६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर (वय ५० वर्षे) यांची नाशिक येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. कु. प्रियंका शिंदे, निफाड, नाशिक.
१ अ. मायेविषयी न बोलणे : ‘श्री. निरंजन चोडणकर मायेत अडकले आहेत किंवा मायेच्या संदर्भात कधी अधिक बोलले’, असे कधीच झाले नाही. ते प्रत्येक कृतीचा साधनेच्या दृष्टीनेच विचार करतात.
१ आ. साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणे : कधी ‘मला काहीच येत नाही’, असे वाटून मला निराशा येते, तेव्हा निरंजनदादा मला म्हणायचे, ‘‘जे येत नाही, त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. तळमळ असेल, तर सर्व साध्य होते. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.’’ त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत असे. ते नेहमी ‘साधकांची साधना आणि श्रद्धा वाढावी’ या दृष्टीने आणि ‘प्रत्येक कृती साधना म्हणून तळमळीने कशी करावी ?’, यांविषयी सांगतात.’
२. कु. किंजल सोनवणे, बढदे नगर, सिडको, नाशिक.
२ अ. साधनेविषयी गांभीर्य निर्माण करणे : ‘आरंभी माझ्यामध्ये साधनेविषयी गांभीर्य पुष्कळ अल्प होते. निरंजनदादांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन करून माझ्यामध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण केले.’
३. कु. प्रीनल सोनवणे, बढदे नगर, सिडको, नाशिक.
३ अ. मनमोकळेपणा : ‘मी आणि माझी बहीण कु. किंजल सोनवणे दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सत्संगात जोडले गेलो. त्या वेळी आमची निरंजनदादांशी प्रत्यक्ष ओळख झाली नव्हती, तरी आम्हाला भ्रमणभाषवर त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलता येत असे. तेही आमच्याशी मनमोकळेपणे बोलत आणि आमच्या साधनेविषयीच्या सर्व प्रश्नांचे निरसन करत असत.
३ आ. सूक्ष्मातील कळणे
१. एकदा निरंजनदादा नाशिकला आले असतांना त्यांचा सत्संग चालू होता. तेव्हा काही प्रसंगांमुळे माझ्या मनात विचार चालू होते. याविषयी मी कुणालाही काही सांगितले नव्हते. तेव्हा निरंजनदादांनी सत्संगामध्ये त्या संदर्भातच मार्गदर्शन केले. त्यामुळे मला माझ्या मनातील विचारांवर योग्य दृष्टीकोन मिळाले.
२. अनेक वेळा मी निरंजनदादांना काही सांगितले नसतांना ते माझ्या मनाच्या स्थितीनुरूप मला साधनेविषयीचे लेख किंवा दृष्टीकोन भ्रमणभाषवर पाठवतात. त्यामुळे मला आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळते.
३. कधी माझी नकारात्मक स्थिती असेल, तेव्हा मला त्यांचा भ्रमणभाष येतो आणि ते मार्गदर्शन करून मला त्या स्थितीतून बाहेर काढतात.
३ इ. निरंजनदादा आम्हाला सांगतात, ‘आपल्याला आपले स्वभावदोष आणि अहं यांवर लढाऊ वृत्तीने मात करता आली पाहिजे.’
३ ई. इतरांकडून शिकणे : ‘इतर साधकांविषयी माझ्या मनात कधी विकल्प आले, तर ते सांगतात, ‘‘साधकांमधील देवत्व पहायचे. त्यामुळे साधकांविषयी प्रतिक्रिया न येता आपण सतत शिकण्याच्या स्थितीत राहू.’’ निरंजनदादा नेहमी इतरांचे गुण बघतात आणि इतरांकडून शिकायचा प्रयत्न करतात.
३ उ. प्रेमभाव : निरंजनदादा नेहमी सर्वांची आपुलकीने विचारपूस करतात आणि इतरांचा विचार करून त्यांना आवश्यकतेनुसार साहाय्यही करतात. एकदा मी रामनाथी आश्रमात शिबिराला गेले असतांना रुग्णाईत झाले. रात्री माझ्याकडील औषध संपले. निरंजनदादांनी वैद्यांकडे जाऊन माझ्यासाठी औषध घेतले आणि ते एका साधकाच्या समवेत माझ्याकडे पाठवले.’
४. श्री. नीलेश नागरे, गंगापूर रोड, नाशिक (अध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४२ वर्षे)
अ. मी प्रथम निरंजनदादांना भेटलो, तेव्हा मला त्यांच्यामध्ये ‘अंतर्मुखता, गुरुकार्याची प्रचंड तळमळ, जिद्द, सकारात्मकता, नम्रता, भाव आणि स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ’, असे अनेक गुण जाणवले. ‘त्यांच्यामध्ये भक्ती आणि क्षात्रभाव यांचा अनोखा संगम आहे’, असे मला वाटते.
आ. निरंजनदादा मला कधी अर्जुनाप्रमाणे, तर कधी एकलव्याप्रमाणे जाणवतात. ‘गुरुकृपेने त्यांची साधना चांगली चालू आहे’, असे मला वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १४.१.२०२४)