धर्माच्या आधारावर सामाजिक समस्या कितपत प्रमाणात सुटू शकतील ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन करणारी लेखमाला !
‘आपल्या धर्माच्या बांधणीचा मूळ हेतू कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक अथवा सामाजिक समस्या निर्माण होऊ न देता विकासाकडे-समृद्धीकडे प्रगती व्हावी, असा असल्यामुळे धर्माच्या आधारावर समस्या निर्माण होणारच नाहीत आणि ज्या काही किरकोळ असतील त्या सुटू शकतील. सामाजिक अथवा वैयक्तिक समस्या या कशामुळे निर्माण होतात ? याचा विचार केला, तर असे लक्षात येते की, ज्या ठिकाणी कुणाही दोन घटकांचा स्वार्थ किंवा जीविका एक दुसर्यामुळे बाधित होण्याची वेळ येते अथवा शक्यता असते, तिथे खरे प्रश्न आणि समस्या निर्माण होतात.
समाजधारणेसाठी ‘चातुवर्ण्य’ महत्त्वाचे; पण काही व्यक्तींकडून गेल्या २०० वर्षांच्या इतिहासात धर्माची मांडणी विकृत !
आपल्या धर्मव्यवस्थेमध्ये स्वीकारलेली ‘चातुवर्णाश्रम’ पद्धत ही अशा प्रकारचे प्रसंग येऊ नयेत, यासाठी आखलेली आहे; परंतु आज ‘चातुवर्ण्य’ ही संकल्पना कुणी नीट समजावून घेतांना दिसत नाही. समाजधारणेसाठी आवश्यक असणार्या ज्ञान, संरक्षण, व्यवहार आणि सेवाकार्य या ४ सत्तांची वर्णव्यवस्था ही एक विकेंद्रित पद्धत आहे. ४ वर्णांमध्ये कुणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ धर्माने मानलेला नाही. ‘सगळीकडे एकाच शरिराच्या अवयवाप्रमाणे हे समजावेत’, असे म्हटले आहे; मात्र गेल्या २०० वर्षांच्या इतिहासात धर्माची मांडणी काहीशी विकृत केली गेल्याचे दिसते. काही व्यक्तींनी धर्ममर्यादांचे उल्लंघन करून अन्य वर्णाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने वागवले. त्यामुळे विचारवंतांच्या धर्मविषयक संकल्पना चुकत गेल्या.
धर्माच्या नावाने काही व्यक्ती आचारण करतांना चुकल्या, याचा अर्थ ‘धर्म चुकीचा आहे’, असे म्हणता येणार नाही; परंतु आपल्याकडे दुर्दैवाने तसे झाले आणि या विचाराला पाश्चात्त्य विचारवंतांनी खतपाणी घालून विद्वेष निर्माण केला.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. वर्ष १९९८)