प्रजासत्ताकदिनानिमित्त राज्यात ‘महावाचन उत्सव’ साजरा होणार !
पुणे – विद्यार्थ्यांना वाचनाची, लिहण्याची आवड निर्माण व्हावी. महान व्यक्तींची ऐतिहासिक कामगिरी समजावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताकदिनाच्या सप्ताहामध्ये ‘महावाचन उत्सव’ राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि शिकवणुकीवर आधारित लेखन करतील, अशी माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिली आहे. ‘राज्यशासन’, ‘युनिसेफ’ आणि ‘रीड इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राज्यभरातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबवण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू आणि त्यामधून मिळालेली शिकवण यांवर विद्यार्थी एका पानाचे लेखन करतील. याविषयीचे लेखन ३१ जानेवारीपर्यंत गट शिक्षणाधिकार्यांकडे जमा करण्याची सूचना संबंधितांना दिली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि इतरांकडून पडताळणी केली जाईल.