सर्वांगाने पुनरुत्थान करून हिंदु धर्मग्रंथ, मंदिरे, देवीदेवता आणि साधूसंत यांचा सन्मान करणे आवश्यक !
‘श्री पांडुरंग विठ्ठल शोध प्रकल्पा’चे कार्य करत असतांना ज्या काही समस्या हाताळाव्या लागल्या. त्यांपैकी भारतीय हिंदूंच्या देवीदेवता आणि पाश्चात्त्य अभ्यासकांनी केलेले विवेचन अन् सादर केलेले निष्कर्ष ही एक समस्या होती. या पाश्चात्त्यांच्या समवेत काही भारतीय अभ्यासकही आहेत. संशोधन आणि संपादन रूपाने त्यांनी सादर केलेल्या निष्कर्षाचे मूल्यमापन अन् संशोधन करणे अपरिहार्य ठरते. दलरी यांचा ‘कल्ट ऑफ विठ्ठल’ किंवा हंसबेकरचे ‘Puranic Corpus text’ हे ग्रंथ उदाहरणार्थ घेतले, तरी हिंदु देवीदेवतांविषयी विवरण करणारी पद्धत प्रा. मॅक्समुल्लर आणि तत्सम अभ्यासकांपर्यंतची आहे. या सर्वांचे सार असे की, हिंदू हे बहुदेवतावाचक आहेत. दुसरे असे की, देवतारूपाने ते अवताराची पूजा करतात; उलट देव हा एकच आणि एकमेव असतो. दुसरा वर्ग साम्यवादीप्रणित समाजवाद्यांचा आहे. हा वर्ग हिंदूंचे धर्म अस्तित्व अमान्य करणार्यांचा असून स्वतःला बुद्धीवादी समजतो; मात्र स्वतःचा अहं हे त्यांचे बीज व्यक्तीमत्त्व असते. उपरोक्त दोन्ही वर्ग परस्परांहून भिन्न आणि वेगवेगळे असले, तरी दोहोंची एकसमान धारणा अन् भूमिका आहे. ती म्हणजे, हिंदूंच्या देवीदेवतांविषयी वाटेल ते आणि वाटेल तसे बोलण्याचा, लेखनाचा आम्हाला अधिकार आहे; मात्र हिंदूंनी आमच्याविषयी ‘ब्र’सुद्धा काढता कामा नये. हे सर्व एका परीने हे पिसाट विकृतीचे आजारी (morbiferous) जंतू आहेत.
बुद्धीवादाची झूल पांघरून ‘आपण वरिष्ठ आहोत आणि देव, धर्म अन् हिंदु धर्मविषयक काहीही बोलण्याचा आणि सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे’, या घमेंडीतून जो धिंगाणा अन् बेतालपणा चालू आहे, तो जसा निषेधार्ह आहे, तसाच निंदनीय आहे. याला उत्तर एकच आहे ते, म्हणजे सर्वांगाने पुनरुत्थान ! आपण आपले धर्म ग्रंथ, मंदिरे, देवीदेवता आणि साधूसंत यांचा सन्मान करणे आवश्यक असून त्याप्रमाणे त्या दिशेने वाटचाल करणे, हे होय.’
– डॉ. म.रा. जोशी
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)