लहान वयापासून सात्त्विकता आणि सेवा यांची ओढ असलेली कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कु. पूजा कल्लाप्पा टोपकर (वय १७ वर्षे) !

१. चिकाटी

‘कु. पूजा आणि माझी मुलगी कु. वैदेही खाडये (आध्यात्मिक पातळी ५४ टक्के) एकाच वर्गात शिकत होत्या. मला कुडाळ येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील बालकक्षाचे दायित्व मिळाले होते. मी कु. पूजा आणि कु. वैदेही यांच्या वर्गातील साधक मुलांना घेऊन ती सेवा केली. पूजा त्यात उत्साहाने सहभागी झाली. तिला बालकक्षातील ‘राणी चन्नम्मा’ ही व्यक्तीरेखा करायची होती; पण तिचे काही उच्चार नीट होत नव्हते. तिने पुष्कळ प्रयत्न करून स्वतःचे उच्चार सुधारले आणि ती व्यक्तीरेखा सादर केली.

सौ. मंजुषा खाडये

२. सात्त्विकता आणि सेवा यांची ओढ

पूजा दुसरीत शिकत असल्यापासूनच कुडाळ सेवाकेंद्रात येते. पूजाचे घर सेवाकेंद्रापासून १ कि.मी. लांब असूनही ती प्रतिदिन सेवाकेंद्रात येत असे आणि सेवाकेंद्रातील फुलझाडांना पाणी घालण्यासारख्या काही छोट्या सेवा स्वतःहून आवडीने करत असे.

३. साधनेची ओढ आणि काटकसरीपणा

पूजाने दैनिक ‘सनातन प्रभात’मधील तिला आवडलेल्या कात्रणांची एक सुंदर वही बनवली होती. त्या वहीमध्ये तिने दैनिकातील कात्रणे चिकटवून त्यांना चौकटी केल्या होत्या. यासाठी तिने नवीन वही न वापरता जुन्या वहीचाच उपयोग केला होता.

४. सेवाकेंद्रात राहून नवीन सेवा शिकणे

कोरोनाच्या कालावधीत दळणवळण बंदी असतांना वैदेहीच्या समवेत पूजाने कुडाळ सेवाकेंद्रात रहायचे ठरवले. सध्या ती सेवाकेंद्रातील विविध सेवा आणि प्रसारातील काही सेवा शिकत आहे. एकदा ती माझ्या समवेत सेवा करत होती. तेव्हा ‘सेवा अधिक चांगली होण्यासाठी ती सेवेच्या आधी आणि सेवा झाल्यानंतर सेवेत झालेल्या चुकांचे चिंतन करते’, असे माझ्या लक्षात आले.

५. इतरांचा विचार करणे

पूजा सेवा करतांना ‘समवेत सेवा करणार्‍या साधकांना काही साहाय्य हवे का ?, तेही पहाते आणि तिला शक्य होईल, ते सर्व साहाय्य त्यांना करते.’

– सौ. मंजुषा मनोजकुमार खाडये, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२५.१०.२०२३)