच्याशी स्वतःच अयोग्य वर्तन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यच असल्यामुळे महिला तक्रार देत नाहीत. पोलिसांच्या तपासावर आरोपींची शिक्षा किंवा निर्दोषत्व अवलंबून असते.

अनेकदा तपास अधिकारी योग्य तपास करीत नाहीत, तर आरोपींशी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेवून आरोपींना साहाय्य करतात. महिला पोलीस अधिकारीही याकडे गांभिर्याने पहात नाहीत. पुराव्या अभावी किंवा तपासात असलेल्या त्रुटींमुळे संवेदनशील गुन्ह्यातूनही आरोपी निर्दोष सुटतात.

नागपूर येथे वर्ष २०२२ मध्ये बलात्काराच्या ११५ खटल्यांवर न्यायालयात निर्णय झाला. त्यांपैकी केवळ ३१ प्रकरणांत आरोपींना शिक्षा झाली, तर ८४ आरोपी निर्दोष सुटले. वर्ष २०२३ मध्ये बलात्काराच्या १६१ प्रकरणी केवळ ४७ आरोपींवर दोष सिद्ध झाला, तर ११४ आरोपी निर्दोष सुटले. वर्ष २०२३ मध्ये विनयभंगाच्या १२९ खटल्यांमध्ये केवळ ३८ आरोपींना शिक्षा झाली, तर ९१ आरोपी निर्दोष सुटले.

लैंगिक प्रकरणांत नागपूर येथे दोषसिद्धीचे प्रमाण केवळ २७ टक्के असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेकदा महिला बदला घेण्यासाठी, प्रियकराला धडा शिकविण्यासाठी तक्रार देतात. असे गुन्हे न्यायालयात टिकत नसल्याचे चित्र आहे.

हत्याकांड प्रकरणी केवळ २२ टक्के दोषसिद्धीचे प्रमाण येथे आहे.

संपादकीय भूमिका

लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात तात्काळ आणि कठोर कारवाई केल्यासच ते रोखले जातील !