हसतमुख, प्रेमळ आणि साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्या सांगली येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. विद्या सुरेश जाखोटिया (वय ६२ वर्षे) !
आज २७.१.२०२४ या दिवशी (कै.) सौ. विद्या सुरेश जाखोटिया यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१६.१.२०२४ या दिवशी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विद्या सुरेश जाखोटिया (वय ६२ वर्षे) यांचे पुणे येथे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. २७.१.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्री. संपत जाखोटिया ((कै.) सौ. विद्या जाखोटिया यांचा पुतण्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ १. साधनेचे महत्त्व कळल्यावर व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करणे : ‘साधनेत येण्यापूर्वी सौ. जाखोटियाभाभी घरी राहून साडीविक्रीचा व्यवसाय करत होत्या. जेव्हा त्यांना साधना कळली, तेव्हा त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अध्यात्मप्रसाराची सेवा करू लागल्या. त्या वेळी त्यांची मुले शाळेत जात होती, तरीही त्यांनी अधिकाधिक वेळ साधनेसाठी दिला. त्यांनी मुलांनाही साधना शिकवली.
१ अ २. घरातील लग्नकार्याच्या वेळी एकत्रित आलेल्या नातेवाइकांना साधना सांगणे : कुटुंबात लग्न किंवा अन्य कार्यक्रम असतांना सौ. जाखोटियाभाभी सर्वांना एकत्र करून त्यांच्याकडून भजने म्हणवून घेत असत. त्या सर्वांना एकत्र करून साधना सांगत असत. त्यामुळे आमच्या कुटुंबातील बर्याच जणांनी नामजप करण्यास आरंभ केला. एकदा आमच्या कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी १५० नातेवाईक आणि गावातील अनेक लोक उपस्थित होते. त्या वेळी भाभींनी पुढाकार घेऊन तेथे सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावले.
१ अ ३. अध्यात्मप्रसार करून जिज्ञासूंना साधनेकडे वळवणे : त्यांनी राजस्थान आणि गोवा या राज्यांत प्रसारसेवा करत असतांना अनेक जिज्ञासूंना साधनेकडे वळवले. आताही तेथील साधक भेटल्यावर भाभींच्या आठवणी सांगतात.’
१ आ. सौ. दीपश्री संपत जाखोटिया ((कै.) सौ. विद्या जाखोटिया यांची सून (पुतण्याची पत्नी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ आ १. प्रेमभाव : ‘माझे लग्न ठरल्यावर मी पहिल्यांदा भाभींशी बोलले. तेव्हा आमची पुष्कळ आधीपासून ओळख असल्याप्रमाणे आमचे साधनेविषयी बोलणे झाले. भाभींचे बोलणे इतके आपलेपणाचे होते की, ‘त्यांच्याशी बोलतच रहावे’, असे मला वाटले. त्यांच्याशी बोलतांना ‘त्या माझ्या चुलत सासूबाई आहेत’, असे मला कधीच जाणवले नाही.
१ आ २. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. भाभींच्या पार्थिवाकडे पाहून मला शांत वाटत होते.
आ. त्यांचे शरीर व्याधीग्रस्त असल्याने त्यांच्या शरिरावर सूज होती; मात्र त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मला भगवान शिवाचे स्मरण झाले.
इ. ‘त्या कशातही अडकलेल्या नाहीत’, असे मला जाणवले.
ई. त्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर मला असे वाटले की, त्यांचे प्राण डोळ्यांवाटे गेले असावेत.’
२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे) आणि सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७४ वर्षे), गावभाग, सांगली.
२ अ १. साधकांच्या मुलींना लहानपणापासून साधनेची गोडी लावून साधनेत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणार्या सौ. जाखोटियाभाभी ! : ‘सौ. जाखोटियाभाभींचा आणि आमचा स्नेहबंध साधनेत आल्यापासून, म्हणजे वर्ष १९९६ – १९९७ पासून आहे. त्यांचा प्रेमभाव, तळमळ, चिकाटी, जिद्द आणि तत्त्वनिष्ठता आम्हाला वेळोवेळी अनुभवायला मिळाली.
लहानपणापासून भाभींनी आमच्या तिन्ही मुलींमधील कौशल्य जाणले आणि त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी करून घेतले, उदा. प्रसारफेरीमध्ये गीते म्हणणे इत्यादी. त्यामुळे मुलींमध्ये साधनेची गोडी निर्माण झाली. पुढे पथनाट्य, स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार, सूत्रसंचालन, निधीसंकलन, दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख लिहिणे, वार्ता पाठवणे इत्यादी अनेकविध सेवांच्या माध्यमातून साधनेची दिशा देऊन पुढे जाण्यासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या जाखोटियाभाभी हे एक आगळेच व्यक्तीमत्त्व होते.
२ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका सत्संगात समोर बोलवून साधकाच्या सेवेचे कौतुक करणे आणि त्याला प्रेरणा देणे : वर्ष २००० ते २००२ या कालावधीत मी (श्री. दत्तात्रय कुलकर्णी) नोकरी करत असतांना विज्ञापने गोळा करण्याची सेवा करत होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका सत्संगात मला समोर बोलवून भाभींनी मी केलेल्या सेवेचे कौतुक केले. त्यामुळे मला सेवा करण्यास प्रेरणा मिळाली. ‘ज्येष्ठ साधकांचा सत्संग आणि सहवास आम्हाला मिळावा’, अशी त्यांची तळमळ होती.
