हिंदूंच्या संघटितपणामुळे वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रकरणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे धर्मांधांवर पोलिसांची कारवाई !
- सावंतवाडी येथे ३ धर्मांधांसह एकूण ५ जणांना अटक
- वेंगुर्ला येथे जाफर शेख याला अटक
सिंधुदुर्ग – २ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली. त्यानंतर वेंगुर्ला येथील घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या जाफर शेख याला २४ जानेवारी या दिवशी न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सावंतवाडी येथील प्रकरणात कामरान आयुब, समरीन खान बिजली, लबिबा कादर खान यांच्यासह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वांना शांतता आणि संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी हिंदू एकवटले !
सावंतवाडी – येथे ‘पोस्ट’ प्रसारित करणारे काही जण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे २४ जानेवारी या दिवशी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मराठा महासंघाचे सीताराम गावडे यांच्यासह शेकडो हिंदूंनी एकत्र येत ‘हिंदु धर्मियांच्या भावना भडकावणारी वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रसारित करणारा युवक आणि अन्य संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली.
सावंतवाडीतील अनधिकृत परप्रांतीय व्यापार्यांवर कारवाई करण्याची मागणी
त्यानंतर माजी आमदार राजन तेली यांच्यासह सर्व हिंदु धर्मीय नगरपालिकेत गेले. तेथे शिष्टमंडळाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली अन् त्यांच्याकडे शहरातील अनधिकृत परप्रांतीय फळविक्रेते, भाजीविक्रेते, तसेच फेरीवाले यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. ‘ही कारवाई करतांना स्थानिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी’, असेही हिंदूंनी साळुंखे यांना सांगितले.
तीच ‘पोस्ट’ पुन्हा प्रसारित करण्याचा उद्दामपणा !
सावंतवाडी शहरातील अन्य काही जणांनीही तीच ‘पोस्ट’ पुन्हा प्रसारित केल्याचे समजल्यावर भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यासह शिष्टमंडळाने सावंतवाडीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सावंतवाडीतील संबंधित युवकाकडून यापूर्वीही अशा वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रसारित करण्याचे कृत्य !
संबंधित युवकाने यापूर्वी ४ ते ५ वेळा अशाच प्रकारे ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचे समजते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर अधिकाधिक कडक कारवाई करावी, जेणेकरून असे करण्याचे कुणाचे धाडस पुन्हा होणार नाही, अशी मागणी पोलिसांकडे केल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील प्रकरणात अन्य काहीजणांचा सहभाग असल्याचा संशय
‘पोस्ट’ प्रसारित करण्याच्या प्रकरणात अन्य काही युवकांचा समावेश असल्याची चर्चा असून त्यादृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत.
वेंगुर्ला येथील परिस्थिती नियंत्रणात !
वेंगुर्ला – शहरात वादग्रस्त पोस्टमुळे निर्माण झालेली स्थिती ही हिंदु-मुसलमान वादातून झालेली नाही, तर ‘जाफर’ नामक व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे घडली आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी २४ जानेवारी या दिवशी येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित हिंदू आणि मुसलमान यांनी केली. ‘वेंगुर्लावासियांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून समाजात तेढ निर्माण होईल, अशी कृती करू नये. शांतता राखावी. कोणतीही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा’, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी या वेळी केले.
वेंगुर्ला शहरासह तालुक्यात शांतता राखली जावी, यासाठी पोलिसांनी २४ जानेवारी या दिवशी शहरातून संचलन केले.
शांतता समितीच्या बैठकीत वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उपाख्य बाळू देसाई, ‘जमातुल मशीद ट्रस्ट वेंगुर्ला’चे शब्बीर गोलंदाज, कॅम्प मशिदीचे अध्यक्ष नेहाल शेख, काँग्रेसचे सिद्धेश परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नम्रता कुबल, उद्धव बाळासाहेब ठाकर गटाचे तालुका प्रमुख संजय गावडे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य आणि प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.
जाणूनबुजून अशी कृत्ये केली जात आहेत !
या प्रकरणी उपस्थितांपैकी काहींनी सांगितले की, ‘रेडी, सावंतवाडी येथेही असेच संदेश पाठवण्यात आले. जाणूनबुजून अशी कृत्ये होतात, हे थांबले पाहिजे. हिंदु समाज शांत आणि जागरूक आहे; मात्र कुणी अती करू नये.’
मुसलमान समाजाने क्षमा मागितली !
शांतता समितीच्या बैठकीत मुसलमान समाजाच्या वतीने बोलतांना गोलंदाज यांनी ‘पोस्ट’मुळे झालेल्या घटनेविषयी हिंदूंची क्षमा मागितली. ‘गेल्या ५० वर्षांत वेंगुर्ला येथे हिंदु-मुसलमान वाद कधीच झाला नाही. ‘पोस्ट’ प्रसारित करणार्याला पोलिसांनी कठोरात कठोर शिक्षा करावी’, अशी आमची सर्वांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ला येथे मशिदीवरील भोंगे काढण्यास भाग पाडले !
वेंगुर्ला येथे धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित झाल्यानंतर २३ जानेवारी या दिवशी रात्री मोठ्या संख्येने हिंदू पोलीस ठाण्याच्या परिसरात एकत्र आले. त्यांनी संबंधित मुख्य सुत्रधारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर संतप्त हिंदूंनी पिराचा दर्गा येथील मशिदीजवळ येऊन ‘भारतमाता की जय !, ‘जय श्रीराम !’ अशा घोषणा दिल्या, तसेच मशिदीवरील भोंगे काढण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना सांगून भोंगे मशिदीवरून उतरवले, तसेच काहींची दुकानांचीही तोडफोड केली. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार चालू होता. |