रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेच्या वतीने शृंगारतळी येथील डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार प्रदान
रत्नागिरी – जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने शृंगारतळी (तालुका गुहागर) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना २१ जानेवारी या दिवशी ‘वैश्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेच्या वतीने कै. राधाताई लाड सभागृह वैश्य भवन चिपळूण येथे जिल्हास्तरीय वैश्यवाणी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यासाठी विभास खातू (अध्यक्ष वैश्यवाणी समाज संस्था, महासंघ वरिष्ठ उपाध्यक्ष, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन), प्रमोद जठार (माजी आमदार), अधिवक्ता विलास पाटणे (उपाध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन संस्था) आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीकृष्ण बेलवलकर हे गेली १५ वर्षे वैश्यवाणी समाज गुहागर तालुका या संस्थेचे सचिवपद सांभाळत आहेत. गुहागर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असते.
ते श्री. निळकंठेश्वर मंदिर शृंगारतळी याचे विश्वस्त म्हणून सेवा करत आहेत. त्यांच्या विशेष कामगिरीमुळे अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘हा पुरस्कार आई-वडिल आणि माझ्या गुरुदेवांचा ( सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ) आहे.’, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.