संपादकीय :राज्यघटनेचे कथित भक्त !
धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना यांचा अवमान काँग्रेसने जेवढा केला, तेवढा अन्य कुठल्याही पक्षाने केलेला नाही !
मी राज्यघटनेचा भक्त आहे. मी रामभक्त नाही, अशी दर्पाेक्ती कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केली. स्वतःची ‘धर्मनिरपेक्षतावादी’ प्रतिमा अधिकाधिक उजळण्याच्या नादात त्यांनी हिंदूंच्या देवतेच्या विरोधात केलेली ही गरळओक आहे. साधारण ८० च्या दशकापासून भारतीय राजकारण हे ‘धर्मनिरपेक्षतावाद’ या एका शब्दाभोवती फिरले. ‘यशस्वी राजकारण्याचे निकष काय ?’, असे कुणी त्या काळी विचारले असता, ‘राजकारणी, गुंड, शिकलेला किंवा उद्योजक कुणीही असो, तो धर्मनिरपेक्ष असायला हवा’, असा त्या काळचा दंडक होता. काँग्रेसवाल्यांनी तो तंतोतंत पाळला. ‘धर्मनिरपेक्ष’ राजकारण करण्याचा ‘ट्रेंड’ काँग्रेसने भारतीय राजकारणात आणला. तो नेहरूंपासून चालू झाला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात याला खतपाणी घातले. सोनिया गांधी यांचा काँग्रेसवर वरचष्मा असतांना काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्षतावाद अत्युच्च शिखरावर पोचला. याचा पगडा काँग्रेसवाल्यांवर इतका होता की, तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्यातील छुपे हिंदुत्व समोर आल्यावर काँग्रेसवाल्यांनी त्यांना वाळीत टाकले. त्याचे झाले असे की, ६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी ढाचा पाडला जात असतांना तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव म्हणे पूजा करत होते. ‘ढाचा पाडला जात आहे’, असे त्यांचे सहकारी टाहो फोडून सांगत असतांना राव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ढाचा पडला. या घटनेच्या सत्यासत्यतेवर अनेकांची वेगवेगळी मते आहेत; मात्र त्यामुळे राव यांच्या ‘धर्मनिरपेक्ष’ प्रतिमेवर डाग पडला आणि शेवटपर्यंत तो ते मिटवू शकले नाहीत. गांधी घराण्याच्या छत्रछायेतून काँग्रेसला बाहेर काढण्यात राव यांचा मोठा वाटा होता; मात्र काँग्रेसवाल्यांच्या दृष्टीने त्यांनी केलेली घोडचूक त्यांना आयुष्यभर नव्हे, तर मृत्यूनंतरही महागात पडली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा शासकीय शिष्टाचारानुसार सन्मान करण्यात आला नाही. एवढेच कशाला ? सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वहाण्याचेही टाळले. आजही राव यांना योग्य तो सन्मान दिला जात नाही. अन्य वेळी हिंदूंना मानवतावादाचे डोस पाजणार्या काँग्रेसवाल्यांनी राव यांना जी वागणूक दिली, त्याविषयी काँग्रेसवाले नेहमीच मौन बाळगून असतात. असो. राव यांचा प्रसंग आणि त्यानंतरच्या घटना उपस्थित करण्याचे कारण हेच की, खर्गे आणि त्यांचा पक्ष यांना ‘धर्मनिरपेक्षते’ची मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे खर्गेच काय जवळ जवळ सर्वच काँग्रेसवाले राज्यघटनेचे भक्त असणे साहजिकच आहे; मात्र प्रश्न हाच आहे की, काँग्रेसवाले कुठली राज्यघटना मानतात ? घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली कि ज्या राज्यघटनेत १०० हून अधिक पालट केले गेले ती ? बरं, या राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. त्याविषयी खर्गे यांना काय म्हणायचे आहे ? ‘राज्यघटनेचे भक्त असणारे खर्गे या पुस्तकाची पूजा नक्कीच करत असतील. ती पूजा करतांना त्यामध्ये असणार्या श्रीरामाचे चित्र त्यांना चालते का ? राज्यघटनेचे तारणहार असणार्या या लोकांनी राज्यघटनेची तत्त्वे किती वेळा पायदळी तुडवली, याचा हिशोब नाही. त्यामुळे खर्गे यांनी राज्यघटनेच्या भक्तीचा जो बुरखा पांघरला आहे, तो फाडण्याची हीच वेळ आहे !
