सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचे कौतुक करणारे सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) !
उद्या २८.१.२०२४ (पौष कृष्ण तृतीया) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमात सेवा करणारे श्री. दीप संतोष पाटणे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. पृथ्वीराज हजारे यांना ६५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. इतरांचे कौतुक करणे
१ अ. निसर्ग, चंद्र, तारे आणि त्यांना पाहू शकणारे डोळे यांचे कौतुक करणे : ‘नारळी पौर्णिमेच्या रात्री पू. हजारेकाका मला म्हणाले, ‘‘तू चंद्र पाहिलास का ?’’ मी ‘‘नाही’’, असे म्हटल्यावर ते मला आगाशीत घेऊन गेले. पू. काकांनी मला चंद्राचे निरीक्षण करायला सांगितले. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘प्रत्यक्षात चंद्र आणि सर्व तारे हे आपल्यापासून लाखो कि.मी. दूर आहेत, तरीही आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो. मला हे आजच कळले.’’ तेव्हा ‘ते देवाने निर्माण केलेल्या डोळ्यांचे कौतुक करत होते’, असे मला वाटले. पू. काका पाऊस पडत असतांनाही निसर्गाकडे पाहून देवाने निर्माण केलेल्या निसर्गाचे कौतुक करतात.
१ आ. आधुनिक वैद्यांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक करणे : एकदा आम्ही रुग्णालयात ज्या आधुनिक वैद्यांकडे उपचारासाठी जाणार होतो, त्यांचे पू. काका फार कौतुक करत होते. उपचार झाल्यावर आधुनिक वैद्यांना भेटण्यासाठी ते मला त्यांच्या समवेत आत घेऊन गेले. आधुनिक वैद्यांचे सर्व बोलणे ऐकून मलाही त्यांचे अनेक गुण शिकायला मिळाले. ‘समाजाकडूनही कसे शिकू शकतो आणि लोकांच्या गुणांचे कसे निरीक्षण करू शकतो ?’, हे मला शिकायला मिळाले. पू. काका बाहेर आल्यावर मला म्हणाले, ‘‘असे लोक सगळीकडे असतील, तर सर्वत्र चांगलेच होईल.’’
२. वेळेचे गांभीर्याने पालन करणे
एकदा आम्ही रुग्णालयात चारचाकीने जात असतांना पू. काकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचले. रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या भेटीसाठी आम्ही वाट पहात असतांना पू. काकांनी त्यांची सेवा केली.
३. आपत्काळाविषयी सांगणे
मला एक स्वप्न पडले. त्यामधे ‘मी एका ठिकाणावरून जात असतांना मला काही गुंडांनी अडवले आणि शस्त्र दाखवून माझ्याकडून मौल्यवान वस्तू मागितल्या. माझ्याकडे जे होते, ते मी त्यांना दिले आणि त्यांनी माझी वाट मोकळी केली. याविषयी मी पू. काकांना विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘पुढे आपत्काळात असेच असणार आहे. लोक जीवही घ्यायला कमी करणार नाहीत; पण आपण जर साधना करत असू, तर देव आपले रक्षण करील. जे मौल्यवान गेले, ते देव संपत्काळात देईल.’’
४. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी श्रद्धा निर्माण करणे
मी श्रीकृष्णाविषयी एका पुस्तकाचे वाचन करत होतो. त्याचा संदर्भ घेऊन मी पू. काकांना म्हणालो, ‘‘श्रीकृष्णावर किती संकटे आली, तरी तो कधी डगमगला नाही’, यातून मला प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली.’’ त्या वेळी पू. काका मला म्हणाले, ‘‘सनातन संस्थेवरही अनेक संकटे आली; पण त्याविषयी परम पूज्य डॉक्टर कधी काळजीत आहेत किंवा त्यांना ताण आला आहे’, असे कधीच पाहिले नाही. त्यांनी त्या त्या स्थितीला योग्य मार्गदर्शन केले.’’ त्या वेळी अवतारी गुरुदेवांविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. प्रेमभाव
अ. एकदा रात्री मी एका सेवेनिमित्त बाहेर जाणार होतो. तेव्हा बाहेर थंडी असल्यामुळे पू. काकांनी मला स्वेटर घेऊन जाण्यास सांगितले.
आ. एकदा मी रुग्णाईत होतो. तेव्हा ते माझी प्रेमाने विचारपूस करायचे. ते मला त्यांच्याकडील फळे खाऊ घालायचे.
इ. मला स्वतःविषयी नकारात्मकता आल्यावर पू. काका मला प्रेमाने मार्गदर्शन करतात.
ई. पू. काकांनी सुचवल्यानुसार मी ग्रंथवाचन केले. मला त्या ग्रंथवाचनातून लाभ होऊन माझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि माझा साधनेतील उत्साह वाढला.
उ. एकदा पू. काकांनी त्यांना शिकायला मिळालेल्या सूत्रांची वही मला वाचण्यासाठी दिली. त्यातून मला साधनेविषयीची सूत्रे शिकता आली.’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२३)