असगोली (गुहागर) येथील ३ महिलांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण
चिपळूण – गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी विवाहितेची सासू हिरा मधुकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर आणि नणंद पुष्पा रत्नाकर जांभारकर या ३ महिलांना १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ८ सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. ही घटना सप्टेंबर २०१७ मध्ये घडली होती.
१४ सप्टेंबर २०१७ या दिवशी विवाहीता कै. आरती मंगेश नाटेकर हिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. यामध्ये ती ९५ टक्के भाजली होती. त्या वेळी त्यांच्या लग्नाला ११ वर्षांचा कालावधी झाला होता. तिला नील नावाचा मुलगा असून पती मंगेश मधुकर नाटेकर हे मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करतात. तिचा वेळोवेळी शारिरीक आणि मानसिक छळही केला जात होता.
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिने वरील तिघींच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध ४९८ (अ) आणि ५०४ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतानाच आरतीचे निधन झाले होते. सरकार पक्षाकडून अधिवक्ता प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले होते.