अयोध्येत प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील १ कोटी श्रीरामनामाचा जप अर्थात् रामनामावलीचे अमूल्य जतन !
संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे हस्ताक्षर आदींचे जतन करण्याची आपल्याकडे समृद्ध परंपरा आहे. अशा जतनामुळे पुढील अनेक पिढ्यांना या संतांची थोरवी ज्ञात होते. यासह त्यातून चैतन्य मिळून भक्तांना त्याचा लाभही होतो. अयोध्येतील प्राचीन श्री कालेराम मंदिरात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथील थोर रामभक्त संत प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील श्रीरामनामाचा जप अर्थात् ‘रामनामावली’चा अमूल्य ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. या मंदिराचे पुजारी श्री. रवींद्र जोशी यांना याविषयी विचारले असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.
श्रीसत्शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले रामनामावलीचे दर्शन !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी २१ जानेवारी २०२४ या दिवशी श्री कालेराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी या रामनामावलीचेही दर्शन घेतले.
१. प.पू. गोंदवलेकर महाराज यांचे अयोध्येत वास्तव्य !
श्रीरामनाम हा तारक जप आहे, जो प.पू. गोंदवलेकर महाराजांनी सर्वश्रृत केला. महाराजांनी अयोध्येत वास्तव्य केले होते. त्यांच्या हस्ताक्षरातील लिहिलेला एक कोटी श्रीरामनामचा जप अर्थात् ‘रामनामावली’चे श्री कालेराम मंदिरात जतन करण्यात आले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून हा ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे.
२. रामनामावलीला प्रदक्षिणा घातल्यामुळे कळत नकळत होणार्या पापांचे होते क्षालन !
ही रामनामावली मोठ्या आकारातील कपाटात ठेवण्यात आली आहे. यासह या कपाटात वेद आणि पुराणेही आहेत. हे कपाट कधीही उघडले जात नाही. या रामनामावलीला प्रदक्षिणा घालण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भाविक येथे येऊन मनोभावे या रामनामावलीला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणेला हिंदु धर्मात विशेष महत्त्व आहे. यामुळे ‘अनेक जन्मांची पापे नष्ट होतात’, असे म्हटले जाते. ‘या रामनामावलीलाही प्रदक्षिणा घातल्यामुळे कळत नकळत होणार्या पापांचे क्षालन होते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
३. प.पू. गोंदवलेकर महाराजांनी शिष्यांकडूनही लिहून घेतला श्रीरामनामाचा जप !
प.पू. गोंदवलेकर महाराजांनी संपूर्ण भारतभर यात्रा केली. ठिकठिकाणी त्यांनी शिष्यांकडून श्रीरामनामाचा जप लिहून घेतला आणि ते शिलालेख अयोध्येत आणून प्रभु श्रीरामाचंद्रांच्या चरणी अर्पण केले. त्यांचाही संग्रह या कपाटात आहे.
४. गोंदवलेतील मठाप्रमाणेच अयोध्येतही अखंड चालू असते श्रीरामनामाची धून !
गोंदवले येथील मठाप्रमाणेच येथेही अखंड श्रीरामनामाची धून चालू असते. रामनाम श्रवण केल्याने आपल्या शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये श्रीरामनामाची कंपने निर्माण होऊन मनाची शुद्धी होते, तसेच नामजपाचे स्मरणही रहाते. आपणही श्रीरामाचा नामजप करण्याचा संकल्प करून त्याची उपासना केली पाहिजे.