२ अ ३. साधकांच्या अडचणी जाणून त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे : साधकांच्या अडचणी जाणून त्यावर प्रेमाने आणि तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून दृष्टीकोन देऊन त्यांना साहाय्य करण्यात भाभींचा हातखंडा होता. वेळप्रसंगी त्या सर्व साधकांच्या घरी जाऊन त्यांची कौटुंबिक स्थिती आणि अडचणी समजून घेत असत. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतांना कुणालाच भीती वाटत नसे. ‘साधकांमधील कौशल्य आणि गुण-दोष जाणून त्यांना कोणती सेवा द्यावी ?’, याचे मर्म जाणणार्या भाभी विरळ्याच ! किंबहुना ‘साधकांना कशा पद्धतीने सांगायचे ? त्यांना सकारात्मक कसे करायचे ?’, याविषयीचे भाभींचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. ‘साधकांनी शारीरिक आणि आर्थिक अडचणी जाणून एकमेकांना साहाय्य करायला हवे’, याची जाणीव भाभी साधकांना करून देत असत.
२ अ ४. साधकांना दायित्व घेऊन सेवा करण्यास प्रोत्साहन देणे : भाभींनी साधकांना वेगवेगळ्या सेवा आणि उपक्रम शिकवून त्यांना त्या त्या सेवांचे दायित्व दिल्यामुळे अनेक साधक दायित्व घेऊन सेवा करू लागले. प्रवचन करणार्यांच्या संख्येतही वाढ झाली.
२ अ ५. साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ यांबद्दल चिंतन करण्यास शिकवणे : भाभी साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या सूत्रावर चिंतन लिहायला सांगत असत अन् सत्संगात त्याविषयी आढावा घेऊन चर्चा केली जात असे. यातून त्यांनी साधकांना चिंतन करण्याची सवय लावली.
भाभींनी तळमळीने, चिकाटीने आणि जिद्दीने साधना केली. त्यांनी शेवटचे ४ मास मृत्यूशी जिद्दीने लढा दिला. १६.१.२०२४ या दिवशी त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अंत झाला.
‘नेहमी हसतमुख असणे, परिस्थितीचा स्वीकार करणे, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, आध्यात्मिक भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे, सतत साधनेचे विचार करणे, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास असणे’ इत्यादी गुणांमुळे त्या खरोखरच साधकांच्या आई होत्या. त्या प्रत्येक गोष्टीत स्वतः आनंद घेत होत्या आणि इतरांनाही आनंद देत होत्या; म्हणून त्यांच्या जाण्याने सर्वांनाच त्यांची उणीव भासेल. भाभी सर्वांच्या मनाला चटका लावून गेल्या.
अशा सर्वांगीण मार्गदर्शक भाभींचा सहवास दिल्याबद्दल आम्ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘भाभींचा पुढील प्रवास सुखदायक होवो’, अशी प्रार्थना करतो.’
२ आ. श्रीमती मृणालिनी भोसले (वय ६७ वर्षे), मिरज, जिल्हा सांगली.
१. ‘साधनेत भाभी आमच्यासाठी आदर्श होत्या. त्यांनी सांगितलेली साधनेविषयीची सूत्रे आमच्या अंतर्मनापर्यंत पोचत.
२. सुयोग ((कै.) सौ. विद्या जाखोटिया यांचा मुलगा) अगदी लहान होता; पण भाभींनी त्यालाही साधनेची गोडी लावली.
३. भाभींमध्ये असलेल्या ‘प्रीती’ या गुणांमुळे ‘त्या आपल्या आहेत’, असे साधकांना वाटायचे.
त्यांच्या देहावसानाची वार्ता समजल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणी आले. ‘ईश्वराने त्यांना सद्गती देण्यासाठीच उत्तरायण येण्यापर्यंत त्यांचा मृत्यू थांबवला होता’, असे मला वाटते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२ इ. सौ. कविता बेलसरे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ इ १. शारीरिक त्रास होत असूनही सतत सेवारत असणे : ‘मी वर्ष १९९८ पासून जाखोटियाभाभींना ओळखते. त्यांना शारीरिक मर्यादा असूनही त्या त्याविषयी फारसा विचार न करता सतत साधनेत व्यस्त असत. त्यांनी बर्याच सेवा दायित्व घेऊन केल्या आहेत.
२ इ २. साधकांशी आपलेपणाने बोलल्याने साधक सेवा करण्यास सिद्ध होणे : त्यांच्या बोलण्यात आपलेपणा असल्याने त्यांनी साधकांना सेवा सांगितल्यावर साधक सेवेला सिद्ध होत असत. साधकांना त्यांचा आधार वाटत असे. भाभींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझे आई-वडील (सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७४ वर्षे) आणि श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे)) उतारवयातही आनंदाने सेवा करत आहेत.’
२ ई. कु. मृणाल धर्मे, सांगली
२ ई १. प्रेमभाव : ‘एकदा मी मिरज आश्रमातून घरी जाणार होते. याविषयी जाखोटियाभाभींना कळल्यावर त्यांनी स्वतःजवळील बदामाचे पाकीट मला खाऊ म्हणून दिले.
२ ई २. शिकण्याची वृत्ती : जुलै २०२३ मध्ये भाभी मिरज येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होत्या. त्या वेळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून आले होते. तेव्हा त्यांनी मला ‘प्रक्रियेत असतांना काय शिकायला मिळाले ? प्रक्रिया कशी राबवली ?’, याविषयी विचारले. मी सांगितलेली सूत्रे त्यांनी शिकण्याच्या स्थितीत राहून ऐकली आणि लिहूनही घेतली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.१.२०२४)