राजकारणाची दिशा पालटली !
धर्मनिरपेक्षतेवर आधारलेल्या राजकारणाची दिशा खर्या अर्थाने पालटली ती वर्ष २०१४ च्या निवडणुकीनंतर ! वर्ष २०२४ उजाडता तर भारतीय राजकारणाचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. ‘आता रामाविना राजकारणात ‘राम’ नाही’, अशी म्हणण्याची वेळ निधर्मीवादाचा राग आळवणार्या राजकारण्यांवर आली आहे. ‘हिंदुत्वाचा उघड पुरस्कार, म्हणजे प्रखर हिंदुत्वाचे राजकारण करू शकत नाही, तर निदान मवाळ हिंदुत्वाचे राजकारण करूया’, हे तत्त्व निधर्मी राजकारण्यांनी अंगीकारले आहे. त्यामुळेच कि काय, बंगालमध्ये साम्यवाद्यांनी नवरात्रोत्सव मंडळांना भेटी दिल्या आहेत. एवढेच कशाला ? काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वतः ‘मी जानवे धारण करणारा हिंदु आहे’, असे वक्तव्य केले होते. निवडणुकीच्या काळात त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. जर राहुल गांधी मंदिरांमध्ये जाऊन हिंदूंच्या देवतांसमोर माथा टेकू शकतात, तर खर्गे यांना तसे करण्यात काय अडचण आहे ? काँग्रेसच्या नेत्यांमध्येच हिंदुत्वाविषयी मतभेद आहेत का ?
वर्ष २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँथनी यांनी ‘काँग्रेसने अल्पसंख्यांकांना मोठ्या प्रमाणात चुचकारल्यामुळे पक्षाचा पराभव झाला’, असे सांगितले होते. अँथनी वगळता अन्य काँग्रेसी नेत्याने एवढे वस्तूनिष्ठपणे पक्षाच्या पराभवाचे आत्परीक्षण केल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यांचाही काँग्रेसवाल्यांनी गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘भाजपचा पराभव करायचा असेल, तर भारतातील बहुसंख्य समाजाला पक्षाने आपलेसे करायला हवे’, असे ते सांगतात. त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणतात, ‘अल्पसंख्यांकांनी त्यांच्या धर्माचे पालन केलेले काँग्रेसला चालते; मात्र कुणी मंदिरात गेले किंवा टिळा लावला, तर त्याला ‘धर्मांध’ म्हटले जाते. हे योग्य डावपेच नाहीत.’ अँथनी हे हिंदु नसून ख्रिस्ती आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची चौकट भेदून त्यांनी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवून काँग्रेसवाल्यांचे कान टोचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे; मात्र धर्मनिरपेक्षतेचे भूत मानगुटीवर बसलेल्या काँग्रेसवाल्यांना चूक सुधारायला वेळ कुठे आहे.
काँग्रेसमधील खरे धर्मनिरपेक्षतावादी !
राज्यघटनेचे पाईक असणार्या काँग्रेसवाल्यांनी राज्यघटनेतील तत्त्वांचा योग्य प्रकारे अवलंब केला असता, तर आज काँग्रेसचेच काय, तर भारतातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चित्र वेगळे असते. या पार्श्वभूमीवर केरळचे राज्यपाल असलेले आणि कधी काळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले अरीफ महंमद यांचा उल्लेख येथे करावासा वाटतो. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ला त्यांचा विरोध होता; मात्र शहाबानो प्रकरणात मुसलमानांना चुचकारण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी जी भूमिका घेतली, ती अमान्य करत अरीफ महंमद यांनी वेगळा मार्ग अवलंबला. धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना यांचा अवमान काँग्रेसने जेवढा केला असेल, तेवढा अन्य कुठल्याही पक्षाने केलेला नाही.
काँग्रेसवाले श्रीरामाची तर नाहीच; पण राज्यघटनेचीही भक्ती करत नाहीत, हे हिंदूंनी पुरते ओळखले आहे. त्यामुळेच त्यांनी केंद्रात काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवले. कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला नाही, तर चुकीची धोरणे राबवणार्या भाजपचा पराभव झाला. त्यामुळे कर्नाटकातील विजयामुळे हुरळून गेलेल्या खर्गे यांनी असली वक्तव्ये करणे थांबवावे. अशाने त्यांना लाभ तर काही होणार नाहीच, त्यांची अपरिमित राजकीय हानी होणार, हे निश्चित !